कथा क्रमांक १७५

अभ्यास कथा क्रमांक १७५

स्‍वामी अखिलानंद

स्‍वामी अखिलानंद हरिद्वारमध्‍ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्‍यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्‍हा त्‍यांना आश्रमाच्‍या शेजारी असलेल्‍या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्‍यांना विचारल्‍यावर शिष्‍य म्‍हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्‍याचे सांगितले. त्‍यांचे फाटलेले कपडे पाहून स्‍वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्‍या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्‍यांनी त्‍या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्‍व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्‍याने भांबावले, त्‍यामुळे ते दोघेही एक शब्‍द स्‍वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्‍वामीजी रागवत म्‍हणाले, तुम्‍हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्‍यावर या तुम्‍हाला प्रसाद द्यायची व्‍यवस्‍था मी करतो.'' दोघेही बिचारे मान अपमानाची पर्वा न करता स्‍वामीजींना नमस्‍कार करून निघून गेले. दुसरे दिवशी मात्र स्‍वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्‍वामींच्‍या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्‍यासाठी स्‍वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्‍यात स्‍वामीजींचे लक्ष समोरच्‍या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्‍यांच्‍या रोजच्‍या जागेवर झाडावर भिजलेल्‍या अवस्‍थेत रामायण ऐकण्‍यासाठी येऊन बसलेले दिसले. स्‍वामीजींना राहवले नाही व त्‍यांनी त्‍या दोघांच्‍या समोर लोटांगण घातले व त्‍यांच्‍या रामभक्तीला नमस्‍कार केला.
                *तात्पर्य*
कुणालाही कमी समजू नये. कोण कुठल्या अधिकाराचा असेल ते सांगता येत नाही.                           〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment