नशीब मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे असं म्हणतात. आपल्या नशिबाला योग्य आकार देणे हे कार्य मानवाच्या शक्ती बाहेरचे नाही. जर मनुष्याने ठरवले तर तो करू शकतो. जर नाही ठरवले तर तो निष्क्रिय राहू शकतो, अथवा काहीच करू शकत नाही. मानवाला स्वतःचे भाग्य स्वतः उज्वल करायचे असेल तर त्याने आपल्या चारित्र्याचा, वर्तनाचा आपल्या हातून घडून येत असलेल्या कार्याचा आधार घ्यावा, नशिबाचा नवे. असं म्हणतात माणसाच्या मनगटातील ताकद संपली की तो नशिबाला दोष देत बसतो. परंतु हे योग्य नाही. मनुष्य हा स्वतःच्या भाग्याचा स्वतः शिल्पकार आहे. मग नशिबाला दोष का बर द्यावे? एखादा मनुष्य अडचणीत असला किंवा संकटात असला तर त्या मनुष्याला साथ देण्याचे धाडस अपवादात्मक सोडून इतर कोणी करत नाही. अंधारात त्याची पडछाया सुद्धा त्याची साथ सोडून देते, त्याचप्रमाणे एखादा माणूस दूर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या मनुष्याचे पण त्याचे आप्तेष्टपण साथ सोडून देतात. आपले दैव हे समुद्राप्रमाणे खोल आणि विस्तृत आहे, पण आपल्या कर्तबगारीची भांडीच लहान आहेत. माणसाची कर्तबगारी अपुरी असली तर तर त्याचा उपयोग होत नाही. आपलं नशीब आपल्या सोबत हवं असेल तर आपली कर्तबगारी मोठी असायला हवी. कारण आपलं नशीब कर्तबगारीने वाढत असते, महानता प्राप्त होते. नशीब रज:कणाचा पर्वत बिंदूचा सिंधू बनवू शकतो. असे महान कन्फ्युशिअसने म्हटले आहे. याचा अर्थ असा की एखादा रज: कण सुद्धा पर्वताच्या छोट्याशा बिंदूच्या सिंधूत रूपांतर करू शकतो. कारण मनुष्य ठरवेल तर सर्व काही होत असते. आपणच आपल्या स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार व्हायचे असेल तर आपल्या कर्मातील दोष जाणुन घेणे आवश्यक आहे. संकटात , अडचणीत सापडलेला मनुष्य आपल्या दैवाला दोष देतो; परंतु स्वतःच्या कर्माचे दोष तो जाणून घेत नाही. आपले दोष आपल्यातील उणीवा आपणच शोधून काढल्या पाहिजे व ते दूर केले पाहिजे. तरच आपण आपल्या भाग्याचे शिल्पकार होऊ. आपल्याला स्वतःला जिंकायचे असेल तर या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे तरच आपण स्वतःला जिंकू शकतो. मग आपल्या सारखा दुसरा नशीबवान कोणी नाही असं समजायला हरकत नाही. माणसाच्या अंगी भेकडपणा असू नये. माणूस हा दैवावर विश्वास ठेवून राहतो. म्हणजे हा केवळ भेकडपणा आहे.माणसाच्या अंगी धाडशी प्रवृत्ती असणे आवश्यक आहे. कारण धाडसी लोकांना नशीब साथ देत असते. असे म्हणायला वावगे होणार नाही. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment