*जतन करूया पर्यावरणाचे* *“झाडे तोडून करू नका,* *निसर्गाचे प्रदूषण* *झाडे लावा, झाडे जगवा* *जतन करा पर्यावरण”* आज धकाधकीच्या जीवनात माणूस कसा त्रस्त होऊन गेलाय. घड्याळ्याच्या काट्यात माणसाने आपले जीवन बंदिस्त केले. माणसाचा स्वभाव काही विचित्र आहे. आजचा माणुस हा यंत्रयुगाच्या आणि विज्ञानयुगाच्या जाळ्यात अडकला आहे. आपले घर आणि आपला परिसर यांचा किती परस्परसंबंध असतो ही जाणीव ठेवून माणसाने पर्यावरणाचे हित जोपासले पाहिजे. मुंगीपासून गरुडापर्यंत सर्वजण धरतीची प्रकृती सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात; पण माणूस मात्र आपल्या बुद्धिमत्तेने आणि कार्यशक्तीने पर्यावरणाचा तोल बिघडवून टाकत आहे. मानवाचे हे बेजबाबदार वागणे एक दिवस खूप धोकादायक ठरेल. पर्यावरणाचा ह्रास करणाऱ्या या अविचारी माणसाला जागे करण्याकरता 'वसुंधरा दिन' व 'पर्यावरण दिन' पाळायला सुरुवात केली आहे. आजकाल पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे. त्यासाठी कायदे नियम केले गेले आहेत. पण ते सर्वचजण आचरणात आणीत नाही. निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान राहिलेला आहेे. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे, निसर्गाने माणसाला मुबलक दिलेली हवा आणि पाणी यांचा योग्य उपयोग माणसाने योग्य चांगल्या प्रकारे केला पाहिजे. उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग करून पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल ची जबाबदारी पार पाडणे; ओला कचरा कोरडा कचरा यांची विल्हेवाट लावून विभागणी करणे. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे. या लहानसहान पण फार महत्वाच्या गोष्टी करून ' विशुद्ध पर्यावरण' टिकवणे हे मानवाच्या हातात आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. पर्यावरण जतनाची निष्ठा प्रत्येकात रुजली गेली पाहिजे. तेव्हाच प्रगतीपथाची वाटचाल सुरू होईल. निसर्गाचे सौंदर्य वर्णन करताना कवी भा. रा. तांबे यांनी अतिशय सुंदर सौंदर्य निसर्ग कवितेतून मांडले आहे. "हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे , चहुकडे हिरवे गालीचे l सोनेरी ,मखमली ,रुपेरी पंख कितीकांचे रंग कितीवर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे l" आकाशातील बदलणारे नित्य रूप रंग पाहून कवीने सौंदर्य रेखाटले आहे. कवी, लेखक यांच्या वाणीला निसर्ग सौंदर्यामुळे भरती येते. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे. निसर्ग माणसाची भूक भागवतो, तहान शमवीतो, सुगंधी फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो, थकल्या भागलेल्यांना सावली देतो, मंद मधुर वायूलहरीचा परिहार करतो. निसर्ग मानवाला फळे,फुले ,सावली देतो. या निसर्गाचे आणि मानवाचे अतूट नाते आहे. माणूस पर्यावरणाशिवाय राहू शकत नाही. निसर्ग माणसाचा सखा सोबती आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.प्रत्येक माणसाने पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून पर्यावरणाचे महत्त्व जाणून, पर्यावरण जागरूक नागरिक आता तरी व्हायला हवे. मानवाने सृष्टीचे सौंदर्य जोपासून पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍ लेखन प्रमिलाताई सेनकुडे

No comments:

Post a Comment