*धैर्यासारखे बळ नाही.* कोणत्याही व्यक्ती जवळ धैर्य व चिकाटी असेल तरच तो आपल्या सर्व इच्छा यशस्वी करू शकतो. कारण धैर्य आहे तेथे विजय निश्चितच आहे. धैर्य हे माणसाच्या हातातील एक मोठे हत्यारच आहे. या धैर्याच्या जोरावर माणसाला समर्थपणे आपले जीवन जगता येते. 'धैर्य हे मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य आहे.' असे ॲन्टोनियो या विचारवंताने म्हटले आहे. माणसावर एखादा कठीण प्रसंग ओढवला तर अशा संकटाला सामना करण्यासाठी आपल्याजवळ धैर्य, हिंमत असावी लागते . अशा संकटसमयी जर आपण हिम्मत ठेवली तर जीवनाची अर्धी लढाई आपण आधीच जिंकू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर आपण त्या व्यक्तीस खचून जाऊ न देता सांत्वनपर बोलून त्या व्यक्तीला हिम्मत द्यावी, त्याचे मनोबल वाढवावे, धैर्य वाढवावे. कारण माणसाच्या जीवनात धैर्यासारखे दुसरे बळ नाही. माणसाच्या दुबळेपणावर मात करण्याची शक्ती धैर्यामध्ये असते. दुबळ्या शरीरात शक्ती निर्माण करून प्राणवायू देत असते ते धैर्य होय. कोणत्याही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची वृत्ती म्हणजे धैर्य होय. परंतु या धैऱ्याचा अतिरेक होता कामा नये. जर अतिरेक झाला तर त्याला दुर्गुणाचे स्वरूप प्राप्त होते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की माणसाने आपले धैर्य सोडून द्यावे. जीवनातील संकटांचा समुद्र पार करायचा असेल तर माणसाला धैर्या च्या जहाजातून प्रवास करावा लागतो. या धाडसाने केलेल्या प्रवासामुळे तो आपल्या जीवनाची नौका यशस्वीपणे पार करू शकतो. कारण ध्येयाच्या मार्गावरून जाताना धीरगंभीर व्यक्ती आपले धैर्य कधी गर्भगळीत होऊ देत नाही. ज्यांना आपल्या जीवनात काही ठोस करून दाखवायचे असते ते धैर्याने पावलं पुढे टाकीत असतात. अशी व्यक्ती धोका पत्करून संकटाचा सामना करून धैर्याने पुढे जात असते. अशा हिमतीने काम करण्याच्या मनोवृत्तीला धैर्य असे म्हणतात. अशा व्यक्तीचे धैर्य कोणी नष्ट करू शकत नाही. म्हणून माणसाने हिम्मत सोडायची नाही, धैर्याने राहायचे मग प्रसंग कोणताही असो. कारण 'ज्याच्यात हिम्मत आहे त्यालाच या जगात किंमत आहे'. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.

No comments:

Post a Comment