बालविवाह रोखले गेले पाहिजे जेव्हा स्त्री आणि पुरुष धार्मिक विधीनुसार एकत्र येतात तेव्हा त्यास विवाह म्हणतात. दोन शरीरच नव्हे तर दोन मन एकत्र जोडणे म्हणजे विवाह असते. परंतु एकोणिसाव्या शतकात हिंदू समाजात एक वाईट प्रथा होती ती म्हणजे बालविवाह होय. जेव्हा दोन शरीर दोन मन अपरिपक्व अवस्थेतील असतात तेव्हा त्यांना विवाहाच्या बंधनात बांधणे म्हणजे बालविवाह होय. ही बालविवाहाची अनिष्ठ प्रथा मोडून काढण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी बंड पुकारले. पूर्वीच्या काळी या बालविवाह प्रथेचा इतका अतिरेक झाला होता की, मूल गर्भावस्थेत असतानाच त्यांचा विवाह करत असत. या प्रथेस 'पोटालाकुंकू 'लावणे असे म्हणत होते. परंतु गर्भावस्थेतील काही रोगामुळे ते मूल मृत्यू पावले तर संपूर्ण जन्मभर त्या स्त्रीला विधवेचे नरका प्रमाणे वाईट जीवन कंठावे लागत असे. अशा या वाईट प्रथेविरुद्ध स्वामी दयानंद सरस्वती यांनी बंड पुकारून लोकांना पेटविले की, शास्त्राच्या नियमानुसार स्त्री-पुरुषांचे योग्य वयातच लग्न करावे. नियमांचे पालन करूनच विवाह करण्यात यावा. आणि जे नियमभंग करतील ते जीवनात तर दुःखी होतातच पण त्याच बरोबर ते अनैतिकतेची गुन्हेगार ठरतात. स्वामीजींनी बालविवाहास विरोध करून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य याला प्राधान्य देऊन राष्ट्राचा समाजाचा विकास कसा होईल हे समाजाला पटवून दिले.काही कारणामुळे स्त्रियांना खूपच कमी लेखले जात असे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. समाजातील अनिष्ट चालीरीती ,रुढी-परंपरा, वाईट प्रथा ,अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव या सर्व कारणांमुळे बालविवाह होतात. आजही आपण बघत आहोत समाजातील काही भागात बालविवाह होतात. हे बालविवाह रोखण्यासाठी समाज हा शिक्षित झाला पाहिजे. मानव प्राणी हा सतत समाजात वावरत असल्यामुळे तो समाजशील देखील आहे. म्हणून जर हा मानव निरक्षर असेल तर तो समाजाच्या नुकसानीला कारणीभूत ठरतो. आजचे युग हे विकासाच्या मार्गावर धावणार युग आहे, आधुनिक यांत्रिकीकरणाचे युग आहे. जुन्या ,चालीरीती,परंपरा यांचा नाश करून नवीन कल्पक समाजाची निर्मिती करण्याचे कार्य मानवाच्या हाती आहे .चांगले विचार, चांगले आचार, चांगले वर्तन हे शिक्षणाच्या माध्यमातून साध्य होत असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती साक्षर होणे काळाची गरज आहे. व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती नियमांचे'पालन करेल. नियमांचे पालन झालेले असल्या कारणाने बालविवाह होण्यास प्रतिबंध घालता येईल. 1978 च्या कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावरच विवाह करण्यात यावा. या कायद्यानुसारच समाजातील प्रत्येकाने याचे जाणीवपूर्वक पालन करून आपल्या मुला मुलीचे विवाह कायद्याच्या चौकटीतच राहून विवाह करून द्यावे तरच बालविवाह बंद होतील, रोखता येईल. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता .हदगाव जि. नांदेड

No comments:

Post a Comment