संस्कारमूर्ती परमपुज्य साने गुरुजी ( जन्म - २४- १२- १८९९) ( मृत्यू - ११-०६- १९५०) 'खरा तो एकची धर्म l जगाला प्रेम अर्पावे'l हे गोड गाणे पूज्य साने गुरुजींनी लिहिलेले आहे. या गीतातून गुरुजींनी जगाला संदेश दिला आहे तो किती अर्थपूर्ण आहे! हे आचरणात आणल्यावरच जाणवेल. आपण साऱ्यांनी गुरुजींच्या संस्कार पथावरून वाटचाल केली तर आपले आयुष्य उजळून जाईल. 'मेणबत्तीप्रमाणे जळावे आणि दुसर्याला प्रकाश देत स्वतः जळून जावे;' जीवनाचे असे वेगळे ध्येय मानून प्रत्यक्षात असेच जीवन जगलेले परमपुज्य साने गुरुजी म्हणजे माणुसकीचा धर्म जोपासणारा एक थोर संतपुरुष होय. पूज्य सानेगुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या पालगड येथे २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. त्यांची आई यशोदाबाई यांनी त्यांच्यावर उच्च जीवन मूल्यांचे संस्कार केले. आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करताना श्याम म्हणतो ' आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारी तीच'. माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु ,आई कल्पतरु . तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघायला, प्रेमळपणे बोलायला, तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर ,झाडा झाडांवर, प्रेम करायला तिने ते मला शिकवले. आईचे प्रेम जेथे असेल, ती झोपडी राजराजेश्वरचा ऐश्वर्याला ही लाजवील, हे प्रेम जेथे नाही ,ते महाल व दीवानाखाने म्हणजे स्मशाने होत. एवढं उत्कट प्रेम गुरुजींच्या हृदयात आईविषयी होते. आईच्या बोलण्यातून श्यामच्या मनाला संस्काररुपी शिकवण मिळत होती. समाजाची कामे करणारी माणसे देवाला प्रिय असतात. कोणी हीन - दिन,कोणी श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो, सगळेच समान असतात, अशा संस्कारांनी गुरुजी घडले होते. खादीचा कुर्ता व धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी अशी त्यांची साधी वेशभूषा असे. साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले व सर्वांवर भरभरून प्रेम करणारे साने गुरुजी म्हणजे मातृप्रेमाचा मंगलमय साक्षात्कारच. आईच्या प्रेमाची किंमत गुरुजीच्या मनाला समजलेली होती म्हणूनच आई आणि आई स्वरूप माऊलीच्या प्रेमावर अपार भक्ती करणार्या साने गुरुजीची तीन दैवत फार प्रिय होती. जन्म देणारी जन्मदाती आई, आपले पालन पोषण करणारी धरणीमाता आणि जन्मभूमी म्हणजे राष्ट्रमाता. या दैवतावर गुरुजींचे आतोनात प्रेम व भक्ती होती. पूज्य साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात किती व्यक्तिरेखा दडलेल्या होत्या ते ईश्वरालाच ठाऊक. गुरुजी लेखक होते, कवी, शिक्षक आणि सेवाभावी कार्यकर्ते होते. लोकसाहित्याचे संग्राहक होते. किसान मजुरांच्या चळवळीचे संघटक, प्रभावी वक्ते, दीन -दलितांचे अश्रू पुसणारे जिवलग, आंतर भारतीय प्रवक्ते या रूपात गुरुजी सर्वत्र समाजात वावरले. “ एक परार्धांश गांधी, एक परार्धांश रवींद्रनाथ, एक परार्धांश रामकृष्ण ही गुरुजींची आदर्शवत आहेत. गांधीजींची सेवावृत्ती, रवींद्रनाथ टागोरांची कवी वृत्ती आणि रामकृष्णांची भक्ती असे मिश्रण माझ्यात आहे. हात सेवेत राबवावेत, ओठ एखादे गोड गाणे गुणगुणत असावे, आणि भक्तीने सर्वांविषयीच्या प्रेमाने हृदय भरलेले असावे. ह्या तीन माझ्या क्षुधा आहेत.ह्या तीन वृत्ती समाधान पावल्या की मी समाधानी राहीन असे गुरूजी म्हनत असे. गुरुजींनी जे कार्य स्वीकारले त्या कार्याला उदात्ततेचे स्वरूप होते. दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहण्यासाठी सदैव तत्पर असायचे. त्यासाठी ते तन -मनाने अपार कष्ट करायचे. आपल्याजवळ जे जे आहे ते सर्वस्वी दुसऱ्याला देऊन टाकण्याची वृत्ती गुरुजींच्या ठायी होती. *'उक्ती आणि कृती'* यात कधीच फरक पडू द्यायचा नसतो. ही शिकवण गुरुजींनी आपल्या वागणुकीतून दिली आहे.दीन दुबळ्यांनविषयी अपार करुणा बाळगणारे मन सर्वांनाच लाभावे म्हणजे जगातील दुःखे आपण कमी करू,शकतो, असा विश्वास साने गुरुजींनी दाखविलेल्या 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या ओळीवरून यावा आणि आपल्याही मनाला निश्चितपणाने वाटत राहील की, गुरुजी चा सात्विक प्रेमाचा धर्म आपणही अंगीकारला पाहिजे. अशा या महान मायेच्या करुणासागर आत्म्यास व क्रांतिकारी गुरुजीस कोटी कोटी वंदन. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment