कविता संकलित

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

आनंद भरारी

केव्हां मारुनि उंच भरारी । नभांत जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी । आनंदें भरली.

आनंदाचे फिरती वारे, । आनंदानें चित्त ओसरे,
आनंदें खेळतो कसा रे । आनंदी पक्षी !

हिरवें हिरवें रान विलसतें, । वृक्षलतांची दाटी जेथें,
प्रीती शांती जिथें खेळते । हा वसतो तेथें,

सुंदर पुष्पें जिथें विकसलीं, । सरोवरीं मधु कमलें फुललीं
करीत तेथें सुंदर केली । बागडतो छन्दें,

हासवितो लतिकाकुंजांना, । प्रेमें काढी सुंदर ताना,
आनंदाच्या गाउन गाना । आनंदें रमतो.

जीवित सारें आनंदाचें । प्रेमरसानें भरलें त्याचें;
म्हणोनिया तो रानीं नाचे । प्रेमाच्या छन्दें !

आम्हांकरितां दुर्धर चिंता, । नाना दु:खें हाल सभोंता,
पुरे ! नको ही नरतनु आताम । दु:खाची राशी !

बा आनंदी पक्ष्या, देई । प्रसाद अपुला मजला कांहीं,
जेणें मन हें गुंगुन जाई । प्रेमाच्या डोहीं.

उंच भरार्‍या मारित जाणें । रूप तुझें तें गोजिरवाणें !
गुंगुन जाइल चित्त जयानें । दे, दे तें गाणें !

            *बालकवी*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

            *संकलन*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment