*एकाग्रता* *'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे' l* हे ज्ञानेश्वर माऊलीचे सुवचन ऐकले की एकाग्रतेने किती समाधान लाभते हे जाणवते. आपल जीवन यशस्वी करायच असेल तर आपण मनापासून एकाग्रतेने काम केले पाहिजे. तरच आपलं जीवन यशस्वी होतं. ' सर्व जगाला विसरुन मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात'. एकाग्रता म्हणजे एकचित्तता. ही एकचित्ता आपल्याला आपल्या कामात यश मिळवून देते. आपल्या कामात द्विधा मनस्थिती असेल तर त्या कार्याचा नाश होतो. मननामुळे माणसाला एकाग्रता लाभते. तसेच आपल्या मनाचा एक दोष आहे तो म्हणजे चंचलता. माणसाचे मन हे चंचल असते. हे चंचल मन वाऱ्यासारखे धावत असते. या चंचलतेमुळेच मनात संकल्प ,विकल्प निर्माण होतात.हे स्वैर धावत सुटलेले मन सावरायचे असेल तर आपल्या मनाची सर्व शक्ती दृढपणे स्थिर करून एकाग्रता निर्माण करावी लागेल. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. माणसाने आपल्या कामात इतके तन्मय व्हावे की समोर कोणी जरी आले तरी आपल्याला ते माहित होऊ नये. एकदा नेपोलियनला बिन साखरेचा चहा दिला.नेपोलियनने तो चहा चटकन पिऊन टाकला. तो आपल्या कामात इतका तन्मय होता की चहात साखर नाही हे त्यांना कळलेच नाही. अशी एकाग्रतेची ,तन्मयतेची, एकरूपता, एकचित्तता, तल्लीनता ची कितीतरी उदाहरणे आहेत. एकाग्रता साध्य करण्यासाठी मनुष्याच्या डोळ्यापुढे एक विधायक ध्येय साधना पाहिजे. आपण ध्येयधुंद होऊन कार्य केले तर जीवनाची यशश्री लाभते. म्हणून माणसाचे मन हे बुद्धीच्या अनुरोधाने चालणारे असावे. बुद्धीने सांगावे,मनाने करावे. मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असावे. तरच योग्य निर्णय घेता येते. एकदा द्रोणाचार्यांना आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची होती. झाडावर एक पक्षी टांगला होता, आणि त्याच्या डोळ्याचा वेध करायचा होता. आचार्यांनी प्रत्येक शिष्याला जवळ बोलावून विचारले, " तुला काय दिसते?" सगळे म्हणाले झाड दिसते, पाने दिसतात, पक्षी दिसतो. परंतु एकटा अर्जुन म्हणाला, " मला फक्त डोळा दिसतो". अर्जुनाच्या या एकाग्रतेतमुळेच तो वीर धनुर्धर बनला. एक अद्वितीय धनुर्धर म्हणून अर्जुनाची ओळख आहे. “ध्यान, एकाग्रता ही एक सदैव सज्ज असणारी, उपयोगी व संकटात मुक्त करणारी फायदेशीर सवय आहे. एकाग्रता आपल्या जीवनातला एक परम आवश्यक गुण आहे. ”असे चार्लस् डिकन्स या विचारवंताचे मत आहे. म्हणून माणसाने आपला प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोगीली पाहिजे. अशी ध्यान आणि एकाग्रता ची सवय ठेवावी. एकग्रतेसाठी संयमाची अत्यंत आवश्यकता आहे. जीवनाचे स्वरूप उलगडायचे असेल तर व्यक्तीने आपले वळण संयमाकडे आहे की स्वच्छंदाकडे आहे हे जाणून घेतले पाहिजे. विनोबा भावे यांनी म्हटले आहे की " संयम ही जीवनाची किल्ली आहे". संयमाची ही जीवनाची किल्ली आपल्याजवळ असेल तर आपल्याला एकाग्रतेची सवय लागेल. आणि आपले मन एकाग्र झाल्यावर आपल्याला अशक्य असे एकही काम नाही. जर एकाग्रतेचा अभाव असेल तर आपले एकही काम यशस्वी होणार नाही. या एकाग्रतेच्या अभावामुळे आपली शक्ती विकेंद्रीत होऊन तिचा अपव्यय होतो. म्हणून जीवनात एकाग्रता, तन्मयता, एकरूपता , एकचीत्तता, परिमिततता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाने एकाग्रतेने काम करावे तरच समाधान मिळते. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या सुवचनात म्हटले आहे *'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे l'* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment