कथा क्रमांक १८५

अभ्यास कथा ...

*॥ भिक्षापात्र ॥*

"राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.
प्रसंगच तसा होता.
त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
भिक्षा मागण्यासाठी आला होता.
राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
काय हवं ते माग. मिळेल.
भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
पण, वचन देण्याआधी विचार कर.
जमेल का?
भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.
राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...
...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.
रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.
भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.
पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.
राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?
भिकारी म्हणाला,
ते मलाही माहिती नाही.
हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
आणि
ते
*कशानेही भरत नाही!!"*

No comments:

Post a Comment