*शिक्षकांनी शिक्षकांसाठी केलेली फ्रेश मॉर्निंग बुलेटिनची सेवा* सोशल मीडिया मध्ये फेसबुकच्या नंतर व्हाट्सएप्पचा वापर खुप वाढला. परंतु लोक याचा चांगला वापर करण्याऐवजी रोज सकाळी सुप्रभात आणि संध्याकाळी शुभ रात्रीच्या पोस्ट टाकून परेशान करतात, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. ग्रुपमध्ये तर सांगायला सोय नाही काही महत्वाचे तर काही खुपच तकलादु पोस्ट पाहण्यास मिळतात. त्यामुळे सर्व सदस्य मंडळी कंटाळून जातात. ग्रुप सोडता ही येत नाही आणि संदेश स्वीकार केल्याशिवाय पर्याय नसतो. अश्या या विपरीत परिस्थितीत "नासा ग्रुप धर्माबाद" चे एडमिन असलेले प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक ना. सा. येवतीकर यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनी  *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* पोस्ट करण्यास सुरुवात केली. ज्यास नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले असून आज तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहेत. शाळेतील शिक्षक आणि मुलांना उपयोगी पडेल अशी सेवा ते रोज सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत मोबाईलवर अविरतपणे पोस्ट करीत आहेत. *कशी चालू झाली ही बुलेटिन* याबाबत माहिती जाणुन घेतली असता मिळालेली माहिती अशी शाळेत परिपाठाच्या वेळी काही माहिती एकत्रित मिळत नाही तेंव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांची खुप धावपळ होते. ती धावपळ कशी कमी करता येईल या उद्देश्याने ह्या बुलेटिनचा जन्म झाला. सुरुवातीला फक्त एका ग्रुपच्या मर्यादेत असलेली ही पोस्ट काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. आज राज्यातील जवळपास 95 टक्के शिक्षकांच्या मोबाईलवर ही पोस्ट बघायला मिळते. या बुलेटिनचे अजून एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ना. सा. येवतीकर आपल्या खास निवेदन शैलीत बुलेटिनची ऑडियो क्लिप तयार करतात आणि जणू आपण आकाशवाणी वरील सकाळच्या बातम्या ऐकत आहोत असा भास होतो. यामुळे प्रत्येकजण या बुलेटिनची सकाळी सकाळी आतुरतेने वाट पाहत असतात. या बुलेटिनमधून गोंदियाचे संतोष रहांगडाले ( दिनविशेष ), कुंडलवाडीचे कुणाल पवारे ( ठळक बातम्या ), रायगडचे सौ. भारती कुंभार ( सुविचार ), धर्माबादचे सर्पमित्र क्रांती बुध्देवार ( विशेष माहिती ),वसमतच्या साहित्यिका सौ. संगीता देशमुख ( प्रश्नमंजुषा ), नागोराव सा. येवतीकर ( माझा वाढदिवस ), सेलूचे कवी शरद ठाकर ( गुगली ), मुंबईचे संजय नलावडे ( विचारधन ), नांदेडचे व्यकंटेश काटकर (विचारवेध ), किनवटच्या कवयित्री सुचिता नाईक (काव्यसरिता ) आणि हदगावच्या श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( बोधकथा ) याशिवाय गुगलयान असे अनेक उपक्रम या टीमकडून रोज राबविले जातात. तसेच या टीममधील सर्व सदस्य व्यवसायाने शिक्षक आहेत हे ही एक विशेष बाब आहे. म्हणजे सर्व शिक्षकांनी मिळून आपल्या शिक्षकांसाठी आवश्यक असलेली माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा ते प्रयत्न करतात. महाराष्ट्रात असे अनेक शिक्षक आहेत ज्यांचे ब्लॉग खुप सूंदर आणि माहितीपूर्ण आहेत त्यांची सर्व शिक्षक मंडळीना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या ब्लॉगची लिंकसुद्धा या बुलेटिनमध्ये जोडण्यात येते. *बुलेटिन ऑनलाइन रेडियोवर* नाशिकच्या गुरुकुल रेडियोच्या शेखर ठाकुर यांच्याशी संपर्क करून सदरील बुलेटिनची ऑडियो गुरुकुल रेडियोवर प्रसारित करून संपूर्ण महाराष्ट्रात ही बुलेटिन पोहोचली. तसेच या बुलेटिनची शैक्षणिक बाबीसाठी महत्वपूर्ण अशी नोंद प्रसिध्द शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दैनिक लोकमतच्या मंथन पुरवणीत " मोबाईल मुलांचा अभ्यासु दोस्त " या त्यांच्या लेखात घेतली हे विशेष.  आपल्या शाळेच्या अध्यापन कार्यानंतर राहिलेल्या वेळाचा सदुपयोग करताना त्यांनी छंद म्हणून सुरु केलेली सेवा आज अत्यावश्यक झाली आहे. काही कारणास्तव एखाद्या दिवशी बुलेटिन पोस्ट झाली नाही तर लगेच अनेक वाचक " आज बुलेटिन का आले नाही " असे प्रश्न विचारून त्यांना भंडावुन सोडतात. शब्दांकन : कुणाल पवारे, सहशिक्षक जि. नांदेड

No comments:

Post a Comment