*प्राथमिक शिक्षणाचे महत्व* मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे शिक्षण होय. शिक्षण ही एक पवित्र गंगा आहे. या पवित्र गंगेतून शिक्षणाचे पवित्र आपण राखले पाहिजे, जपले पाहिजे. मानवी जीवनात प्राथमिक शिक्षण ही माणसाची प्राथमिक गरज आहे. प्राथमिक शिक्षण यशस्वीपणे घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाचे उद्दिष्ट गाठू शकते. कारण प्राथमिक शिक्षणाची पहिली पायरी सफलतापूर्वक पार केल्यामुळे व्यक्तीस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते. खरं तर शिक्षण हे जीवन विकासाचे साधन आहे. माणसाला माणूस बनवण्याचं शिक्षण एक माध्यम आहे. “आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.” असे डाॕ.जॉन या विचारवंताचे मत आहे. कोणत्याही व्यक्तीचा प्राथमिक शिक्षणाशी जेवढा घनिष्ठ संबंध असतो तितका फारसा संबंध माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाशी येत नाही. प्राथमिक शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान अनंतकाल टिकून राहते. सदा स्मरणात राहते. प्राथमिक शिक्षणातूनच व्यक्तीची जडणघडण होते. व्यक्तीचा जीवनस्तर उंचावयाचा असेल तर प्राथमिक शिक्षणातून योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. शिक्षणामुळे चांगल्या वाईटाची कल्पना येते, भावनिक परिपक्वता येते. प्राथमिक शिक्षणाचा माध्यमातून बालकाचा भावनिक समतोल , सवयी आणि वृत्ती, बालकाचे शारीरिक, मानसिक आरोग्य, तसेच त्याच्यामध्ये असलेली सुयोग्य अभिरूची हे जाणून घेऊन त्यांच्या या विकासावर अधिक भर दिला जावा. प्राथमिक शिक्षणात लेखन-वाचन या ज्ञाना सोबतच वरील बाबींचा विचार अधिक प्रमाणात करण्यात यावा. तरच प्राथमिक शिक्षण यशस्वी होईल. विनोबा भावे यांनी म्हटले आहे 'यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.' कोणत्याही व्यक्तीचा यशाचा पाया म्हणजेच प्राथमिक शिक्षण होय. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा चौफेर विकास घडून येतो. सारा समाज ज्ञानी, स्वावलंबी झाला तरच समाजात शांतता, सुव्यवस्था व बंधुभावाचे वातावरण असेल, दिसेल. म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित होणे आवश्यक आहे. सामान्य माणसास शिक्षणापासून वंचित ठेवणे योग्य नाही.प्रत्येक व्यक्तीस शिक्षण मिळायलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. कारण शिक्षणामुळे व्यक्तीला समाजात विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त होतो. शिक्षणामुळे मानवी जीवन सुरक्षित व संस्कारशिल बनते. योग्य संस्कार आणि योग्य शिक्षण यांची सांगड घालून समाजबांधणीसाठी चारित्र्यसंपन्न नवीन पिढी निर्माण करता येणे हेच खरे शिक्षणाचे काम आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका ©️श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.

No comments:

Post a Comment