प्राजक्त

प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का ? नाही ...
ते समुद्र मंथन वगैरे सोडून आणि एक आख्यायिका सांगितली जाते.
ही एक राजकुमारी ! तेजोमय सूर्यावर आसक्त ! राजकुमारी ती; तिचा हट्ट राजान पुरवला. सूर्य देवाला साकड घातल गेल,अन भूलोकीच ते अनोख मागण सूर्य देवान स्वीकारलं.
त्याच्या होकाराला धरून लग्न ठरलं. पण लग्न घटिकेला सूर्य देव फिरकलेच नाहीत. विवाह वेदीवर अपमानित ती बालिका स्व अग्नीत जळून खाक झाली. अन तेथ उमटलं हे स्वर्गीय अद्भुत रोपट .
सुर्यावरील रागाने ती बाकीच्या फुलांसारखी सूर्योदयाला नाही उमलत. ना ही तिची फुल कधी उमलून डोलतात. बस उमललेलं प्रत्येक फुल मूक अश्रु सारख टप,टप गळत..!!

कविता या कहाणीवर नाही आहे. पण एक संदर्भ !! हे फक्त त्या सुगन्धी प्राजक्ताच वर्णन.

प्राजक्त

पाच पाकळ्या प्राजक्ताच्या ;
सान चिमुकल्या ; फक्त पांढऱ्या.
देठ ही इवला; संथ केशरी,
देह हलका हवेहूनही ॥

उठण्या आधी भ्रमर पाखरे,
फुलण्या आधी प्रफ्फुल्ल किरणे,
लपून कोपरी फुलूनी गेला
लाजरा प्राजक्त केंव्हाचा ॥

नाही मादक; ना माळण्या,
स्पर्श कुणाचा कधी न भावला,
धरला हाती; त्वरित मळला,
सुकुमार प्राजक्त हा ॥

उपमा याला कवी मनाची,
आणिक कोवळ्या बाल प्रीतीची,
नाजूक हळू गुणगुणण्याची ,
नि:शब्द चांदण्या रातीची ॥

फुलण्यासाठी, फुलून गेला
लकेर मनीची खुलवीत गेला,
तरंग सुगंधी उठवीत गेला,
एकला प्राजक्त हा ॥

🌹🌹संकलित🌹🌹

No comments:

Post a Comment