कर्मविर भाऊराव पाटिल माहिती संकलन

कर्मवीर !
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बहुजन समाजापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवून या रयतेला शहाणे करण्यासाठी हयातभर खस्ता खाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन. या ज्ञान महर्षींना आदरांजली.
महाराष्ट्रातील पिचलेल्या, खचलेल्या, नाकारलेल्या समाजातील पुढची पिढी शिकून मोठी व्हावी, या उद्देशाने महात्मा जोतिबा फुले यांचा आदर्श ठेवून भाऊरावांनी कोल्हापूर, सातारा, सांगली भागात कार्याला सुरुवात केली.
त्यातूनच रयत शिक्षण संस्थेचा जन्म झाला. संस्थेचे जनक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव.
लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
पुढील काळात भाऊराव साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.
४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली.
डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती.
जनतेने भाऊरावांना 'कर्मवीर' हा किताब बहाल केला.
पुढे रयत शिक्षण संस्थेच्या शाळांचे जाळे वाढतच गेले. विद्यार्थ्यांना स्वकष्ट व स्वकमाई यांची जाण व्हावी, या उद्देशाने कर्मवीरांनी विविध योजना सुरू केल्या.
आज रयत शिक्षण संस्थेच्या शेकडो शाळा, काॅलेजे, वसतीगृहे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत. लाखो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत.
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली.
सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे १९५९ रोजी मालवली

1 comment: