श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( दि.05-05-2020) लेख..... मैत्री , मित्रता 'मैत्री म्हणजे ईश्वराने मनुष्याला दिलेले बक्षीस आहे'. ईश्वराने आपल्याला मैत्री स्वरूपात जे बक्षीस दिले त्याची जोपासना आपण निस्वार्थपणे करायला पाहिजे. कारण मैत्री जेव्हा निर्हेतुक असते तेव्हा ती दीर्घकाळ टिकते. मैत्रीत जर का स्वार्थ आला तर ती मैत्री संपण्याच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणून आपली मैत्री ही दीर्घकाळ टिकवायचे असेल तर आपल्यामध्ये निस्वार्थी भावना असणे आवश्यक आहे. असं म्हणतात ' या जगी सन्मित्ञाहून श्रेष्ठ संपत्ती नाही'. आपल्या मनामधील सर्वकाही सांगण्याची एकच जागा आहे ती म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्या सुखदुःखात आणि आपल्या डोक्यावर कोसळलेल्या संकटातून मुक्त होण्यासाठी आपण घेतलेला आधार म्हणजे आपला मित्र ,मैत्रीण होय.' मैत्री म्हणजे सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार होय' असे स्पॅनिश या विचारवंताचे मत आहे. जेव्हा काही आपल्याजवळ सांगण्यासारख असतं तेव्हा आपण ते मित्रास, मैत्रीणीस सांगतो कारण दुःख वाटून घेतले की हलकं होतं आणि सुख वाटून घेतलं तर ते वाढत. आपल्या या जीवनात मैत्रीसारखी आनंद व उत्साह देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आपल्या हृदयात अपार सेवा असली म्हणजे आपल्याला सर्वत्र मित्रच दिसतात. मैत्रीच्या या रोपट्याला नेहमी मायेचे,प्रेमरूपी पाण्याचे सिंचन देणे आवश्यक असते. आपला खरा मित्र ,मैत्रीण तोच किंवा तीचअसतो जे तोंडावर कटू बोलले तरी परंतु माघारी आपली स्तुती करतात,आपल्याबद्दल चांगले विचार प्रकट करतात. माणसाने मैत्रीवर नेहमी विश्वास दाखवावा, कारण विश्वास नसलेली मैत्री कधीही खुंटते. आपल्यामध्ये असलेली जी मैत्री आहे या मैत्रीला शञूरूप प्राप्त होणार नाही याची काळजी सदैव घ्यायला हवी. तेव्हा पेटलेल्या हृदयात शत्रुत्व निर्माण होता कामा नये. कारण अरण्य जाळणाऱ्या वणव्याचा वायु मित्र होतो, परंतु तोच वारा दिवा विझवून टाकतो म्हणजेच दिव्याचा शत्रू होतो. यासाठी आपला मित्र शत्रू होणार नाही याची सतत खबरदारी घेतली पाहिजे. कारण शञूत्व हा मैत्रीचा अंत असतो. मोराला पंख पसरून आनंदाने मोर पिसारा फुलवून नाचण्यासाठी जशी पावसाची गरज असते तशीच आपलं जीवन आनंदाने घालवण्यासाठी आपल्याला मित्राची मैत्रीणीची गरज असते. जेव्हा आपल्या बेचैन, ञस्त, अस्वस्थ , अशांत मनात विचारांचे काहूर निर्माण झालेले असते तेव्हा आपल्याला शांती, स्वास्थ्य देण्याचे काम आपले मित्रच, मैत्रीणच करत असतात. आपल्या जीवनात आनंदाची उधळण करीत असतात. म्हणून मैत्रीचा टिपून ठेवणारा हा टिपकागद आपण सदैव टिकवून ठेवला पाहिजे. ईश्वराने मनुष्याला दिलेल्या मैत्रीच्या या बक्षीस ला आपण सर्वांनी सदैव जपले पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️

No comments:

Post a Comment