लेख...... कर्माची पुण्याई, पापाचे फलित माणसाने दुसऱ्या बद्दल चांगला विचार करणे हे पुण्याचे काम आहे. व दुसऱ्या बद्दल वाईट विचार करणे म्हणजेच पापाचे भागीदार होय. इतरांच्या कल्याणात पुण्यकर्म असतं, व इतरांना दुःख देण्यात पापकर्म ठरतं. आपण स्वतः ठरवायचे आपण कसे वागायचे ते आणि आपल्या पदरात पुण्य पाडायचे का पाप पाडायचे ? हे ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न आहे. माणसाने सर्वांशी चांगले वागावे व आपल्या प्रमाणे योग्य प्रकारे वागावे. इतरांचे सुखदुःख हानि लाभ हे आपलेच आहे असे समजून वागणे श्रेष्ठ प्रकारचे असून पुण्य मिळवणे होय, याउलटचे वागणे जे आहे हे वर्तन वाईट आहे असे समजून पापकर्म होय. ज्या कर्मात आपण हृदय ओततो ते कर्म श्रेष्ठ होय. दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेले कर्म हे पुण्यकर्म समजाव. अशी कर्मफुल घेऊनच आपण समाजाच्या सेवेसाठी कार्यरत असाव. आणि ही सेवामय कर्मफुलांची उधळण जिवंत आहे तो पर्यंत करत राहावी. आणि पुण्याचे वाटेकरी व्हावे. ' कर्मे करावी चांगु' हा संत ज्ञानोबांचा विचार आपले जीवन जगत असताना सदैव ध्यानीमनी असावा. आपल्या हातून घडणारी कामेच चांगली आहे की वाईट आहेत हे पाहूनच विचार करून वर्तन करावे. ज्या चांगल्या कर्माने जगावर चांगले पडसाद उमटतात ते कर्म करणे म्हणजे पुण्य होय. आणि हानिकारक कर्म करणे म्हणजे पाप होय. जे कर्म केल्याने आपला आत्मा प्रसन्न राहतो म्हणजेच आपल्यामध्ये भीती, शंका ,लज्जा निर्माण होत नाही अशी कर्म म्हणजे पुण्य होय. जे आपल्या हृदयात सतत सलत राहते आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते शंका निर्माण होतात लाज वाटते अशा गोष्टी म्हणजे पाप करणे होय. हे पाप जरी प्रथमतः प्रातःकाला सारखे लखलखणारे चमकत असले तरी त्याचा शेवट मात्र रजनीसारखा काळोखरुपी असतो. पाप हे असे विघ्न आहे की ज्याने आपले साहस, धैर्य आपला मान ,सन्मान अगदी क्षणार्धातच नष्ट करते. आपल्या वाईट कर्माचा परिणाम वाईटच असतो. आणि चांगल्या कर्माचा परिणाम चांगलाच असतो. इतरांना सहकार्य करणे म्हणजे चांगले कर्म, व इतरांना मदत न करणे म्हणजे वाईट कर्म. एखादी म्हातारी व्यक्ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली तर त्या व्यक्तीला हाताला धरून उठवून त्या व्यक्तीचीे मदत करणे म्हणजे पुण्यकर्म होय, उलट पडलेल्यांना तुडवत जाणे म्हणजे पाप कर्म होय. सत्याच्या बाजूने उभे राहून न्यायाची भूमिका मांडणे म्हणजे पुण्य होय, आणि अन्यायाशी तडजोड करणे म्हणजे पाप होय. 'पापाचा घडा भरला की तो फुटल्याशिवाय राहत नाही' असं म्हणतात म्हणूनच आपणच आपल्या पाप-पुण्याचे भागीदार असतो. आणि या आपल्या हातून घडून येणाऱ्या चांगल्या पुण्यरुपी कर्माला सेवेची किनार लाभली असेल तर पुणे कर्म चिरंजीव ठरतात. आणि अशा कर्मातच माणसाला अमरत्व प्राप्त होते. अशा या पुण्य कर्माच्या घड्याने आपले जीवन सार्थक होते. आणि पाप रुपी कर्माने आपले जीवन निरर्थक ठरते. आणि हे निरर्थक जीवनात आलेले पाप आपल्याला शांत राहू देत नाही समाधानी आयुष्य जगू देत नाही.आपल्याला सदैव दुःख वाटते. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचे मूळ कापले तर ते वृक्ष नष्ट होते, त्याचप्रमाणे पापाचा त्याग केल्याने दुःख नष्ट होते. आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक जीव कर्म करण्यात स्वतंत्र आहे. जेव्हा तो पाप करतो तेव्हा तो ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये पराधीन असल्यामुळे आपल्या पापाची फळे भोगतो. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचे पाप अथवा पुण्याचे फळ भोगावे लागते. आपल्या जीवनातील दुःख नष्ट करायचे असेल तर आपल्याला पुण्यकर्म घडून येईल असेच वर्तन करावे लागेल. आपले हे जीवन सार्थकी लावायचे असेल तर आपल्या हातून पुण्यकर्म घडायला हवे. या जगण्यावर ज्यांना अभिमान वाटतो या जगण्यावर ज्यांच प्रेम असेल त्यांनी आपल्या हातांच्या या कर्माच्या सामर्थ्यावर ही पुण्य कर्माची फुलं भरभरून वहावीत. व आपले जीवन चांगल्या पुण्य कर्माने अमरत्व ठेवावे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका..... श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हादगाव जिल्हा नांदेड.

No comments:

Post a Comment