*नेमीची येतो पावसाळा* धो-धो पाऊस बरसला मुसळधार काळ्या नभातुनी कधी बरसतो डोंगरमाथ्यावरी तर कधी स्पर्शतो गुलाब पाकळ्यातुनी *'नेमीची येतो मग पावसाळा'* असे आपण म्हणत असलो तरी, नित्यनेमाने आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतोच. पाऊस येण्यापूर्वी सारी धरती अगदी तापून निघालेली असते. दरवर्षी पावसाचे आगमन होत असते. प्रत्येक वेळी तो नवीन नव्या रंगरूपात येतो. इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाची सूर छेडीत येतो तो पाऊसच. प्रत्येकाला आपल्या तारूण्यातला पाऊस ओलाचिंब करतोच असे नाही. कोणाला हा पाऊस कसा वाटेल हे सांगता येत नाही. ' एकदाचा घृणा देऊन जाते शतदा शतदा तुझे पाऊसरुपी प्रतिबिंब आघात करून जाते.' असा हा पाऊस प्रत्येक वेळी नुतन संदर्भ नव्या रंगरूपात घेऊन येतो. या पावसाला सुद्धा भेदाभेद असतोच कधी कोणाला पाऊस आवडणारा असतो, तर कधी नाचणारा, साजिरा गोजिरा, धरणीला ओल देणारा हा पाऊस, तर कधी तन आणि मन भिजवणारा ओलाचिंब पाऊस, असतो तर सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांना सुखविनारा हा पाऊस असतो... पाऊस हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दरवर्षी पावसाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले जाते. हा पाऊस जसा माणसाचे मन प्रफुल्लित करतो, तसेच माणसाचे जीवननही फुलवितो. खरंतर माणसाच जीवनच खऱ्या अर्थाने या पावसावर अवलंबून असते. पाऊस हा खरोखरच आपला जीवनदाता आहे. पण केव्हा केव्हा त्याचा रोषही तापदायक असतो. कधी हा पाऊस ओल्या दुष्काळ घेऊन येतो, तर कधी कोरड्या दुष्काळाने येतो. कधी हा पाऊस धो - धो पडत असतो तर कधी हा रिमझिम रिमझिम बरसत असतो. कोणास हा पाऊस म्हणजे मरगळ वाटेल तर काहींना हा पाऊस हिरवी शाल पांघरून जीवन फुलविणारा, शेत पिकवणारा, जीवन गाणे गाणारा वाटेल. असा हा पाऊस म्हणजे निसर्गाचे भावपूर्ण मुद्राच जणू! अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस आपल्या जिवाभावाचा सखा सोबतीच आहे. हा पाऊस अनेक रुपात भेटतो आहे. पाऊस हा माणसाचा पोशिंदा आहे, सुखदाता आणि कठोर शास्ताही ! तो कसाही असला तरी पाऊस हा सर्वांना प्रिय असतो. “आला पाऊस, गेला पाऊस, राने ओली झाली रे l मुरली वाजे ,महिमा गाजे , मनमोहन वनमाली रे l " असा हा पाऊस सुखदायी,आनंददायी सृष्टीचे सौभाग्य आहे, चैतन्यरुपी जीवन फुलविणारा हा पाऊस खरोखरच आपला जीवनदाता आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment