कथा क्रमांक १५२

*'अत्त दिप भव'*
〰〰〰〰〰〰
*एका घरात पाच दिवे जळत होते. एके दिवशी पहिला दिवा म्हणाला, "मी दिवसभर जळून लोकांना इतका प्रकाश देतोय, पण माझी कोणी कदरच करत नाही. म्हणून मी विझून जाणंच योग्य ठरेल"असं म्हणून तो दिवा विझला. पण हा दिवा साधासुधा नव्हता तर तो होता,  उत्साहाचं प्रतीक !*

*हे पाहून दुसरा दिवा, जो शांतीचं प्रतीक होता, तो म्हणाला, "मी शांतीचा प्रकाश सातत्याने देत असलो, तरी लोक हिंसा करतच आहेत. त्यामुळे मी प्रकाश देणं व्यर्थ ठरत आहे. म्हणून, मला विझायलाच हवं."*

*उत्साहाचा आणि शांतीचा दिवा  विझल्यानंतर हिमतीचा जो तिसरा दिवा होता तोही आपली हिंमत हरवून बसला , निराश झाला आणि विझला. आता उत्साह, शांती  आणि हिंमत न राहिल्याने चवथ्या समृध्दीच्या दिव्यानंही विझणं उचित समजलं.*

*आता चार दिवे विझल्यानंतर उरलेला एकमेव पाचवा दिवाच केवळ  प्रज्वलित होता. खरंतर पाचवा दिवा सर्वांमध्ये लहान असला तरीही तो निरंतरपणे जळत होता.*

तेवढ्यात त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्यानं पाहिलं, *अरेच्चा !*
*"या घरात किमान एक दिवा तरी उजळत आहे" असा विचार करून तो आनंदीत झाला. विझलेले चार दिवे पाहून तो मुळीच निराश झाला नाही. कारण त्याच्या मनात एकच आशा होती  कमीत कमी एक दिवा तर जळत आहे! त्याने त्वरित तो जळत असलेला दिवा उचलून इतर चार दिवे प्रज्वलित केले. हा पाचवा अनोखा दिवा कोणता होता हे आपण जाणता का ?  तो होता आशेचा दिवा!*

*आता मनन करा, आपल्या ह्रदयाच्या गाभा-यात हा पाचवा दिवा प्रज्वलित आहे का ?  जर तो तेवत असेल तर, नेहमीसाठी प्रज्वलित राहावा म्हणून आपण काय कराल?*

*'अत्त दिप भव'* अर्थात विश्वास ठेवा, नवनिर्मिती करण्याची ताकद केवळ मनुष्यातच आहे. मनुष्य जेव्हा एखाद्या गोष्टींवर विश्वास ठेवतो,  तेव्हा तो विश्वास त्याचा वाणीत येतो, मग क्रियेत उतरतो, हेच आशेचं बळ आहे, म्हणून आशेला कधीही छोटं समजू नका, क्षुद्र लेखू नका.



✍✍✍

No comments:

Post a Comment