लेख... स्वच्छता हीच ईश्वर सेवा माणसाने जीवन जगत असताना जीवनाची सार्थकता जाणली पाहिजे. स्वच्छता ही आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे जाणून माणसाने वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेची जपणूक केली पाहिजे. स्वच्छता हा आरोग्यसंपन्न जीवनाचा महामंत्र आहे. माणसाने स्वतः पासून स्वच्छता सुरू करावी व मग सामाजिक स्वच्छतेकडे वळावं. दीर्घायुष्य लाभण्यासाठी स्वच्छतेचा वसा घेणे फार आवश्यक आहे. स्वच्छता म्हणजे प्रसन्नता ,स्वच्छता म्हणजे आनंद, पवित्रता ,निर्मळता, सुंदरता. 'स्वच्छता म्हणजे परमेश्वर होय. ' गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे म्हणत असलेले संत गाडगे बाबा एक महान संत होऊन गेले. स्वच्छतेचा वसा उचलून जन माणसातील अंधकार दूर करण्यासाठी संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. संत गाडगेबाबांनी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा बुरसटलेले विचार दारिद्र हे सर्व दूर करण्यासाठी प्रभावी माध्यम वापरून ते दूर करण्याचा अतोनात प्रयत्न केला आणि दिवसा गावातील रस्ते झाडून स्वच्छतेचा जणू वसा हाती घेतला. कारण आपलं जीवन अनमोल आहे. या अनमोल जीवनात आनंदाचे तरंग निर्माण करण्यातच खरा मर्म आहे. जीवनात स्वच्छता आचार विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. संत गाडगेबाबा यांनी अखंड पन्नास वर्षे लोकांच्या पायाखालील रस्ते स्वच्छ करण्यासाठी घालवली. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनातील द्वेषभाव दूर करण्यासाठी लोकांच्या मध्ये असलेलीअंधश्रद्धा दारिद्र्यता दूर करण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम वापरले. स्वातंत्र्य ,स्वालंबन, स्वाध्याय आणि स्वाभिमान ही तर स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत. आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यायची असते. निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आयुष्यात आपण आयुष्यभर स्वच्छतेचा विचार करायला हवा. आपला जीव ओतून आयुष्यभर जिवाची पर्वा न करता संत गाडगेबाबांनी जपलेला , आचारलेला स्वच्छतेचा जीवनमंञ आपल्यालाही आज आचारता येईल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनी स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झाले तर आपल्या सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य उजळायला वेळ लागणार नाही असं म्हणायला हरकत नाही. स्वच्छतेच्या ध्येयापर्यंत जायचे असेल तर घर, शाळा हे स्वच्छतेच्या संस्काराचे, सर्वात मोठे केंद्रबिंदू आहेत. त्यातून परिसरांत गावाच्या स्वच्छतेचा कृतिशील विचार रुजावा. कारण स्वच्छता ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता हा संस्कार आहे. स्वच्छतेचे बीज मुळापासून रुजायला हवे. प्रत्येकात भिनायला हवे. मोठ्यापासून ते लहानापर्यंत साऱ्यांनीच स्वच्छतेचे महत्व आंतरिकदृष्टीने समजावे. कारण, स्वच्छता ही जबरदस्ती नाही. एक जगण्याचे सूत्र आहे. म्हणूनच स्वच्छता ही ईश्वराचे दुसरे नाव आहे. या सजीव सृष्टीचे सौंदर्य खूलवायचे असेल तर स्वच्छतेचे महत्त्व समजावे. अन् अवघ्या समाजाचे पाऊल स्वच्छ क्षितिजाकडे वळावे. आणि ही सृष्टी मंगलमय, हिरवीगार, प्रदूषणमुक्त बनावी हेच आपले ध्येय.' ज्यांच्या अंगणात उमटेल स्वच्छतेचे पाऊल., नाही लागणार त्यांच्या घरी रोगराईची चाहूल' म्हणूनच सांगून गेले संत गाडगेबाबा ,'स्वच्छतेचा घेऊ वसा हाच निर्धार ठेवू जीवनाचा' ' स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे' गाडगेबाबांचा एकच मंत्र जाणूया आपण स्वच्छतेचे तंत्र. स्वच्छतेचे तंत्र जाणून आपण स्वतः आपल्या घरापासून, गावापासून, शहरापासून ते देशापर्यंत स्वच्छतेचा मंत्र ठेवून कार्य आपण करूया व, स्वच्छ निर्मळ, सुंदर भारत करुया. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता .हदगाव जी. नांदेड.

No comments:

Post a Comment