*अवयवदान हे सर्वश्रेष्ठदान* एका व्यक्तीची संपत्ती विनामोबदला दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची होण्याच्या प्रक्रियेस दान म्हणतात. जे जे आपल्याजवळ आहे , ते,ते दुसऱ्यास देऊन टाकन हे पुण्यप्रद कार्य असतं. महारथी कर्णाची दानशूरता हे सर्वांना ठाऊकच आहे. खरंतर दानास धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असतं. भूदान, अन्नदान ,नेत्रदान, रक्तदान, ज्ञानदान, अवयवदान आणि देहदान हे असे दानाचे अनेक प्रकार आहेत. परोपकाराच्या निर्मळ भावनेतून जे दान दिले जाते त्यास सत्पात्री दान असे म्हणतात. या सर्व दानाच्या पाठीमागे धार्मिक आणि सामाजिक विचारांची बैठक असते. जेव्हा जीवनाचा अंश म्हणजे नेत्रदान, त्वचादान, किडनी दान असे आपले अवयव दान आपण दुसऱ्यांना देतो तेव्हाच आपले खरेखुरे दान होते. असे दान देणे म्हणजे खरोखर स्वतःसाठी काही प्राप्त करणे होय. वास्तविक परमेश्वर प्रत्येकाचा अंतकरणात आहे. तो प्रत्येक मानवाच्या हृदयात वास करतो. म्हणून माणसाने आपले स्वरूप ओळखावे व या जगावर प्रेम करावे, भेदाभेद करू नये, निर्मळ मनाने जनसेवा करावी. सत्कृत्य करीत रहावे. कारण प्रत्येक सकृत्य हे दानधर्म होय. अवयव दान जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवाचे शरीर क्षणभंगूर आहे. मृत्यू हा अटळ आहे. माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल 'आला आणि गेला' मानवाच्या या उंबरठ्यावर यमराज येऊन केव्हा बोलवेल हे सांगता येत नाही. कारण मरण अटळ आहे. मृत्युनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयव रुपी जिवंत राहायचे असेल तर अवयव दान करणे फार महत्त्वाचे आहे. अवयव दान ही काळाची गरज आहे.आपल्या समाजात अवयव दानाविषयी म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. अवयवदान काय असते? हे सुद्धा काही लोकांना माहीत नाही.अवयवदानाचे ज्ञान हे केवळ नेत्र, किंवा किडनी पुरत मर्यादित नसून शरीराचे सुमारे दहा विविध अवयव आपण दान करू शकतो. त्यासाठी त्याची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. अवयवदानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माणसाच्या अंगी प्रबळ इच्छाशक्ती असेल तरच अवयवदान शक्य आहे. मानवाने आपल्या मृत्युनंतर जर अवयव दान केले तर कुणालातरी जीवनदान मिळू शकते. म्हणून अवयवदान हे सर्वश्रेष्ठ आहे. जागतिक स्तरावर १३ ऑगस्ट जागतिक 'अवयवदान' दिन साजरा केला जातो. आपल्या मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन आपण फुलवायचे असा विचार केला तर आपण नक्कीच एक चांगले कार्य केले म्हणून समाधानी राहू. व अशा चांगल्या कार्याचे समाजात प्रबोधन व जनजागृती होईल. अवयव दान करायचे झाले असल्यास आपल्याला आरोग्य विभागमध्ये जाऊन एक फॉर्म भरून द्यावा लागतो. असा अर्ज केल्यानंतर आपल्या मृत्यूनंतर ज्या अवयवाचे दान करायचे आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करून आपले संमती पत्र द्यावे लागते. त्यानंतरच अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण होते. २६ऑगस्ट ते १ सप्टेंबर हा 'आय डोनेशन' आठवडा म्हणून साजरा केला जातो. नेत्रदान म्हणजे डोळे डोनेट करणे. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. नेत्रदान करतानी पूर्ण डोळ्याचे दान केले जात नाही तर डोळ्याचे कॉर्निया चे डोनेट होते ते ट्रान्सपरंट असते. नेत्रदान विषयी काही अंधविश्वास दूर करायला पाहिजे. नेत्रदान ही एक समाजसेवा आहे. ते स्वेच्छेने केलेले कार्य आहे. जर एखादी व्यक्ती आपले 'नेत्रदान' करण्यास इच्छुक असेल तर मृत्यूनंतर त्याचे डोळे काढले जातात. परंतु जर ती व्यक्ती वयस्क असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे डोळे कमजोर असेल, मोतीबिंदू सारखा आजार असेल तर अशा व्यक्तीचे डोळे उपयोगात पडत नाही. नेत्रदान करताना त्या व्यक्तीचे डोळे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असावेत. जर अशा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर चार ते सहा तासाच्या आतच डोळे काढून घ्यायला हवे. आणि नेत्रदान केलेले डोळे तीन ते चार दिवसाच्या आत उपयोगात आणायला हवे. नेत्रदान हे ऐच्छिक स्वरूपाचे असते त्यासाठी कुठलीही जबरदस्ती नसते. आणि हे नेत्रदान करण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही. तसेच कायद्याचे बंधन नाही. योग्य नियमाचे पालन करून रीतसर अर्ज भरून आपण हे नेत्रदान करू शकतो. आणि एका नेत्रहीन व्यक्तीस नेत्रदान देऊन हे जग दाखवू शकतो. ह्या नटलेल्या सृष्टीचे सौंदर्य दाखवू शकतो. म्हणून प्रत्येकाने एकच संकल्प करावा आपल्या मृत्यूनंतर आपले अवयवदान , नेत्रदान करावे. ही परोपकाराची वृत्ती व मानवतेची प्रतिष्ठा जोपासावी.माणसाने मरावे परी किर्तीरुपी उरावे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे.

No comments:

Post a Comment