*विंचा पीडी नांगी ।* *ज्याचा दोष त्याचे अंगी ।।१।।* *केला पाहिजे विचार ।* *मन मित्र दावेदार ।।ध्रु.।।* *मधुरा उत्तरीं ।* *रावा खेळे उरावरी ।।२।।* *तुका म्हणे रेडा ।* *सुखें जाती ऐशा पीडा ।।३।।* *विवरण:* संत तुकाराम महाराज म्हणतात- मी सुखी असेल, तर याला कारण माझा स्वभाव असतो. आणि मी दुःखी असेल, तर यालाही कारण माझा स्वभावच असतो. मला सुख माझ्यामुळं, आणि दुःख मात्र दुसऱ्यांमुळं... असं नसतं. आपल्या सुख-दुःखाच्या कारणांविषयी स्वतःच स्वतःच्या बाबतीत विचार केला पाहिजे, यासाठी तुकाराम महाराज 'विंचू, पोपट आणि रेडा' यांच्या स्वभावाच्या चांगल्या वाईट परिणामांचा परिचय करून देताना म्हणतात... .... आपल्या अंगातले गुणदोषच आपल्या सुखदुःखाला कारण असतात. "जसं, विंचवाच्या नांगीत विष असतं, त्यामुळं तर लोक विंचवाला पाहिल्याबरोबर त्याला मारायचा विचार करतात." अर्थात विंचवाच्या दुःखाला कारण त्याच्याच नांगीतील विष असते. यावरून, आपलं मनंच आपला मित्र आणि आपला शत्रू असतो; असा प्रत्येकानं विचार केला पाहिजे." आपल्या त्रासाला, दुःखाला आपला स्वभाव म्हणजेच मन आहे, असा विचार करून 'दुरुस्ती दुसऱ्याची नाही, तर स्वतःचीच केली पाहिजे. ..... विंचवाच्या विपरीत पोपटाचं उदाहरण देताना तुकोबा म्हणतात, "पोपट गोड बोलतो, म्हणून तर लोक त्याला जवळ करतात आणि तोही लोकांच्या मस्तपैकी अंगाखांद्यावर खेळतो...अर्थात पोपटाच्या सुखाला कारण, त्याचंच गोड बोलणं असतं. ... आता विंचवाच्या दुःखाचं आणि पोपटाच्या सुखाचं कारण सांगून तुकोबा रेड्याविषयी बोलताना सांगतात, "रेड्याच्या अंगी कोणताही लोकप्रिय गुण नाही आणि कोणताही लोकप्रिय दोषही नाही. त्यामुळं, त्याला पोपटासारखं कुणी अंगाखांद्यावर खेळवावं असं सुख नाही आणि त्याला पाहून कुणी मारून टाकण्याची इच्छा धरावी, असं विंचवासारखं दुःखही नाही. विंचवाला दुःख त्याच्याच नांगीमुळं होय. पोपटाला सुख त्याच्याच गोड बोलण्यामुळं होय. रेड्याला सुख आणि दुःख दोन्हीही नाही, याला कारण त्याचाच स्वभाव होय. यावरून तुकोबांना म्हणायचं आहे की, 'माझ्या सुखाला आणि दुःखाला कारण दुसरं कुणीच नाही तर, माझाच स्वभाव आहे आणि असाच प्रत्येकानं विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या दुःखाचे दोष आपण आपल्याच जवळच्या माणसांना देऊन त्यांना दुःखी करणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment