आत्मनिर्भर बनू या 'स्वतः स्वतःची चांगल्या प्रकारे जबाबदारी घेऊन योग्य वर्तन करणे म्हणजे आत्मनिर्भरता होय.'प्रत्येक व्यक्तीने स्वहितासाठी व समाजहितासाठी विधायक कार्य करणे म्हणजे आत्मनिर्भरता होय. 'आत्मनिर्भरता म्हणजे स्वावलंबन होय', सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हाच एक प्राणी आहे कि ज्याला हात दिलेले आहेत तेही श्रम करण्यासाठी विश्राम करण्यासाठी नव्हे.इतर प्राण्यांना पाय तेवढे आहेत. हाताचा विश्राम, आळस हा आपल्याला परमेश्वराने दिलेल्या हाताचा अवमान आहे. हा अवमान होता कामा नये. म्हणून प्रत्येक व्यक्तीने श्रमाचा विश्राम, विसर, अवमान होउ देता कामा नये. त्यासाठी प्रत्येकांना स्वावलंबी असणे आवश्यक आहे. या स्वावलंबनातूनच आत्मनिर्भरता निर्माण होते. मानव हा समाजशील प्राणी आहे. विचारशील प्राणी आहे. आपल्या जीवनोपयोगीचे ज्ञान दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वतः मिळण्याची शक्ती तो स्वावलंबनातून प्राप्त करू शकतो. आणि आत्मनिर्भरतेने आपले जीवन जगण्यात समर्थ ठरतो. माणूस सहृदयी आहे असे आपण म्हणतो. दुसऱ्याचे सुखदुःख जाणता येणारे संवेदनशील हृदय माणसाला लाभले आहे. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे आणि त्याच्या दुःखाने दुःखी होणे हे मनुष्याची लक्षण आहे. आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाणे, हे महापुरुषाचे किंवा संतांचे लक्षण आहे. जोपर्यंत आपल्याच सुखाची चिंता असते, तोपर्यंत पशुता असते, जेथे दुसऱ्याच्या सुखाची चिंता सुरु होते, तेथे मानवतेची सुरुवात होते. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही मानवतेची शिकवण अंगी ठेवून प्रत्येकाने मानवताधर्म बाळगावा. प्रत्येक मनुष्याने सामाजिक उत्तरदायित्व ओळखून निस्वार्थीपणे आपले जीवन जगावे. थोडक्यात सांगायचे म्हणजे सर्वार्थाने मीच माझ्या रक्षक आहे. व म्हणून मी माझे स्वहित व समाजहित जोपासून आत्मनिर्भर बनणार आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे

No comments:

Post a Comment