ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे.

No comments:

Post a Comment