लेख.... *समाज क्रांतिकारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज* *" सामाजिक कार्याची अखंड* *अहोरात्र घेतली पणती हाती* *अस्पृश्योद्धार कार्य करुनी,* *स्त्रीशिक्षणास दिली गती.”* सर्व सद्गुणांचा उपासक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे त्यांचे वडील. यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे त्यांचे मूळ नाव होते. पुढे यशवंतराव हे योगायोगाने छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीसाहेबांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण शाहू छत्रपती असे केले. छत्रपती शाहू महाराज हे गोरगरिबांचे, दीनदलितांचे राजा होते, विद्वानांचे चाहते होते, कलावंतांचे ञाते होते, समाजसुधारकांचे दाता होते, शिक्षणाचे भोक्ते होते, स्थिर चित्ताने धोरण आखणारे होते. शाहू महाराज हे केवळ सामाजिक सुधारक नसून ते राजकीय सुधारकही होते. धोरणी आणि मुत्सद्दी होते. दूरदर्शी व खऱ्या लोकशाहीचे ते जनक होते. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारे सत्ताधीश होते. शाहू महाराजांचे धैर्य , उत्साह व शक्ती अमर्याद होती. समाजातील प्रस्थापितांशी समरस होण्यापेक्षा समाजातील अपंगांशी, दलितांशी आणि पददलितांशी ते समरस होत. दलित व पददलित समाज यांची अनेक बंधनातून मुक्तता करणे हेच त्यांच्या जीवनातील एकमेव ध्येय होते.' मानवी जीवनाविषयी अत्यंत सहानुभूती' हे शाहू महाराजांचे ब्रीदवाक्य होते. खरोखर ते एक महान सामाजिक पुरुष होते. छत्रपती शाहू महाराजांचे मन हे संवेदनशील होते. त्यांच्या न्यायाच्या जाणिवा प्रगल्भ होत्या. अन्यायाला, शोषणाला बळी पडलेल्या लोकांविषयी त्यांना सहानुभूती होती. शाहू महाराजांचे अंतःकरण त्यांच्या विकासासाठी तिळतिळ तुटत होते. छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे भावनिक पातळीवरचे वेगळेपण तर होतेच, पण दीनदुबळ्यांना माणसात आणण्याचे मार्गही त्यांना दिसत होते.2 एप्रिल 1894 साली त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली होती. आणि आपल्या सत्तेचा उपयोग गोरगरिबांना व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर जिवाचे रान केले. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले, शिवाय स्त्रियांच्या नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदेही अमलात आणून स्त्रियांची समाजाकडून आणि कुटुंबाकडून होणारी पिळवणूक थांबविण्याचा मोठा प्रयत्न केला.स्त्री जातीच्या संरक्षणाचे कायदे करून त्यांनी स्त्रीमुक्ती चळवळीस हातभार लावला.बहुजन समाजाचा विकास केला. तळागळातील लोकांना मायेचा स्पर्श दिला. बहुजन समाजासाठी न्यायावर आधारलेला सृष्टीची निर्मिती करून त्यांनी एक नवीन समाज उभा केला. थोडक्यात सांगायचे म्हणजे शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे बहुजन उद्धाराचे कार्यपरंपरा समर्थपणे पुढे नेली. शिक्षण हीच त्यांनी सर्व सामाजिक सुधारणांची व प्रगतीची जननी मानली. देशाची प्रगती करावयाची असेल तर शिक्षण म्हणजेच विद्या घेणे महत्त्वाचे आहे. " शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे". असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे त्यांचे मत होते. समाजातील मागासलेल्या वर्गाची बौद्धिक गुलामगिरी नष्ट होण्यास त्यास किमान प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या सुधारणेचा त्यांनी जोरकस पुरस्कार केला.छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील मागासलेल्या वर्गांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. समाज समृद्ध व बलवान करण्यासाठी बहुजन समाजातून उत्तम शेतकरी, उत्तम व्यापारी, उत्तम उद्योगपती, उत्तम सैनिक निर्माण झाले पाहिजेत आणि त्यासाठी शिक्षणगंगेचे पाट खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत नेले पाहिजे असे शाहू महाराजांना वाटत होते. सामान्य माणसांना प्राथमिक शिक्षणाच्या बळावर गरुड झेप घेता यावी म्हणून ते धडपडत होते. ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणानंतरचे माध्यमिक व उच्च शिक्षणाचे फायदे मिळावेत म्हणून त्यांनी ठीकठिकाणी वसतिगृह स्थापन केले. शिक्षणाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच त्यामागील त्यांचा मुख्य हेतू होता. प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारास महाराजांनी जे कार्य केले याला तोड नाही. *'ज्योतीबासवे रचिला पाया l शाहू झालासे कळस'll* असेच गौरवाने म्हणावे लागेल. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराजांनी प्रजेच्या उत्कर्षासाठी अनेक नवनवीन कायदे केले. दळणवळणात सुधारणा व्हावी यासाठी महाराजांनी अनेक रस्ते बांधले, पूल बांधले, छत्रपती शाहू महाराजांना कुस्त्यांची, नाटकाचीही फार आवड होती. म्हणून त्यांनी कुस्त्यांचे आखाडे निर्माण केले. महाराजांचा उदारपणा सर्वश्रुत असल्याने अनेक नाटक कंपन्या महाराजांच्या आश्रयाला गेल्या. महाराज अनेक ठिकाणी या कंपन्यांच्या प्रयोगाची व्यवस्थाही स्वखर्चातून करत. महाराजांनी 'राधानगरी' धरणाची निर्मिती केली., वेठबिगारी पद्धत बंद केली. आपले राज्य आदर्श असावे, तळागाळातील लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराज नेहमीच दक्ष असत .रयतेचा राजा म्हणजे काय हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज.अशा या महान लोकोत्तर व्यक्तीमत्वास त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 👏👏🙏🙏💐💐 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका) ता.हदगाव जि.नांदेड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment