✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड लेख.... श्रमाचे महत्व “ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे " कोणतीही गोष्ट आपण स्वतः आधी केली पाहिजे आपल्या अनेक प्रयत्नात आपला देव असतो आपले यश असते.हेच भाव आपण आपल्या अंतर्मनात ठेवावा अंतरीचा देव तेथेच जाणावा. ' प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे' आपण मनापासून प्रयत्न केले असता सर्व साध्य आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला श्रम करणे गरजेचे आहे. प्रयत्नाने आपल्या श्रमाचे सार्थक होते. कोणतीही गोष्ट करण्यासाठी श्रम हे करावेच लागते. 'दे गा हरी पलंगावरी असे कधीच घडत नाही'. आपण करीत असलेल्या श्रमात तल्लीनता असावी, त्यामध्ये एकरूप होता येईल अशी एकाग्रता असावी. श्रमाच्या पाठीमागे असलेल्या प्रेममय विचार केला असता जिथे प्रेममय श्रमान जीवन नटलेल असतं तिथं आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण होत असतात. आपलं जीवन हे जगण्यासाठी असतं. प्रेममय असतं. सुखमय असतं. श्रमाच्या माध्यमातून जीवनावर प्रेम करणं म्हणजेच जगण्याच्या गूढ अर्थाचा परिचय करून घेणे होय. आपण जेव्हा प्रेमान श्रम करतो तेव्हा आपल्या स्वतःशी आपण बांधील असतो. परंतु ' श्रमिक जीवन हे आरोग्यपूर्ण जीवन आहे'. ही कल्पना आज आपण हळूहळू विसरत चाललो आहे.' मानवाने शारीरिक श्रम हे करायलाच पाहिजे. श्रमातून सुख समृद्धी व समाधान लाभते. मानसिक श्रमातून क्रांती घडून येते. श्रमाने मानवाच्या जीवनात आनंदाची निर्मिती होते. श्रमाने मिळवलेल्या भाकरीची चव ही अमृतापेक्षा ही मधुर असते. कष्टाच्या भाकरीची गोडी न्यारीच असते. म्हणून श्रमाचे महात्म्य अतिशय पूजनीय आहे. ही सारी सृष्टी श्रमाच्या चैतन्याने भारावलेली आहे. प्रेमाचा मूर्त स्वरूप म्हणजे श्रम होय. प्रेमानं श्रम करणे म्हणजे जीव ओतून काहीतरी नवनिर्मितीचे काम करण होय. आणि हे नवनिर्मितीचे काम करायचे असेल तर आपल्याला श्रमाची सतार ही वाजवीच लागेल. सतारीच्या या स्वरातून श्रमाच्या माध्यमातून सारा आसमंत फुलवावा लागेल. श्रमाच्या या माध्यमातूनच आपण आपल्या जीवनाचा गुढ असा परिचय करून घेतला असाच अर्थ सार्थ होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment