( 5) सहल सहल या शब्दातच आनंद दडलेला आहे. सह म्हणजे सोबत सर्वांच्या सोबत काढलेली ती म्हणजे सहल. खरं म्हणजे सहल काढण्याचा उद्देश असा असतो की एकमेकांच्या सोबत राहून दिलखुलासपणे गप्पा गोष्टी गाणी याचा मनमुराद आनंद लुटणे तसेच आपण ज्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देणार आहोत त्या स्थळाची माहिती जाणून घेणे. आपल्या ज्ञानाची वृद्धिगत कक्षा वाढविणे. अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा निर्माण होणे. ही ज्ञान प्राप्तीची लालसा आपल्याला सहलीतून प्राप्त होते. सहलीमुळे आपल्याला वेगळा आनंद मिळतो. मित्र मैत्रिणी सोबत खाण्याची मेजवानी करता येते. आपण जिथे जाऊ सहलीला तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. सहल म्हणजे नुसता आनंद नव्हे तर विविध माहिती जाणून घेण्याची बुद्धीला लागलेली भूक आहे. ही बुद्धीची भूक आपण मिटविण्यासाठी आपल्यामध्ये जिज्ञासा, चिकाटी वृत्ती, ज्ञानलालसा हे गुण असणे आवश्यक आहे. *संस्मरणीय सहल* आज पर्यंत मी अनेकदा सहलीला गेले आहे.दरवर्षी आमची शालेय सहल निघत असते. मात्र एवढ्या सहलीपैकी मला माझ्या कुटुंबा सोबत केलेली चांदण्या रात्रीची सहल मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. ह्या चांदण्या रात्रीचा सहलीचा विचार आम्ही बहीण भावाने मिळून मांडला होता. आणि हि आमची सहल एक आनंददायी , विलक्षण होती. आमच्या गावा जवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले होते. घरातील आणि सर्व मंडळी मिळून निघालो. पौर्णिमेची रात्र होती. पौर्णिमेच्या रात्रीला सारे आसमंत तुडुंब चांदण्यांनी भरलेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते आभाळ निरभ्र होते. आजूबाजूला शेती होती. गावाबाहेर शांतता होती. लखलखीत चांदण्यांचा प्रकाश झळकत होता. सुखद असा हवेतला थंडगार गारवा जाणवतं होता . आजूबाजूला झाडे आणि आकाशातील चांदण्या असा सुंदरमय देखावा मनाला प्रसन्न करणारा होता. असा हा चांदण्या रात्रीच्या सहलीचा प्रवास अगदी आगळावेगळा होता. आम्ही यापूर्वी अनेक सहली काढल्या पुढेही काढू पण चांदण्या रात्रीचा तो सहलीचा प्रवास मनाला भावलेला होता.एक संस्मरणीय सहल म्हणून हा प्रवास जिवनात एक अविस्मरणीय, आनंददायी मनाला हर्ष करणारा होता. “आसमंतात दाटला चांदण्यांचा पसारा नभात दिसे चंद्र हा शुभ्र लख्ख पांढरा मधुमालतीचा पसरे हा गंध सारा पुनवेच्या सहलीचा आनंदच न्यारा.” 〰️〰️〰️〰️〰️〰️ ©️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment