लेख (5) निर्माण झालेली कुटुंब अवस्था आपल्या भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून एकत्र कुटुंब पद्धती नांदत आहे. परंतु ही एकत्र कुटुंब पद्धती बहुतांशी लोप पावत आहे. प्रत्येक मनुष्याला आपल्या कल्पनाविश्वात एक सुंदर कुटुंब असाव असं वाटतं. ज्यावेळी कल्पनाविश्व सत्यात उतरते त्यावेळी त्याची कुटुंबाची अवस्था हि त्याने पाहिलेल्या कल्पना विश्वातील कुटुंबासारखी कदाचित असेलही नसेलही. आजची परिस्थिती पाहता आपल्याला बहुतांशी विभक्त कुटुंब पद्धती दिसत आहे. संयुक्त कुटुंब हे फार मोजक्याच ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते. प्रत्येकाची विचारसरणी, त्यांच्या अडीअडचणी व उद्भवणार्‍या बऱ्या-वाईट परिस्थितीचा विचार केला असता आजकाल विभक्त कुटुंब पद्धती जास्त अवलंबिली आहे. परंतु पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत होती. या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात आनंदी आनंद वाटायचा. या एकत्र कुटुंब पद्धतीत लहान मुलं ,मोठी माणसे ,आजी आजोबा, बहिण ,भाऊ , काका काकू, आई बाबा हे सर्वजण एकत्र राहत असल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण तसेच सुखदुःखात आपली माणसे दिसत होती. प्रेम ,आपुलकी ,आणि जिव्हाळा या त्रिवेणी संगमावर कुटुंब आनंदाने वास करतो. अशावेळी आपलं कुटुंब आपलं घर आपल्याला मंदिरासारखंच वाटतं. या कुटुंब मंदिरातील माणसं देवासारखे वाटतात. मुलं फुलासारखी वाटतात. अशा या आनंददायी कुटुंबातून शांतता,समाधान आणि सुखाचा सुगंध येत असतो. म्हणूनच आम्हाला आमचं कुटुंब सुंदर असाव असं वाटतं. ज्या कुटुंबात आनंद वाटेल ते कुटुंब घराला घरपण देतात. याउलट आजची विपरीत परिस्थिती म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत 'हम दो हमारे दो' हेच पाहायला मिळते. घरात जास्त माणसांची वर्दळ या कुटुंब पद्धतीत नको वाटायला लागते. आपला छोटासा परिवार व आपण असे एवढ्यापुरतेच मर्यादित राहायला आवडते. त्यात नको आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना ना त्यांचा कुरवाळीत असलेला हात. या सर्व सुखापासून लहान मुलं फार पारखी होऊन जातात. आपल्या कुटुंबात आजी आजोबा काका काकू असावेत आपले लाड त्यांनी पुरवावेत असं लहान मुलांना फार वाटतं. परंतु हे सर्व एकत्र जमण्याचा प्रसंग या विभक्त कुटुंबात फार कमी अनुभवाला येतं. एखादा सण, उत्सव, लग्न प्रसंग अशा विविध प्रसंगी पाहायला मिळते. कुटुंबाच्या ह्या निर्माण झालेल्या दुरावस्था बदलत्या काळाप्रमाणे जरी बदल्या तरी कुठेतरी कुटुंब व कुटुंबातील नात्यांची जपणूक व्हायला हवी. आपापसात प्रेम ,जिव्हाळा, आपुलकी व नात्यातील एकोपा राहायला हवा, दिसायला हवा,असायला हवा. कारण आपली भारतीय संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीची आहे. ही आपली संस्कृती जपत जपत माणसाने जगावे आणि जगत जगत आपली संस्कृती जपावी. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.

No comments:

Post a Comment