गुरुजीची व्यथा

*"व्यथा Z.P. च्या गुरुजीची"*

जेव्हा तेव्हा गुरूजी
तुम्ही बसता लिहीत।
असे काय असते भारी
शाळेच्या वहीत ?

लिहूलिहू तुम्हाला गुरू,
थकवा येत नाही का ?
शिकविण्याचा वेळ तुमचा,
फुकट जात नाही का ?

गुरूजी म्हणाले सांगतो तुला
सगळं,ऐक माझ्या मित्रा।
दिवसाचे काय म्हणतोस,
अनेक जागरून काढल्या रात्रा।

मुख्याध्यापक आहे मी,
दोन शिक्षकी माझी शाळा।
कामे पाहून शाळेची,
लागत नाही डोळ्याला डोळा।

दोन वर्ग सांभाळून,
कामे करावी लागतात।
साहेब तर नेहमी
अर्जंट  टपाल मागतात।

पुस्तकवाटप, गणवेषवाटप,
हे फार मोठं दिव्य काम।
या साठी घ्या म्हणतात,
वेगवेगळे प्रोग्राम।

साप्ताहिक,मासिक,वार्षिक
नियोजन,लेखी ठेवतो।
साहेबाला दिसण्यासाठी,
ते भिंतीवर लावतो।

वृक्ष आणणे,वृक्ष लावणे,
हे दर वर्षाचे काम।
कुठूनही आणा,कसेही लावा,
सक्तीमुळे निघतो घाम।

तांदळाचा गोषवारा
दर दिवशी लिहीतो।
शिजविणे,वाढणे,स्वच्छता,
जेवन,घडीघडी पाहतो।

काढत असतो दररोज
शिकविण्याचे टाचण।
टाचण नसेल तर होते
फार मोठे शासन।

डोके खातो तांदळाचा
तो अहवाल सहापानी।
गुणाकार,वजाबाकी,बेरजा करुन,
होते मेंदूचे पानीपानी।

जयंत्या,पूण्यतिथ्या,असे कार्यक्रम
असतात पंधरा वीस।
अहवाल लेखी मागवते त्यांचे,
तालुक्याचे आॅफिस।

नविन मूल्यमापनामध्ये,
लिहावे लागते फार।
कितीही लिहीले तरी,
हलका होत नाही भार।

याच्यासाठी रजिष्टर,
भरणे पडे सहा।
खोटे वाटत असेल तर
थोडे वाचून पहा।

शाळा व्यवस्थापन समितीची
बैठक असते महिन्यात एकदा।
एकाएका सदस्याला
बोलवावे तरी कितींदा।

प्रोसिडिंगमध्ये काही
चुकू देता येत नाही।
शेवटी काही सदस्य,
सही देता देत नाहीl

मातापालक,पालकशिक्षकसंघ,
यांच्याही बैठका होतात।
महिन्यातील दोन दिवस,
त्याच्यातच निघून जातात।

गशिअ,शिविअ,केंद्रप्रमुख,
ठेवतात मिटींग वेगवेगळी।
माहिती पुरवणे भाग पडते,
तीनचार वेळा सगळी।

गाव आराखडा,यु डायसची,
असते खास तयारी।
न चुकता कम्प्यूटरला
फिडींग करायची असते सारी।

शैक्षणिक सर्वेक्षण जानेवारीचे
आठ दिवस खाते।
अठरा रकान्यात गावाचीमाहिती,
नोंद केली जाते।

नमुना नंबर ३२,३३,पावतीबुक,
कॅशबुक,असते मोठे टेंशन।
यात चूक झाली थोडी जरी,
जाऊ शकते पेंशन।

वर्षातून तीनचार दिवस
आॅडिटचे असतात।
काही नवखे मुख्याध्यापक
त्यात अलगद फसतात।

दिडशे रजिष्टरं लिहूलिहू
माझा झाला पाचोळा।
बायको म्हणते, नवरा मिळाला मास्तर,
अन् आयुष्याची झाली शाळा।

काही अधिकारी असतात,
भलतेच उपक्रम वेडे।
एकाच दावणीला बांधतात
गधे अन् घोडे।

त्यांच्या डोक्यातून निघतात
वाट्टेल त्या कल्पना।
वास्तवाचे भान नसते,
करतात नुसत्या वल्गना।

आउटपुट शून्य निघतो तरी,
थोपटून घेतात पाठ।
टप्पे देऊदेऊ लागते
आमची पुरती वाट।

सरकारी शाळेतच यांचे
असे प्रयोग का व्हावेत?
शेतकरी,गरीबांची मुले
काय उंदिर,बेडूक आहेत ?

एवढा सगळा आहे,
मित्रा माझ्या मागे व्याप।
जाणूनबुजून होत नाही ,
माझ्या हातुन पाप।

आणखी बरीच मोठी आहे
बाकी सांगायची लिस्ट।
सांगायची राहिलेली कामे,
अजून खुपच आहेत क्लिष्ट।

पहिल्या जन्माचं पाप असेल,
मुअ पद पदरी पडलं।
फुकटचं टेंशन सगळं,
नको ते विपरीत घडलं।

यातूनही वेळ मिळाला तर,
शिकवायला सुरवात करतो।
मध्येच अचानक गावकरी येतो,
गुरुजी पटकन दाखला द्या म्हणतो।


यावर मित्र म्हणे,
गुरूजी तुमच्यापेक्षा
आम्ही लयी बरे रिकामे।
स्वताच्याच मनाने करतो
आम्ही,स्वतःची कामे।🇮🇳

जयहिंद

No comments:

Post a Comment