मातृदिन

◆ मराठी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ◆

 ●|| पिठोरी अमावस्या ||●

सर्वांना मराठी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छांसह आदरपूर्वक नमस्कार!

श्रावण दर्श अमावस्या!
या श्रावण दर्श अमावस्येला, "पिठोरी अमावस्या"  असे दोन वेगवेगळे सण आपण साजरा करीत असतो!

 "पिठोरी अमावस्या" अर्थात, "मराठी मातृ दिना" बद्दल माहिती घेणार आहोत!

आई! माता! जननी!
आई जी जन्माची शिदोरी!
जी उरत ही नाही आणि पुरत ही नाही!
मुलगा/ मुलगी जन्माला यावीत म्हणून उपवास, पुजाविधी करणारी आई!
स्वतः नऊ महिने बाळाचे ओझे सांभाळणारी आई!
मूल जन्माला आल्यावर त्या बाळाचे कोड-कौतुकात संगोपन करणारी आई!
जीवनभर पुरतील तरीसुद्धा उरतील इतक्या संस्कारांची शिदोरी देणारी आई!
मुलाचे आजारपण, शिक्षण या काळात स्वतः उपाशी राहुन मुलाची काळजी घेणारी आई!
वात्सल्य व त्यागाची मूर्ती म्हणजे आई!
या आईचे ऋण किती व्यक्त केलेत तरीसुद्धा अनेक जन्म ऋण फिटणार नाहीत, अशी देवता स्वरुप आई!
ज्या आईची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जिला अपत्यसुख लाभत नाही, अशी आई जे व्रत घेते; त्या व्रताला "पिठोरी अमावस्या व्रत" म्हणतात!

हे "पिठोरीचे व्रत" एक आई आपल्या बाळाच्या जन्मासाठी, त्याच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी करते; म्हणूनच आजचा हा दिवस "मराठी मातृ दिन" म्हणून साजरा केला जातो!
नव्हे! तो करायलाच हवा!
कारण आई आपल्या वात्सल्याने, त्यागाने, संयमाने, सहनशक्तीने आपल्या मुलांची, कुटुंबिय, नातलग म्हणजेच संपूर्ण घरादाराची सेवा करते तिच्याविषयी आजच्या या "मातृ दिनी" तरी, तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे!

म्हणून आज आपण या पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृ दिन साजरा करु या! महाराष्ट्रभरात या मातृ दिनाचा जल्लोष पोहोचवू या!

आता वळू या, पिठोरी अमावस्येच्या व्रताकडे!

वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्या मातेला बाळ हवे असते अथवा ज्या मातेची मूले अल्पजीवी ठरतात, अशा माता आपल्याला बाळ व्हावे अथवा जन्माला आलेले बाळ दीर्घायुषी व्हावे अशा माता हे पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ठ योगिनी या पुजेच्या देवता आहेत.
या व्रताच्या दिवशी म्हणजेच श्रावण अमावास्येला माता उपवास करतात. सायंकाळी सर्वतोभद्रमंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्तीदेवतेच्या मूर्ती स्थापन केल्या जातात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपा-या मांडून योगिनींचे आवाहन केले जाते. या चौसष्ठ योगिनी म्हणजेच एक मानव म्हणून उपजीवेकेसाठी उपयुक्त असलेल्या चौसष्ठ कला आहेत. त्यांचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करतात. या दिवशी “पिठाचे दिवे" करुन पूजन करण्याच्या रुढीमूळे या सणाला "पिठोरी अमावस्या" हे नाव मिळालेले आहे!
या पिठाच्या ६४ योगिनींच्या पूजेसोबतच पिठोरी अमावास्येला, पिंड दान करून ते मृत पूर्वजांचे आशीर्वाद घेतात.
अशी ही स्त्रीला पुत्रवती बनविणारी अमावस्या, "मातृदिन" म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावस्येलाच ‘दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणतात.
अर्थातच व्रतसांगतेला खीर- पुरणपोळीचे जेवण बनवितात.

अशा रितीने हे पिठोरी अमावस्या व्रत पिठोरी अमावस्येला मोठ्या भक्तीभावाने करण्यात येते!

या पिठोरी व्रताच्या निमित्ताने "मराठी मातृ दिन" साजरा होत असतो!

या अनुषंगाने आम्ही इतकेच सांगू इच्छितो की, "आपल्या जन्म आणि दीर्घायुष्यासाठी, आपल्या मातेचे कष्ट व त्याग हे आम्हावर ऋण आहे! या ऋणातून अंशतः का होईना, मुक्त होण्यासाठी आपण दररोज आपल्या मातेची सेवा करु या, मातेचे पांग फेडू या! हे पांग फिटण्यासाठीच आपण
घरोघरी दररोज मातृ दिन साजरा करु या!", अशा अर्थाची चारोळी सादर करुन; आम्ही आपला निरोप घेतो!

आपल्या जन्म आणि दीर्घायुष्यासाठी,

मातेचे कष्ट व त्याग हे आम्हावर ऋण;

करु या दररोज मातेची सेवा, फेडू पांग,

घरोघरी साजरा व्हावा रोज मातृ दिन!


No comments:

Post a Comment