वि.दा.करंदीकर यांची कविता

*विं. दा करंदीकर यांची एक छान कविता -*

*शीर्षक - 'उपयोग काय त्याचा ?'**

शब्दांत भाव नाही,
ना वेध अनुभवाचा ;
रचना सुरेख झाली !
उपयोग काय त्याचा ?

व्याहीच पत्रिकेचा
घालीत घोळ बसले;
नवरी पळून गेली !
उपयोग काय त्याचा ?

सुगरण रांधणारी,
सुग्रास अन्न झाले ;
अरसिक जेवणारे,
उपयोग काय त्याचा ?

जमली महान सेना,
शस्त्रे सुसज्ज झाली ;
नेता कचखाऊ निघाला,
उपयोग काय त्याचा ?

ऐश्वर्य प्राप्त झाले,
झाली दिगंत कीर्ती ;
स्नेही न एक लाभे !
उपयोग काय त्याचा ?

सर्वांस स्वास्थ्य आले,
सगळीकडे सुबत्ता ;
स्वातंत्र्य फक्त नुरले !
उपयोग काय त्याचा ?

केले गुरु अनेक,
यात्रा कित्त्येक केल्या ;
शांती न प्राप्त होता,
उपयोग काय त्याचा ?
🎤

No comments:

Post a Comment