लेख..... वेळ, काळ ,समय परमेश्वर एकावेळी एक क्षण देतो तर दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो. म्हणजेच वेळ ही कधी कुणासाठी थांबत नसते. वेळ ही आपले कार्य निमुटपणे पार पाडत असते. 'वेळ कुठलीच शुभ नसते किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो असे दादा धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.' आणि खरच ते योग्य पण आहे. म्हणून माणसाने वेळीच जागे होऊन आपल्याला सोपवलेले काम योग्य करणे होय. कारण वेळ गमावणे म्हणजे शक्ती गमावणे होय. म्हणून वेळेचा सदुपयोग करून घेऊन आलेल्या संधीचे सोने करणे. कारण जेव्हा एखादी संधी आपल्याला येते ही वेळ पुन्हा येईलच असं काही नाही. कारण वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. आपल्या हातून होणारे योग्य काम, कर्म हे आपण वेळेवरच पार पाडायला हवे. या साऱ्या जगाला व्यापून राहिलेला काळ हा कधी संपतच नाही. अनेकदा असं वाटतं की आज उद्यासाठी जगावं! पण काळाचा दगड डोक्यावर कोसळला की उद्याचा दिवस पाहायला मिळत नाही! कारण हा कठोर काळ म्हणजे साक्षात मृत्यू होय. आपण आपल्या जीवनाचं सुरेल गाणं गात असतो तेव्हा काळ आपल्या जीवन सतारीच्या तारा केव्हा तोडतो ते समजत नाही. कालच्या आठवणी मनात ठेवून उद्याच स्वागत करावं पण काळ उद्याच दर्शन घडू देईल की नाही सांगता येत नाही. " बळें लागला काळ हा पाठीलागी जीवा कर्मयोगें जनी जन्म माझा झाला परी शेवटी काळ मुखी निमाला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे घडीने घडी काळ आयुष्य नेतो" ----- समर्थ माणसाचा जन्म झाला तेव्हा त्याचा मृत्यू अटळ झालेला असतो. जन्म आणि मृत्यू या दोन मधल्या अंतरातील वेळ म्हणजे आपल्या हातून घडून येणारी कर्म. आपण केलेले कर्मच आपल्याला मृत्यूनंतरही अनंत काळ जिवंत ठेवत असतात. या जगात किती आले किती गेले तरी आयुष्यातील वेळ कधी कुणासाठी थांबली नाही आणि थांबणारही नाही. म्हणून वेळीच जागे होऊन वेळेचा सदउपयोग घेणे योग्य होय.कारण क्षणक्षणाने आयुष्य संपत आहे......!!! 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

No comments:

Post a Comment