*बेरोजगारी एक भीषण समस्या* आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशात बहुसंख्य लोकांचे पोट शेतीवर अवलंबून आहे. पण आजही बहुतांशी लोक अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. ती पूर्णता बेभरवशाची आहे. अपुरे उत्पन्न तेही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेले. त्यामुळे शेती वरील माणसे ही बेकारीच्या झुंडीत सामील होताना आज आपल्याला पाहायला मिळते. आज यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. एक यंत्र अनेक माणसाचे काम करते. त्यामुळेही बेकारीत भर पडलेली पाहायला मिळते. बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो त्याला आणखी एक कारण आहे.लोकसंख्यावाढ. या लोकसंख्येच्या वाढीमुळे आपल्यासमोर बेकारीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली तरीसुद्धा आपल्या देशातील सामान्य माणूस हा सामान्यच राहिलेला आहे. जनसामान्यांच्या अन्न,वस्त्र ,निवारा, शिक्षण, आरोग्य या प्राथमिक गरजा सुद्धा भागत नाही,आणि त्यातून दारिद्र्याला आमंत्रण मिळते. व बेरोजगारीचे प्रमाण वाढतच जाते. हाताला काम नाही पोटाला भाकर नाही. अशा परिस्थितीत माणूस आपले जीवन असहाय्यपणे जगतो. अशा बेकारीमुळे कितीजण आत्महत्या करतात. तर काहीजण बायकामुलांना स्वतःला जाळून घेताना दिसतात. चोऱ्या, दरोडे यांच्यात वाढ झालेली आज दिसत आहे. बेरोजगार तरुण आपसुकच गुन्हेगारीकडे वळत आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे आज रोजगार पुरवणे अशक्य झाले आहे. उद्योग जगतात नवीन बदलांचे वारे वाहतात. जुने उद्योग मोडून पडतात. त्यामुळे आणखी माणसे बेकार बनतात. काळ बदलतो लोकांच्या आवडीनिवडी बदलतात जीवनशैली बदलते. राहणीमानात फरक पडतो. त्यामुळे आधीच्या जीवनशैलीच्या अनुरूप असलेले उद्योगधंदे बंद पडतात. जुनी उद्योग बंद पडत असल्यामुळे येथील कामगार बेकार होतात. त्यांच्या रोजगारीच्या वाटा बंद होतात. पण अशा बेकार, बेरोजगार झालेल्या लोकांनी हताश न होता, आपले धैर्य खचू न देता स्वतःचे मनोबल वाढून नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजे. काळानुसार बदललेल्या जीवनशैलीच्या गरजांचा वेध घेतला पाहिजे म्हणजे की शक्ति तिथे कामाला येईल. बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. एक यंत्र अनेक माणसाचे जरी काम करीत असले तरी यंत्रांनी उद्योगाची नवीन दालने उघडून दिली आहेत. हेही मानवाने लक्षात घ्यायला हवे. या यंत्राची निर्मिती, सुट्या भागांची निर्मिती दुरुस्ती ,देखभाल यासाठी माणसाची गरज लागणारच. म्हणून या यंत्रांना आपत्ती न मानता आपल्यासाठी रोजगाराची वाट निर्माण करून देणारे मार्गदर्शकच मानली पाहिजे. बेरोजगारी कमी करायचे असेल तर आपण शेतीची पारंपारिक पद्धत सोडून दिली पाहिजे. तसेच शेतीला पूरक व शेतीवर आधारित असे उद्योग अंगीकारले पाहिजेत. आणि आपल्यामध्ये आळस असता कामा नये.आपल्यात असणारा आळस हा एक बेकारी उत्पन्न करण्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपण मुंगी सारखे उद्योगी असणे आवश्यक आहे. 'देगा हरी पलंगावरी' असे तर कधी होणार नाही. माणसाने स्वतः श्रम केले पाहिजेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी आळसाला दूर लोटले पाहिजे. संतांनीही श्रमाचे महत्व वेळोवेळी सांगितलेले आहे. 'आराम हराम आहे, तर कामात राम आहे'. हे ध्यानात घेऊन श्रम केले पाहिजेत. बेकारी ,बेरोजगार नाहीशी करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे शिक्षण. परंतु असे शिक्षण जे व्यक्तीला जीवनाभिमुख करणारे स्वावलंबी बनवणारे केवळ पुस्तकी , परीक्षार्थी न राहता उद्योगशील, यांत्रिकीकरणाची माहिती, असे व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. “व्यवसाय शिक्षण घ्यावे l बेकारीला दूर करावे ll श्रमप्रतिष्ठालाही जपावे l स्वावलंबनाचा मार्ग खरा ll या उक्तीप्रमाणे युवा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःला एका विशिष्ट व्यवसाय करता येईल का, करायला हवा. व त्या अनुषंगाने व्यवसाय शिक्षण घ्यावे. कारण यात स्वतःच्या बुद्धीला वाव आहे. कर्तुत्वाला महत्व आहे. व्यवस्थितपणे व्यवसाय केल्यास आर्थिक प्राप्ती भरपूर प्रमाणात होते. व अल्पावधीतच आपल्या व्यवसायात अनेक बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देता येतो. व अशाप्रकारे व्यवसायिक शिक्षणाला महत्त्व देऊन बेरोजगारी कमी करता येईल. बेरोजगारीच्या समस्येवर अशा वेगवेगळ्याप्रकारे उपायोजना करून या योजना तातडीने अमलात आणले पाहिजे. जर बेकारीच्या समस्येवर सर्वंकष योजना तातडीने अमलात आणली नाही तर, भविष्यकालीन तरुण पिढी व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीची निर्माण होईल. व देशात अराजक परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच बेकारीची समस्या समाजाला गर्तेत नेणारी आहे, बेरोजगारीचे हे थैमान थांबविण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. बेकारीच्या समस्याची जाणीव शासनाला व पर्यायाने समाजाला होणे अत्यावश्यक आहे. बेरोजगारीचे प्रमाण अधिकाधिक वाढले तर देशाची प्रगती होणे केवळ अशक्य होईल. बेरोजगारीचे हे थैमान कमी करण्यासाठी आळस दूर लोटून श्रम केले पाहिजे, शिक्षणाला महत्व दिले पाहिजे, व्यवसायिक शिक्षण घेतले पाहिजे, उद्योगशील राहून छोटे मोठे उद्योगधंदे केले पाहिजे. व बेरोजगारीची ही भीषण समस्या कमी केली पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment