कविता संकलन

बापाचे काळीज
----------------------------------------------

पोरीची पसंती आली की
बापाचं काळीज धडधडतं
चिमणी घरटं सोडणार म्हणून
आतल्या आत खूप रडतं

हसरे खेळकर बाबा एकदम
धीर गंभीर दिसू लागतात
पोरीला पाणी मागण्या पेक्षा
स्वतःच उठून घेऊ लागतात

या घरातला चिवचीवाट आता
कायमसाठी थांबणार असतो
म्हणून बाप लेक झोपल्यावर
तिच्याकडे पाहून रडत असतो

अंबुच्या लिंबूच्या करत करत
मोठी कधी झाली कळलं नाही
बाप सांगतो तिलासोडून
मला पाणीही गिळलं नाही

दिवसातून एकदा तरी
मायेनं जवळ घ्यावं वाटतं
परक्याचं धन असलं तरी
द्यायला मात्र नको वाटतं

उठल्या पासून झोपे पर्यंत
बाबाची काळजी घेत असते
आज ना उद्या जाणार म्हणून
पोरगी जास्तच लाडाची असते

पोरगी जाणार म्हणलंकी
बाप आतून तुटून जातो
कळत नाही बैठकीतून
अचानक का उठून जातो ?

इकडे तिकडे जाऊन बाबा
गुपचूप डोळे पुसत असतात
लेकीचं कल्याण झालं म्हणून
पुन्हा बैठकीत हसत असतात

तिचा सगळा जीवनपट
क्षणाक्षणाला आठवत राहतो
डोळ्यात येणाऱ्या आसवांना
बाबा वापस पाठवत राहतो

बी. पी. ची गोळी घेतली का ?
आता कोण विचारील गं ?
जास्त गोड खाऊनका म्हणून
कोण कशाला दटवील गं ?

बाबा कुणाचं ऐकत नाहित पण
पोरीला नकार देत नाहीत
तिने रागात पाहिलं की मग
ताटात गुलाबजाम घेत नाहीत

एका अर्थानं पोरगी म्हणजे
काळजी करणारी आईच असते
पोटचा गोळा देणाऱ्याची
कहाणी फार वेगळी असते


No comments:

Post a Comment