कथा क्रमांक १६३

मानवधर्म
 
     स्वामी  विवेकानंद अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले. त्यांचे  गुरु रामकृष्ण यांचे निधन झाले होते. म्हणून ते त्यांच्या पत्नीची  शारदादेवीची परवानगी घेण्यास गेले.
         "आई, आशीर्वाद द्या." असे म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिले. "ठीक आहे; पण जरा थांब. आशीर्वाद देण्यापूर्वी ती पलीकडची  सुरी मला आणून दे." शारदादेवींनी सांगितले. विवेकानंदांना थोडे आश्चर्य वाटले; पण त्यांनी लगेच सुरी आणून दिली.
       सुरी हातात  घेतल्यानंतर देवीजी म्हणाल्या "जा तुझ्याकडून सर्वांचे कल्याण होईल."
      मघाशी दाबून ठेवलेले  आश्चर्य व्यक्त करीत वेवेकानंद म्हणाले,
    "माताजी, सुरी आणून देण्याचा व आशिर्वादाचा काही  संबंध होता का?" शारदादेवी  म्हणाल्या, "हो होता. तू सुरी कशी आणून देतोस ते मला पहायचे होते.
         स्वतःच्या हातात पाते धरून तू मूठ माझ्या हातात दिलीस. माझ्या  सुरक्षिततेची काळजी घेतलीस.'
        *स्वतःचा विचार न करता जो  अगोदर दुसऱ्याचा विचार करतो, दुसऱ्याची काळजी घेतो, तोच खऱ्या अर्थाने मानवधर्म पाळत असतो."*


No comments:

Post a Comment