मनातल्या भावना मुखी ओवल्या ( गीत )

हसू जर आलं तर,
खळखळून हसावं...
   हास्य असं की जे,
   मुखावर ओसंडून वाहावं...!!

आलाच कंठ दाटुन,
तर रडावं मनसोक्त...
   साठले जे भाव सारे,
   करावं त्यांना ही मुक्त...!!

बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
   माणुस मात्र असावा,
   अगदी जवळचा फक्त....!!

कौतुक वाटलं करावसं,
तर ते मनापासून यावं...
   खोटं आणि वरवरचं,
   तर ते कधीच नसावं...!!

थोडसं राखावं भान,
कुणावर करताना टीका...
   नंतरच लक्षात येतात,
   चुकून घडलेल्या चुका....!!

प्रेम करावं कुणावरही
त्याला सीमा नसावी....
   भावनाच इतकी गोड,
   जी अखंड जपावी...!!

रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
   फार काळ टिकु नये,
   असावा एखादी घटका....!!

शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
   बोलून मिटवावं सारं,
   हेच सगळ्यात रास्त...!!

कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
   झालंच जर कधी,
   चुकून एखादं भांडण...!!

अती भावुक नसावं,
नसावं अती कोरडं...
   समसमानच राखावं,
   दोघांचंही पारडं...!!

जरी असतील नेहमी
सगळेच आपणा सहित,
   कुणालाच कधी धरु नये,
   कायमचंच गृहीत...!!

केलेल्याची जाणीव,
सदा मनात असावी...
   कृतार्थ भावाची रेषा,
   सदा डोळ्यात दिसावी...!!

असावा विश्वासाचा,
एक भरभक्कम पाया...
   त्याशिवाय सारं असुन,
   सगळचं जाईल वाया....!!

गोष्टी छोट्या छोट्या,
पण ठेवलं जर भान...
   नात्यांची सुरेल गुंफण,
   भासेल अधिकच छान....!!

No comments:

Post a Comment