मन माणसाचे अन डोके...??? एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडासाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाची सर्व कामे ते करू लागले. तात्पर्य :- माकड हे मानवी मेंदूचे प्रतीक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहील. परंतु त्याला काही काम नसेल तर ते नकारात्मक विचार करू लागेल. हिंसक होईल, भरकटेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment