माणूस शोधतो मी. (कविता )

*माणूस शोधतो मी*

कोलाहलात सा-या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

हे धर्म, देवळे ही धुंडून सर्व आलो
भिंतीपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी

हव्यास हा सुखाचा, कल्लोळ वासनांचा
जळत्या चितेवरी या माणूस शोधतो मी

फासून रंग रात्री दिवसा भकास सारे
खिडकीत विक्रयाच्या माणूस शोधतो मी

काळ्या उभ्या तिजो-या गाणे खरीदणा-या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी

त्वेषात बाहुल्यांचे जाती जथे पुढे हे
कळसूत्र तोडुनी हे माणूस शोधतो मी

या झोपडयांत आली वाहून ही गटारे
चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी

या संस्कॄतीस सा-या ही चूड लाविली मी
वणव्यात पेटलेल्या माणूस शोधतो मी

*--मंगेश पाडगांवकर*

2 comments:

  1. कवितेची प्रस्तुतता आजही तितकिच समर्पक आहे.

    ReplyDelete