कथा क्रमांक १८८

पापाचा गुरू कोण?

एक पंडित काशीत अनेक शास्त्रांचे अध्ययन करून आपल्या गावात परतले.
संपूर्ण गावात बातमी पसरली की काशीहून कोणी एक पंडित, शास्त्रांचे
अध्ययन करून आला आहे आणि ते धर्मासंबंधी
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.

ही बातमी ऐकून गावातला एक शेतकरी त्याच्याकडे आला
आणि त्यांना विचारू लागला की
"पंडितजी तुम्ही आम्हाला हे सांगा की पापाचा गुरू कोण आहे?"
प्रश्न ऐकून पंडित गडबडले.....

त्यांनी धर्म आणि आध्यात्मिक गुरुंबद्दल तर ऐकलं होतं.
पण पापचाही गुरू असतो हे त्यांच्या समजण्याच्या
आणि ज्ञानाच्या पलीकडे होते.

पंडितजींना वाटलं की त्यांचे अध्ययन अजूनही अपूर्ण राहिलं आहे.
त्यामुळे ते पुन्हा काशीस निघाले.
अनेक गुरूंना भेटले, पण त्यांना
त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही.

अचानक एक दिवस त्यांची भेट एका गणिकेशी झाली.
तिने पंडितजींना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले,
तेव्हा त्यांनी तिला आपली समस्या सांगितली. गणिका म्हणाली,
"हे पंडित! ह्याचं उत्तर आहे तर अत्यंत सोप्पं,
परंतु उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला काही दिवस
माझ्या बाजूच्या घरात राहावे लागेल.

पंडितजी ह्या ज्ञानासाठीच तर भटकत होते.
ते लगेच तयार झाले.

गणिकेने त्यांची आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली.

पंडितजी कोणाच्याही हाताने बनवलेले अन्न खात नसत.
ते आपले नियम-आचार आणि धर्म प्रपंचाचे कट्टर अनुयायी होते.
गणिकेच्या घरात राहून ते आपले जेवण स्वतःच बनवत होते.

अशा प्रकारे दिवस जात होते.

परंतु प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडले नव्हते.
ते उत्तराची प्रतीक्षा करू लागले.

एक दिवस गणिका त्यांना म्हणाली, "पंडितजी! आपल्याला स्वतः जेवण
बनवण्यात अनेक अडचणी येत असतील.
इथे तुम्हाला बघणारा तर कोणी नाही.
आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपल्याला भोजन
तयार करून देऊ शकते.

ती म्हणाली "जर तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत,
तर मी दक्षिणेमध्ये प्रतिदिन आपणांस पाच सुवर्णमुद्रा देईन".

स्वर्णमुद्रांचे नाव ऐकून पंडित विचार करू लागला.
शिजवलेले अन्न आणि त्याबरोबर पाच सोन्याची नाणीही !

अर्थात दोन्ही हातात लाडू आहेत.

तो म्हणाला जशी आपली इच्छा."

पंडित तिला म्हणाला, "फक्त एवढं ध्यानात ठेव की माझ्या खोलीत
जेवण घेऊन येताना तुला कोणी पाहू नये."

पहिल्याच दिवशी अनेक प्रकारची स्वादिष्ट पक्वान्ने बनवून
गणिकेने त्या पंडिताच्या समोर ठेवली.

पण जेव्हा पंडित खाण्यास हात घालू लागला तेव्हा
तिने लगेच पंडितांचे ताट स्वतःकडे खेचले.

तिच्या या वर्तनामुळे पंडित क्रुद्ध झाला
आणि म्हणाला "हा काय मूर्खपणा आहे?"

त्यावर गणिका म्हणाली "हा मूर्खपणा नाही, तर हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे.

इथे येण्याच्या अगोदर आपण भोजन तर दूरच,
पण कोणाच्या हातातले पाणीही पित नव्हतात,

पण स्वर्णमुद्रांच्या लोभाने तुम्ही माझ्या हाताने बनवलेल्या
अन्नाचाही स्वीकार केलात !

तुमच्या प्रश्नाचं हेच तर उत्तर आहे की 'लोभ' हाच पापाचा गुरु आहे..

No comments:

Post a Comment