आईवडिलाचे आपल्या लाडक्या मुलीस पञ दि.२५-०५-२०२० श्री प्रिय लाडलीस आई बाबाचा शुभ आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले. पत्र वाचून फार फारआनंद झाला. तू लिहिलेल्या पत्रातील मजकुरातील शब्द आम्ही दोघांनी खूप खूप वेळेस वाचले. तुझे पत्र वाचून आमचे मन भारावून गेले. तू तिकडे तुझ्या संसारात रमलीस यातच आम्हा दोघांना खूप आनंद आहे. आपली मुलगी दिल्या घरी सुखी आहे, आनंदी आहे हीच आईवडिलांसाठी मोठी गोष्ट असते. आमच्या दोघांची तू काही काळजी करू नकोस. आम्ही इकडे आनंदात आहोत. तू तुझी व घरातील सर्व मंडळींची काळजी घेत जा. घरातील सर्वांना आनंदी ठेवण्याचे काम आता तुझे आहे. सर्वांचे सुखदुःख जाणणे व प्रेमाने राहणे हे काम आता तुझे आहे. कारण तू त्यांच्या घरची लक्ष्मी आहे, सून आहेस, व मुलगी सुद्धा आहेस. सासू-सासर्यांची सेवा करणे, व जावईबापूंना अगदी आनंदात ठेवून त्यांची सहचरणी म्हणून सोबत देणे हे तुझे कर्तव्य आहे. तू घेतलेल्या शिक्षणाचा फायदा घेऊन आपल्या संसाराला हातभार लावशील हीच अपेक्षा ठेवून आम्ही तुला जे उच्च शिक्षण दिले त्याचे सार्थक आम्हाला वाटेल व तुलाही आनंद मिळेल. बर असो. तू व तुझा परिवार सुखरूप, कुशलपूर्वक आहे. त्यातच आमचा आनंद आहे. तुझ्या घरच्या मंडळींना आमच्याकडून सप्रेम नमस्कार, तसेच जावईबापूंना व तुला अनेक शुभ आशीर्वाद. बेटा अधून मधून वेळात वेळ काढून पत्र लिहीत जा. व सर्व कुशल मंगल आहेत की नाही ते आम्हाला कळवत जा. आम्ही ख्यालीखुशाली तुला कळवत जातो. आमच्या दोघांची तब्येत चांगली आहे काही काळजी करू नकोस. तू पण तुझ्या व परिवारातील सर्वांच्या तब्येतीला जप. कारण आता कोरोना आजाराचे संकट आहे. हा आजार महाभयंकर असल्यामुळे आपण सर्वांनी व्यक्तिशः काळजी घेणे गरजेचे आहे. आवश्यक तेव्हाच बाहेर जा. नाहीतर घरीच रहा , सुरक्षित रहा, स्वतःस जपा. ठीक आहे बेटा. तुझी आठवण आम्हाला येते. व तुलाही आमची आठवण येते. आठवणीच्या मनातील कल्लोळ चालूच राहणार आहे. लवकरच हे कोरोणाचे संकट गेल्यावर मी तुला भेटायला येईल. काळजी घ्या, सुखरूप रहा, आनंदी राहा. कळावे तुझेच आईबाबा. प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment