पुज्य सानेगुरुजी

सानेगुरूजी................................
साने गुरुजींची मानवी जीवनमूल्यांवर नितांत श्रध्दा होती.ध्येयवादाच्या अढळ ताऱ्यावर त्यांची दृष्टी सतत खिळलेली असायची. समाजहिताची अखंड कळवळ, देशहिताची निरंतर तळमळ असणारे साने गुरुजी समाजाला नवनवीन ज्ञानकण देण्यास उत्सुक असत. समानता, लोकशाही मूल्यांवर आधारलेला समाज निर्माण होऊन सर्वांना अन्न,वस्त्र,निवारा प्राप्त व्हावा,ही त्यांची तळमळ होती.गुरूजींनी आपला जीवनबिंदु अनंताच्या सिंधूत मिसळून टाकला. त्यांची विशिष्ट अशी जीवनदृष्टी होती.साऱ्या अभागी,दुःखी कष्टी लोकांचे अश्रू त्यांच्या डोळ्यांत एकवटले होते.अश्रू हाच त्यांचा अनमोल ठेवा होता.ते कवितेत म्हणत -
नको माझे अश्रू कधी नेऊ देवा !
हाचि थोर ठेवा,माझा एक
बाकी सारे नेई धन सुख समान
परि हे लोचन राखी ओले !!
      गुरुजींची आई त्यांना नेहमी म्हणत असे अरे जवळ जे असेल ते दुसऱ्याना द्यावे,दुसऱ्याचे अश्रु पुसावे त्याला हसवावे.या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.
     जगात दुःख,यातना,कुरूपता अनंत आहे.ते वाढविण्याचा आपण प्रयत्न करु नये,दुसऱ्याचे
दुःख मोठे आहे.त्याच्या तुलनेत आपले अगदी नगण्य आहे. आपले दुःख नेहमी कुरवाळत
बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या दुःखाचा भार हलका करावा,खरी माणुसकी तीच,त्यातच खरी कृतज्ञता आहे.
         साने गुरुजींनी विषमता,ध्येयशून्यता,अन्याय जुलुम नष्ट करण्यासाठी आपली लेखणी झिजवली.जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ते साधकाच्या निष्ठेने वावरले.
 स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई
सुखवू प्रियतम भारत आई
         अशी स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक तरुणाच्या मनात पेटवीणारी ही कविता साने गुरुजींच्या अजरामर लेखणीतून निर्माण झाली.आईची महती ते अशी व्यक्त करतात -
आई माझा गुरू ! आई कल्पतरू
तिला मी कसा विसरू
   अशी नितांत सुंदर कविता जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा आईचे प्रेम काय असते याची प्रचिती आपल्याला येऊ लागते.साहित्यात गुरुजींची पुस्तके अजरामर आहेत. प्रामुख्याने "श्यामची आई",मिरी,
गोप्या,दुःखी मनुबाबा, दुर्दैवी, आस्तिक,बेबी सरोजा,फुलांचा प्रयोग,नदी शेवटी सागरास मिळेल,चित्रा नि चारु,गोड गोड गोष्टी भाग १ ते १०,सुंदर पत्रे,रामाचा शेला,भारतीय संस्कृती अशी महत्वाची पुस्तके येतील.यात मुलांना आवडणारी खास श्यामची आई,मिरी,गोप्या, बेबी सरोजा,गोड गोड गोष्टी ही पुस्तके होत.
       साने गुरुजी मुलांना नेहमी म्हणत,तुम्ही फुलांप्रमाणे आहात स्वतःतर आनंदी राहाच,दुसऱ्याना ही आनंदी ठेवा.मुले म्हणजे देवाघरची फुले,राष्ट्राची ठेव,मुलांवर संस्कार केले जावेत.
मुलेच उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.गुरुजींनी जे संस्काराचे विचार जीवनात दिले ते तीन मुले,क्रांती आणि सती यासारख्या काव्य पुस्तकांतून विशेषतः "श्यामची आई" हे पुस्तक तर आजही मोठ्या प्रमाणात वाचकप्रिय आहे.
      मी जीवनाचा नम्र उपासक आहे.सभोवतालच्या सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा हीच माझी तळमळ आणि माझे लिहिणे वा बोलणे,माझे विचार माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात.म्हणूनच ते आपल्या काव्यात म्हणतात 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' अशा प्रकारच्या प्रार्थनेतुन साऱ्या विश्वालाच प्रेमाचा संदेश देतात.मुला-फुलांच्या ओठांवर प्रार्थना प्रिय करून देतात त्याचप्रमाणे.........
" बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो "
    यासारखी सुंदर काव्यरचना रसिकता आणि सौंदर्यसॄष्टीच्या अनुभवातून आलेली दिसते.आईकडून लाभलेला वात्सल्यरूपी पेला त्यांनी समाजव्यापी बनविला. जनमाणसात वेगळे स्थान निर्माण करीत कोकणचा निसर्ग आणि खानदेशातील माणसे, खानदेशची माती यांच्याशी मातृवात्सल्याच्या नात्यानेच वागत असत.आज त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्त या पूज्य ज्ञानमाऊलीस विनम्र अभिवादन!

No comments:

Post a Comment