लेख..... जन्म आणि मृत्यू आत्मा आणि शरीराच्या संयुगाचे नाव 'जन्म'असून त्याच्या वियोगाला 'मृत्यू' असे म्हणतात.खरंतर माणूस जन्माला आला तेव्हाच मृत्यूही घेऊन येतो. माणसाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत तो कसा वागतो, जगतो त्यावरून त्याला मोक्ष प्राप्ती होते. परंतु मनुष्य कसा मरतो हे महत्त्वाचे नाही; पण तो आपले जीवन कसे जगतो हे महत्वाचे आहे. मनुष्याच्या स्वतःच्या सत्कर्म पुण्यधिक्याच्या बळावर त्याला मुक्ती प्राप्त होते. आपला जन्म म्हणजे कर्तव्याने भरलेला घडा आहे. माणूस स्वतःच्या जीवनात आपली कर्तव्य जितकी प्रामाणिक व योग्य प्रकारे पार पाडतो तितका तो आपल्या जन्माचे सार्थक करतो. कारण माणसाचं आयुष्य हे चैन नसून एक कर्तव्य आहे. व हे कर्तव्य तो जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे पार पाडतो. माणूस जीवन जगत असताना त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात. ही जीवनात येणारी संकटे म्हणजे ते शाप नव्हेत तर त्याच्या जीवनात प्रथमता उद्भवणारी अडथळे होय. ही जीवनात उद्भवणारी संकटे म्हणजे त्याच्या उज्ज्वल भवितव्याची निदर्शक आहेत. माणसाचा जन्म,जीवन म्हणजे संग्राम आहे , यज्ञ आहे , सागर आहे.जखमांशिवाय संग्राम असत नाही.ज्वाळांशिवाय यज्ञ होत नाही . लाटांशिवाय सागर असत नाही. हे सर्वकाही हसतमुखानेच स्वीकारायला हवे.कारण जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. माणूस जन्माला येतो व या जन्माला आलेल्या माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल. ' आला आणि गेला .' काही माणसं मरत - मरत जगत असतात तर काही माणसं जगत - जगत मरत असतात.जन्मकाळाप्रमाणे मरणकाळ हा देखील एक आनंदसोहळा आहे. कारण शरीर पिंजऱ्यातून आत्म्याचा पक्षी मुक्त होऊन अनंतात विलीन होतो. हे सार जग नियतीच्या अंगा - खांद्यावर खेळत असतं. नियती कधी हसते , कधी रडते. माणसाचं जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय.माणसाचं मरण म्हणजे नियतीचं रुदन होय. ' जीवन सरे मरण उरे ' हे सूत्र जगताना ध्यानात ठेवावं लागतं. 〰〰〰〰〰〰〰〰 लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव, जि. नांदेड.

No comments:

Post a Comment