"कट्टी आणि बट्टी''

" कट्टी आणि बट्टी"
--------------

अगोदरची पिढी तशी
खूपच  गरीब  होती ...
तरीही ती एकमेकांच्या
बरीचशी   करीब होती ..

आवर्जून सगळेजणं
जाणं येणं ठेवीत होते
सुख असो दुःख असो
हात पुढे येत होते

काका काकू , मामा मावशी
आपलेपणा वाटायचा
दिवाळीत , लग्नाकार्यात
अख्खा वाडा नटायचा

प्रत्येकजण प्रत्येकाला
भरभरून बोलायचा
आपलं माणूस दिसलं की
संपूर्णपणे उकलायचा

हसणं काय रुसणं काय
सारं कसं आतून यायचं
कट्टी संपून बट्टी झाली की
पुन्हा प्रेम ऊतू जायचं

आतलं दुःख सांगितलंकी
हलकं हलकं वाटायचं
अनुभवाच्या शिदोरीतून
बरंच  काही  भेटायचं

पहाडा सारख्या प्रश्नांनाही
तेंव्हा उत्तरं सापडायची
सगळीच माणसं चारचौघात
सुखदुःख  पाखडायची

अहंकार,यश—अपयश आणि स्वार्थामुळे
आता अनर्थ घडला आहे
नातेगोते  असून सुद्धा
माणूस एकाकी पडला आहे

चुक आपली दुसर्‍याच्या
माथी मारू नये..
दोषी दुसर्‍याला समजून
आपली माणसं तोडू नये..
जगाशी नातं जोडताना
जुनी मुळे खोडु नये..

भाऊ भाऊ, बहिणी बहिणी
एकमेका कडे जातात का ?
समोरा समोर आल्यानंतर
 प्रेमाचे दोन शब्द बोलतात का ?

वर्षानुवर्षे  जवळ राहून
कुणीच आपलं वाटत नाही
द्वेष मत्सरामुळे पुढे आपलेच
आपल्याशी पटत नाही

कुठे तरी कधी तरी
हा दुरावा संपला पाहिजे
घर असो दार असो
आपण माणूस जपला पाहिजे

उत्तरार्धात अनेक प्रश्न
जेंव्हा समोर नाचू लागतात
भांबावलेली माणसं तेंव्हा
धर्मग्रंथ वाचू लागतात

चलतीच्या काळात सुद्धा
मिळून मिसळून वागावं
नेहमी चांगली बुद्धी दे
एवढंच देवाला मागावं..🙏

No comments:

Post a Comment