लेख........ "वाचाल तर वाचाल" जसे प्रकाशाच्या सहाय्यशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि हे ज्ञान प्राप्त व्हायचे असेल तर आपल्याला पुस्तक वाचणे आवश्यक आहे. माणसाला जसे जगण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच बुद्धीच्या कक्षा वाढविण्यासाठी,ज्ञानप्राप्तीसाठी वाचण्याची गरज असते कारण वाचन हे आपल्या मनाचे अन्न आहे. असं म्हणतात 'वाचाल तर वाचाल' ज्ञानाची, विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनु आहे. जर ही संपत्ती आपल्याला गोळा करायची असेल तर आपल्याला पुस्तक, ग्रंथ वाचन करावेच लागेल. मानवी जीवन हे जरी क्षणभंगुर असले तरी त्यातले काही क्षण आपल्या ज्ञानाचे अमृत पाजून चिरंजीव करण्याचे कार्य ग्रंथच, पुस्तकेच करत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुची महती विषद केली आहे.' गुरु बिना ज्ञान नही' असे एका हिंदी संत कवीने म्हटले आहे. गुरु नंतर ग्रंथ हेच आपले गुरु आहे. ग्रंथाद्वारे आपल्याला ज्ञानप्राप्ती करता येते. कारण ज्ञान काट्यांना देखील फुल बनवून घेते, अज्ञान फुलांना देखील काटे बनवून घेते. दृष्टी बदलली तर सारे बदलून जाते. आणि ही दृष्टी बदलवायची असेल समदृष्टी करायची असेल ज्ञानी व्हायचे असेल तर वाचावेच लागेल आणि म्हणूनच मानवाच्या जीवनात ग्रंथांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आणि त्यामुळेच पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्याची समदृष्टी झाली तो ज्ञानी झाला. पुस्तक वाचनामुळे माणसाला बहुश्रुतता प्राप्त होते. मनात उद्भवणार्‍या शंका निरसन ग्रंथच करत असतात. पुस्तक वाचनामुळे आपल्याला कसे जगावे याचे भान राहते. जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. व आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. ग्रंथांचे पुस्तकांचे वाचन केल्यामुळे माणसाच्या भावनांना प्रतिसाद प्राप्त होतो. आपल्या मनाचे उदात्तीकरण होते. त्यामुळेच मानवाच्या जीवनात ग्रंथांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. माणसाला वर्तमानातील परिस्थितीशी संघर्ष कसा करावा व भविष्यातील स्वप्ने कशी रंगवावी हे ग्रंथ शिकवतात. ग्रंथ वाचनामुळे माणसाला त्याच्या भूत भविष्य आणि वर्तमान जीवनात उत्तम प्रकारे लाभ घेता येतो. ग्रंथ हे आपले केवळ मित्र नाहीतर मार्गदर्शकही आहेत तसेच गुरु सुद्धा आहेत. पुस्तक वाचनामुळे माणसाचं मस्तक सुधारते आणि हे सुधारलेल मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही आणि कोणाचेही हस्तक होत नाही असे डाॕ. बाबासाहेब यांनी म्हटले आहे. पुस्तक वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो.हा सुसंस्कृतपणाच त्याच्या यशाचा मार्ग असतो. ग्रंथ हा माणसाचा सर्वात मोठा आधार आहे. ग्रंथामुळे ज्ञान प्राप्त होते. आणि हे ज्ञान प्राप्त झाले की माणूस विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. मानवाला सुखरूपी आकाशात सहज उडायचे असेल तर ग्रंथ, ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख असावे लागते. यामुळेच माणूस सुखात आनंदात राहू शकतो. आणि ज्ञानाच्या कक्षा वृंद्धिगत करायचा असेल तर 'ग्रंथ हेच गुरु' आहेत. म्हणून पुन्हा एकदा सांगावसं वाटतं ' वाचाल तर वाचाल'. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment