*प्रेरणा / प्रोत्साहन* मनुष्याच्या जीवनात ज्या काही विकासासाठी, तेजविकासासाठी घटना घडतात त्या त्यांचं जीवन गतिमान, प्रवाहित करण्यासाठी होतात. कोणत्याही प्रसंगानुसार घडलेल्या घटनेला माणसाने निराशा ओढवून माणसाच्या मनातल्या दुर्दम्य आशेला बळ मिळत नाही. आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गात येणाऱ्या बाधांमुळे निराशेला कधीही जवळ करु नये. याउलट जगाचा प्रवास करताना आलेल्या विविध अनुभवातून आपण प्रेरणा घेऊनच योग्य वाटचाल केली पाहिजे. हेच जीवनाचे वास्तव आहे. अनेक समस्यांवर मात करून आपण आपले कार्य त्यावर उपाय शोधून अविरतपणे चालू ठेवणे जीवनाची हीच खरी प्रेरणा आहे. मनुष्य एखाद्या घटनेत सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक विचारांना अधिक प्राधान्य देतो त्यामुळे त्याच्या आशेचा अंकुर नष्ट होण्यास फारसा वेळ लागत नाही.त्यामुळे माणसाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले कार्य केले पाहिजे. या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते. निसर्गाच्या सनिध्यातून आपल्याला ईश्वराच्या कर्तुत्व शक्तीचा आविष्कार पाहावयास मिळतो त्यातूनही व्यक्तीस प्रेरणा मिळत असते. कलेला प्राधान्य मिळत असते. जसे की रांगोळीची कल्पना माणसाला आकाशातील नक्षत्र यांवरून सुचली. निसर्गातून कविला कविता करण्याची प्रेरणा मिळाली. "हे सृष्टी म्हणजे अन्योक्ती आहे. दिसायला जरी सृष्टी असली तरी असायला देव असे" असे विनोबाजी भावे म्हणतात. मानवी जीवन हे कलेमुळे समृद्ध बनते. आणि ह्या कलेचे प्रोत्साहन त्याला सृष्टितून सतत मिळत असते. उदा. फुलपाखराच आयुष्य फक्त काही दिवसाच असतं तरीही ते अनेकांच्या आयुष्यात रंग भरतं आपल्यासारख्या माणसांना तर कित्येक वर्षाच आयुष्य लाभतं. मग या फुलपाखरा कडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. दुसऱ्याने केलेल्या चांगल्या कार्याला आपण प्रेरणा द्यायला हवी. आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग-तरंग उमलतात. काहीतरी नव करण्याची उमेद मिळते. आपल्याकडून मिळालेली हीच प्रेरणा त्याच्या आयुष्यात नवसंजीवनीचे कार्य करते. म्हणून आपण प्रेरणा, प्रोत्साहन,उत्साह , हिम्मत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची विचारसरणी ठेवली तर आपण तर समाधानी, आनंदी राहतोच परंतु दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे झरे निर्माण करता येतील. ही स्फुर्तीदायी प्रेरणा सर्वाना लाभो. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड
*☘शिवार☘* पहाटेचे हे ऊन कोवळे धरती वरती पडे तृणपात्यावर बसून दवबिंदू संगे खेळ गडे रानामधी गुरे चरती हर्षाने वाहती झरे रान फुलांचा गंध हा चहू दिशांनी दरवळे दाट हिरव्या झाडीत कोकिळेचे गोड गाणे जललहरी वाहत असता वायु सांगे मज तराणे शिवारात उभे राहुनी आनंदाने वाहती झरे पक्षीही किलबिल करती फुलपाखरू भिरभिरे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍काव्यलेखन श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
समूहगीत तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा ll धृ ll तपोवनातून तुझ्या उजळती, उपनिषदांची वाणी मातीमधुनी तुझ्या जन्मल्या, नवरत्नांच्या खाणी जययुग धर्माचा देशा, जय नव सूर्याच्या देशा ll१ll श्रमातून पिकलेली शेती, पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे, हृदयातील आनंद, जय हरितक्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीचा देशा ll२ll पहा झोपड्या कंगालांच्या, थरथरल्या भोवताली, अन्यायाला जाळीत उठल्या, झळकत लाख मशाली, जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा ll३ll तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा llधृll संकलित
*एकाग्रता* *'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे' l* हे ज्ञानेश्वर माऊलीचे सुवचन ऐकले की एकाग्रतेने किती समाधान लाभते हे जाणवते. आपल जीवन यशस्वी करायच असेल तर आपण मनापासून एकाग्रतेने काम केले पाहिजे. तरच आपलं जीवन यशस्वी होतं. ' सर्व जगाला विसरुन मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात'. एकाग्रता म्हणजे एकचित्तता. ही एकचित्ता आपल्याला आपल्या कामात यश मिळवून देते. आपल्या कामात द्विधा मनस्थिती असेल तर त्या कार्याचा नाश होतो. मननामुळे माणसाला एकाग्रता लाभते. तसेच आपल्या मनाचा एक दोष आहे तो म्हणजे चंचलता. माणसाचे मन हे चंचल असते. हे चंचल मन वाऱ्यासारखे धावत असते. या चंचलतेमुळेच मनात संकल्प ,विकल्प निर्माण होतात.हे स्वैर धावत सुटलेले मन सावरायचे असेल तर आपल्या मनाची सर्व शक्ती दृढपणे स्थिर करून एकाग्रता निर्माण करावी लागेल. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. माणसाने आपल्या कामात इतके तन्मय व्हावे की समोर कोणी जरी आले तरी आपल्याला ते माहित होऊ नये. एकदा नेपोलियनला बिन साखरेचा चहा दिला.नेपोलियनने तो चहा चटकन पिऊन टाकला. तो आपल्या कामात इतका तन्मय होता की चहात साखर नाही हे त्यांना कळलेच नाही. अशी एकाग्रतेची ,तन्मयतेची, एकरूपता, एकचित्तता, तल्लीनता ची कितीतरी उदाहरणे आहेत. एकाग्रता साध्य करण्यासाठी मनुष्याच्या डोळ्यापुढे एक विधायक ध्येय साधना पाहिजे. आपण ध्येयधुंद होऊन कार्य केले तर जीवनाची यशश्री लाभते. म्हणून माणसाचे मन हे बुद्धीच्या अनुरोधाने चालणारे असावे. बुद्धीने सांगावे,मनाने करावे. मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असावे. तरच योग्य निर्णय घेता येते. एकदा द्रोणाचार्यांना आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची होती. झाडावर एक पक्षी टांगला होता, आणि त्याच्या डोळ्याचा वेध करायचा होता. आचार्यांनी प्रत्येक शिष्याला जवळ बोलावून विचारले, " तुला काय दिसते?" सगळे म्हणाले झाड दिसते, पाने दिसतात, पक्षी दिसतो. परंतु एकटा अर्जुन म्हणाला, " मला फक्त डोळा दिसतो". अर्जुनाच्या या एकाग्रतेतमुळेच तो वीर धनुर्धर बनला. एक अद्वितीय धनुर्धर म्हणून अर्जुनाची ओळख आहे. “ध्यान, एकाग्रता ही एक सदैव सज्ज असणारी, उपयोगी व संकटात मुक्त करणारी फायदेशीर सवय आहे. एकाग्रता आपल्या जीवनातला एक परम आवश्यक गुण आहे. ”असे चार्लस् डिकन्स या विचारवंताचे मत आहे. म्हणून माणसाने आपला प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोगीली पाहिजे. अशी ध्यान आणि एकाग्रता ची सवय ठेवावी. एकग्रतेसाठी संयमाची अत्यंत आवश्यकता आहे. जीवनाचे स्वरूप उलगडायचे असेल तर व्यक्तीने आपले वळण संयमाकडे आहे की स्वच्छंदाकडे आहे हे जाणून घेतले पाहिजे. विनोबा भावे यांनी म्हटले आहे की " संयम ही जीवनाची किल्ली आहे". संयमाची ही जीवनाची किल्ली आपल्याजवळ असेल तर आपल्याला एकाग्रतेची सवय लागेल. आणि आपले मन एकाग्र झाल्यावर आपल्याला अशक्य असे एकही काम नाही. जर एकाग्रतेचा अभाव असेल तर आपले एकही काम यशस्वी होणार नाही. या एकाग्रतेच्या अभावामुळे आपली शक्ती विकेंद्रीत होऊन तिचा अपव्यय होतो. म्हणून जीवनात एकाग्रता, तन्मयता, एकरूपता , एकचीत्तता, परिमिततता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाने एकाग्रतेने काम करावे तरच समाधान मिळते. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या सुवचनात म्हटले आहे *'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे l'* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.
स्वभाव प्रत्येक माणसाचा वेगळा असा खास एक स्वभाव असतो. त्या व्यक्तीने आपल्या जीवनातील केलेल्या कार्याच्या त्याच्या स्वभावावर छाप पडतं असते. माणसाच्या स्वभावावर त्याचे यश-अपयश अवलंबून असतं. प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार प्रत्येक प्रसंगाचं मूल्यांकन करीत असतो. परंतु अस म्हणतात 'माणसाच्या स्वभावाला काही औषध नसते.' माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. कुत्र्याचे शेपूट जसे वाकडेच असते तसे माणसाच्या स्वभावाचे विचित्र आहे. काही माणसं नम्र असतात तर काही माणसाच्या अंगी नम्रता नसते. काही माणसं सदाचारी वर्तन करतात तर काही भ्रष्टाचारी वर्तन करतात. काही माणसं सज्जन वाटतात तर काही दुर्जन वाटतात. काहीजण शांत, संयमी, शिस्तप्रिय, विवेकी, सद्गुणी, नियमांचे काटेकोर पालन करणारे, नीटनेटकी, वक्तशीरपणा अंगी असलेले असतात, तर काही व्यक्ती हट्टी, रागीष्ट, उतावीळ, चिडखोर अशा स्वभावाची असतात. एकूणच माणसाच्या स्वभावाचं गणित नक्की काही मांडता येत नाही. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न स्वभावाचे असते. प्रत्येकाचा स्वभाव एकमेकांच्या मध्ये मिसळेलच असे काही नाही. एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडतो तर एखाद्या व्यक्तीस एखाद्याचा स्वभाव आवडत नाही. प्रत्येक व्यक्तीचे मते भिन्न असते. अशा भिन्न व्यक्तीचा प्रवृत्तीचा माणूस तो आपल्या विचारानुसार आपल्या मतानुसार समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याशी जुळवून घ्यायचा की नाही ते तो व्यक्तिशः ठरवत असतो. खर तर माणसाच्या अंगी नम्रता हा गुण असणे आवश्यक आहे. सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता होय. आपल्या स्वभावातील नम्रता ही आपल्या सर्व कार्यसिद्धि ची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीचा स्वभाव नम्र असतो अशी व्यक्ती दुसऱ्याच्या हृदयात वास करते. दुसऱ्याचे मन नम्र व्यक्तीस जिंकता येते. आपले स्वतःचे जीवन आपल्याला सुखी, संपन्न ,आनंदी, निर्मळ, निर्भय, प्रफुल्लित, प्रसन्न ठेवायचे असेल तर आपल्या हृदयात आनंदाचा झरा फुलवायचा असेल तर आपला स्वभाव सुस्वभावी व नम्र असावा. तरच आपण आपला सूस्वभावाच्या बगीच्यात आनंदाने राहू, आपल्या मनात हा बगीचा फुलवू. त्यासाठी सद्गुणांची संपत्ती वाढवावी लागेल. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे
*कृती गीत* *पाच या अंकाचे गाणे* शिकूया सारे गोष्टी पाच छूम छूम छननन करूया नाच बदके,कावळे ,चिमणी ,पोपट कोकिळा मिळून पक्षी पाच छूम छूम छननन करूया नाच ll१ll कुत्रा ,मांजर ,घोडा, बकरी, गाय मिळूनी प्राणी पाच छूम छूम छननन करूया नाच ll२ll मोटर ,टांगा ,सायकल ,होडी , विमान मिेळूनी वाहने पाच छुम छुम छननन करूया नाच ll३ll गुलाब, झेंडू ,जाई, कणेरी, सदाफुले ही फुले पाच छूम छूम छननन करूया नाच ll४ll आंबा, पिंपळ, वड ,बाभूळ, अशोक मिळून झाडे पाच छूम छूम छननन करूया नाच ll५ll तर्जनी, मध्यमा,अनामिका, करंगळी,अंगुठा मिळूनी एका हाताची बोटे पाच छूम छूम छननन करूया नाच ll६ ll संकलित
*धैर्यासारखे बळ नाही.* कोणत्याही व्यक्ती जवळ धैर्य व चिकाटी असेल तरच तो आपल्या सर्व इच्छा यशस्वी करू शकतो. कारण धैर्य आहे तेथे विजय निश्चितच आहे. धैर्य हे माणसाच्या हातातील एक मोठे हत्यारच आहे. या धैर्याच्या जोरावर माणसाला समर्थपणे आपले जीवन जगता येते. 'धैर्य हे मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य आहे.' असे ॲन्टोनियो या विचारवंताने म्हटले आहे. माणसावर एखादा कठीण प्रसंग ओढवला तर अशा संकटाला सामना करण्यासाठी आपल्याजवळ धैर्य, हिंमत असावी लागते . अशा संकटसमयी जर आपण हिम्मत ठेवली तर जीवनाची अर्धी लढाई आपण आधीच जिंकू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर आपण त्या व्यक्तीस खचून जाऊ न देता सांत्वनपर बोलून त्या व्यक्तीला हिम्मत द्यावी, त्याचे मनोबल वाढवावे, धैर्य वाढवावे. कारण माणसाच्या जीवनात धैर्यासारखे दुसरे बळ नाही. माणसाच्या दुबळेपणावर मात करण्याची शक्ती धैर्यामध्ये असते. दुबळ्या शरीरात शक्ती निर्माण करून प्राणवायू देत असते ते धैर्य होय. कोणत्याही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची वृत्ती म्हणजे धैर्य होय. परंतु या धैऱ्याचा अतिरेक होता कामा नये. जर अतिरेक झाला तर त्याला दुर्गुणाचे स्वरूप प्राप्त होते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की माणसाने आपले धैर्य सोडून द्यावे. जीवनातील संकटांचा समुद्र पार करायचा असेल तर माणसाला धैर्या च्या जहाजातून प्रवास करावा लागतो. या धाडसाने केलेल्या प्रवासामुळे तो आपल्या जीवनाची नौका यशस्वीपणे पार करू शकतो. कारण ध्येयाच्या मार्गावरून जाताना धीरगंभीर व्यक्ती आपले धैर्य कधी गर्भगळीत होऊ देत नाही. ज्यांना आपल्या जीवनात काही ठोस करून दाखवायचे असते ते धैर्याने पावलं पुढे टाकीत असतात. अशी व्यक्ती धोका पत्करून संकटाचा सामना करून धैर्याने पुढे जात असते. अशा हिमतीने काम करण्याच्या मनोवृत्तीला धैर्य असे म्हणतात. अशा व्यक्तीचे धैर्य कोणी नष्ट करू शकत नाही. म्हणून माणसाने हिम्मत सोडायची नाही, धैर्याने राहायचे मग प्रसंग कोणताही असो. कारण 'ज्याच्यात हिम्मत आहे त्यालाच या जगात किंमत आहे'. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.
*सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा* विषयः मराठी (व्याकरण) १) खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? मी दररोज शाळेत जातो १) , २) ? ३) .✅ ४) ! २) वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे? १) पूर्णविराम✅ २) अपूर्णविराम ३) अर्धविराम ४) स्वल्पविराम ३) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्हे वापरावे? १) ' ' २) --✅ ३) " " ४) ; ४) खालील वाक्यातील काळ ओळखाः मुले शाळेत गेली आहेत. १) पूर्ण वर्तमानकाळ २) पूर्ण भूतकाळ✅ ३) अपूर्ण वर्तमानकाळ ४) पूर्ण भविष्यकाळ ५) ' मी आंबे खाल्ले होते' या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळी वाक्य खालीलपैकी कोणते? १) मी आंबे खाल्ले असतील. २) मी आंबे खातो. ३) मी आंबे खात आहे. ४) मी आंबे खाल्ले आहेत.✅ ६) 'अभियान' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? १) अभियान २) मोहीम✅ ३) आव्हान ४) अभिनव ७) ' चांदणे' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? १) कौमुदी २) तारका✅ ३) जोत्सना ४) चंद्रिका ८) 'आगंतुक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? १) अभिवादन २) अनपेक्षित ३) आमंत्रित✅ ४) सहेतुक ९) खालील पर्यायातील अशुद्ध शब्द कोणता? १) शरदचंद्र २) कोट्यधीश✅ ३) शारीरिक ४) आशीर्वाद १०) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? १) कनिष्ट २) कनीष्ठ ३) कनिषठ ४) कनिष्ठ✅ 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍ प्रमिलाताई सेनकुडे.
श्लोक मना सर्वदा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडूनी द्यावे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुचि शोधूनी पाहे मना त्वाची रे पूर्व संचिते केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी संकलित
पञलेखन नोकरीसाठी बाहेर गावी गेलेल्या मुलाचे वडीलास पञ श्री दि.२६-०५-२०२० तीर्थस्वरूप बाबास श्री साष्टांग नमस्कार. वि.वि.पत्र लिहिण्यास कारण की मी घरून निघालो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच शहरी पोहोचलो. माझ्या मित्राने अगोदरच रूम पाहून ठेवले असल्याकारणाने मला रूमवर जायला फारसा वेळ लागला नाही. माझा मित्र आनंद मला रेल्वे स्टेशनला घ्यायला आला होता. त्यानंतर आम्ही दोघे मिळून घरी पोहोचलो. तिथे गेल्यावर मी फ्रेश होऊन जेवण केले. त्या दिवशी मला मेस चा डब्बा खावा लागला. जेवण करता करता मला आईने बनवलेल्या स्वयंपाकाची फार आठवण आली. इतकी वर्षे तिच्या हातचे जेवण जेवून मला सवय झाली होती. बाबा त्यादिवशी मी आरामाच केला. दुसर्या दिवशी पहाटेच उठून नोकरीवर पहिला दिवस असल्याकारणाने जायचे होते. नोकरीचा पहिला दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आनंदाचा होता. मी तयारी केली आणि लगेच ऑटो रिक्षा बसून ऑफिसला गेलो. तिथे गेल्यावर मला सगळे नवीन नवीन वाटले. सर्वांची ओळख झाली. मी ही माझी ओळख करून दिली. मला नेमून दिलेले काम मी दिवसभर करून सायंकाळी रूम ला पोहोचलो. खूप थकून गेलो होतो. चहा घ्यावा वाटत होता. आईची खूप आठवण आली. ती मला वेळोवेळी चहा जेवण नाश्ता किती आनंदाने करत होती व देत होती.बर असो. त्यानंतर फ्रेश होऊन मी पायऱ्या उतरून खाली गेलो चहाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन चहा घेतला. लगेच परतलो. मित्राने येता येताच मेस चा डब्बा आणला दोघे मिळून जेवण केलं. मला जेवण गेले नाही. कारण जी भाजी सकाळच्या डब्यात होती तीच भाजी संध्याकाळी सुद्धा आली होती. खूप दुःख वाटले. बरं असो. बाबा तुम्ही माझी काळजी करू नका. मला आता हळूहळू सवय होऊन जाईल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या व आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आईला म्हणावं माझी आठवण आली तर रडत जाऊ नकोस. लवकरच मी सुट्टी पाहून घरी तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत असंच संभाषण करत राहू. आई बाबा मला तुमची खूप खूप आठवण येते. पुन्हा एकदा तुम्हा दोघांना नमस्कार. तुमचा लाडका मुलगा पवन 〰️〰️〰️〰️〰️〰
स्वागत गीत स्वागत तुमचे श्रेष्ठांनो ,स्वागत तुमचे रसिकांनो ,स्वागत तुमचे...... पुलकित होती ती मने आमची घडता दर्शन राष्ट्रभक्तीचे, स्वागत तुमचे...... स्वधर्मविन जरी नसे सामना, बंधू प्रितीची वसो भावना, गावच्या क्रीडांगणी, कसबस दिसावे शौर्याने , स्वागत तुमचे...... विदर्भाची ख्याती भुवनी, अतिभास्तववाद असे अग्रणी प्रतीक असे हे इयत्तानगरी परस्परांच्या सहकार्याने स्वागत तुमचे....संकलन/ लेखन प्रमिलाताई सेनकुडे ता हदगाव जि नांदेड.
आईवडिलाचे आपल्या लाडक्या मुलीस पञ दि.२५-०५-२०२० श्री प्रिय लाडलीस आई बाबाचा शुभ आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले. पत्र वाचून फार फारआनंद झाला. तू लिहिलेल्या पत्रातील मजकुरातील शब्द आम्ही दोघांनी खूप खूप वेळेस वाचले. तुझे पत्र वाचून आमचे मन भारावून गेले. तू तिकडे तुझ्या संसारात रमलीस यातच आम्हा दोघांना खूप आनंद आहे. आपली मुलगी दिल्या घरी सुखी आहे, आनंदी आहे हीच आईवडिलांसाठी मोठी गोष्ट असते. आमच्या दोघांची तू काही काळजी करू नकोस. आम्ही इकडे आनंदात आहोत. तू तुझी व घरातील सर्व मंडळींची काळजी घेत जा. घरातील सर्वांना आनंदी ठेवण्याचे काम आता तुझे आहे. सर्वांचे सुखदुःख जाणणे व प्रेमाने राहणे हे काम आता तुझे आहे. कारण तू त्यांच्या घरची लक्ष्मी आहे, सून आहेस, व मुलगी सुद्धा आहेस. सासू-सासर्यांची सेवा करणे, व जावईबापूंना अगदी आनंदात ठेवून त्यांची सहचरणी म्हणून सोबत देणे हे तुझे कर्तव्य आहे. तू घेतलेल्या शिक्षणाचा फायदा घेऊन आपल्या संसाराला हातभार लावशील हीच अपेक्षा ठेवून आम्ही तुला जे उच्च शिक्षण दिले त्याचे सार्थक आम्हाला वाटेल व तुलाही आनंद मिळेल. बर असो. तू व तुझा परिवार सुखरूप, कुशलपूर्वक आहे. त्यातच आमचा आनंद आहे. तुझ्या घरच्या मंडळींना आमच्याकडून सप्रेम नमस्कार, तसेच जावईबापूंना व तुला अनेक शुभ आशीर्वाद. बेटा अधून मधून वेळात वेळ काढून पत्र लिहीत जा. व सर्व कुशल मंगल आहेत की नाही ते आम्हाला कळवत जा. आम्ही ख्यालीखुशाली तुला कळवत जातो. आमच्या दोघांची तब्येत चांगली आहे काही काळजी करू नकोस. तू पण तुझ्या व परिवारातील सर्वांच्या तब्येतीला जप. कारण आता कोरोना आजाराचे संकट आहे. हा आजार महाभयंकर असल्यामुळे आपण सर्वांनी व्यक्तिशः काळजी घेणे गरजेचे आहे. आवश्यक तेव्हाच बाहेर जा. नाहीतर घरीच रहा , सुरक्षित रहा, स्वतःस जपा. ठीक आहे बेटा. तुझी आठवण आम्हाला येते. व तुलाही आमची आठवण येते. आठवणीच्या मनातील कल्लोळ चालूच राहणार आहे. लवकरच हे कोरोणाचे संकट गेल्यावर मी तुला भेटायला येईल. काळजी घ्या, सुखरूप रहा, आनंदी राहा. कळावे तुझेच आईबाबा. प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.
*📚पत्रलेखन📚* *विषयः सासुरवाशीन मुलीचे आईवडीलास पञ.* (दि. 24- 05-2020) *श्री* तीर्थस्वरूप आई-बाबास चरणी श्रीसाष्टांग नमस्कार.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की आईबाबा मी बरेच दिवसा नंतर आपणास पत्र लिहीत आहे. क्षमा असावी. आईबाबा मला तुमची फार आठवण येते ग. तुम्ही खुशाल आहात ना! इकडे माझ्या सासरची सर्व मंडळी व मी कुशलपूर्वक आहे. ईश्वर कृपेने आई-बाबा तुम्ही पण कुशलपूर्वक असालच. आई बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत जा. वेळेवर जेवण करीत रहा. मी इकडे खूप आनंदात आहे. माझी काळजी करत जाऊ नका. माझ्या घरची मंडळी अतिशय चांगली आहे. माझे सासू-सासरे, व तुमचे जावई हे सर्व जण मला खूप लाडात ठेवतात. मी सासरी आहे की माहेरी आहे हा भास सुद्धा मला होऊ देत नाहीत. अगदी लाडाने मला वागवतात. आई तू बाबा ची काळजी घेत जा, त्यांना वेळेवर औषधी देत जा. बाबा तुम्ही आईची काळजी घेत जा. तुम्हाला माझी आठवण आली तर मनाला दुःख करून घेत जाऊ नका. मलाही तुमची फार आठवण येते. परंतु काय करावं मुलीचे लग्न झाल्यावर आपल्या घरी सासरी नांदायला प्रत्येक मुलगी जाते. तिचा जन्म ज्या घरात झाला , ती लहानाची मोठी जिथे झाली तिथेे तिचे सर्व लाड आई-वडिलांनी पुरवले तिला लहानाची मोठी करून शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करून शेवटी तिला ते घर सोडून लग्न करून सासरी जावं लागतं. बरं असो. आई बाबा ही तर जगाची रीतच झाली. मी इकडे खुप आनंदात जरी असली तरी मला तुमच्या सर्वांची खुप आठवण येते. तुमच्या आठवणीचा कल्लोळ माझ्या हृदयात सारखा होत असतो. आपल्या चाळीतील मित्र-मैत्रिणींसोबत खेळणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे . त्यानंतर आई तू मला गरम गरम जेवायला देणे. माझे आवडते पदार्थ तू किती आनंदाने करत होती.बाबा माझ्यासाठी किती खाऊ आणीत होते. हे सर्व आठवले की मी बालविश्वात हरवून जाते ग आई! असो आई बाबा तुम्ही प्रेमाचा सागर आहात. आपल्या लाडक्या लेकीच्या मायेचा पाझर आहात. तुमच्या आठवणी हृदयात मी जपणार, घायाळ त्या मनावर पत्र लिहून फुंकर मी मारणार. *आईबाबा* *"राहून मी तुमच्या दूर सुद्धा*, *सदैव तुमच्यासोबत आहे,* *सासरमाहेर माझे एकच* *समजून मी खूप सुखी व आनंदात आहे."* कळावे तुमचीच लाडकी सोनु प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.
चारोळी सहवास तुझा १) सहवास तुझा का हवाहवासा वाटतो तुझ्याविना जीव माञ कासावीस होतो. २) फुललेल्या मनात सहवास तुझा जपला अनवाणी पायात काटा रुतला. ३) सहवास तुझा सार काही सांगून गेला अंतरीचा भाव नजरेत टिपून गेला. ४)विवाहाचा बंधनात बांधून जातात.... सहवास तुझा माझा करून संसार सुखाचा करतात. ५) जीवनाची बाग तुझा सहवासाने सजवते नाही भेटला तरी तू मीच मला आठवते. 〰️〰️
बालविवाह रोखले गेले पाहिजे जेव्हा स्त्री आणि पुरुष धार्मिक विधीनुसार एकत्र येतात तेव्हा त्यास विवाह म्हणतात. दोन शरीरच नव्हे तर दोन मन एकत्र जोडणे म्हणजे विवाह असते. परंतु एकोणिसाव्या शतकात हिंदू समाजात एक वाईट प्रथा होती ती म्हणजे बालविवाह होय. जेव्हा दोन शरीर दोन मन अपरिपक्व अवस्थेतील असतात तेव्हा त्यांना विवाहाच्या बंधनात बांधणे म्हणजे बालविवाह होय. ही बालविवाहाची अनिष्ठ प्रथा मोडून काढण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी बंड पुकारले. पूर्वीच्या काळी या बालविवाह प्रथेचा इतका अतिरेक झाला होता की, मूल गर्भावस्थेत असतानाच त्यांचा विवाह करत असत. या प्रथेस 'पोटालाकुंकू 'लावणे असे म्हणत होते. परंतु गर्भावस्थेतील काही रोगामुळे ते मूल मृत्यू पावले तर संपूर्ण जन्मभर त्या स्त्रीला विधवेचे नरका प्रमाणे वाईट जीवन कंठावे लागत असे. अशा या वाईट प्रथेविरुद्ध स्वामी दयानंद सरस्वती यांनी बंड पुकारून लोकांना पेटविले की, शास्त्राच्या नियमानुसार स्त्री-पुरुषांचे योग्य वयातच लग्न करावे. नियमांचे पालन करूनच विवाह करण्यात यावा. आणि जे नियमभंग करतील ते जीवनात तर दुःखी होतातच पण त्याच बरोबर ते अनैतिकतेची गुन्हेगार ठरतात. स्वामीजींनी बालविवाहास विरोध करून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य याला प्राधान्य देऊन राष्ट्राचा समाजाचा विकास कसा होईल हे समाजाला पटवून दिले.काही कारणामुळे स्त्रियांना खूपच कमी लेखले जात असे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. समाजातील अनिष्ट चालीरीती ,रुढी-परंपरा, वाईट प्रथा ,अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव या सर्व कारणांमुळे बालविवाह होतात. आजही आपण बघत आहोत समाजातील काही भागात बालविवाह होतात. हे बालविवाह रोखण्यासाठी समाज हा शिक्षित झाला पाहिजे. मानव प्राणी हा सतत समाजात वावरत असल्यामुळे तो समाजशील देखील आहे. म्हणून जर हा मानव निरक्षर असेल तर तो समाजाच्या नुकसानीला कारणीभूत ठरतो. आजचे युग हे विकासाच्या मार्गावर धावणार युग आहे, आधुनिक यांत्रिकीकरणाचे युग आहे. जुन्या ,चालीरीती,परंपरा यांचा नाश करून नवीन कल्पक समाजाची निर्मिती करण्याचे कार्य मानवाच्या हाती आहे .चांगले विचार, चांगले आचार, चांगले वर्तन हे शिक्षणाच्या माध्यमातून साध्य होत असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती साक्षर होणे काळाची गरज आहे. व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती नियमांचे'पालन करेल. नियमांचे पालन झालेले असल्या कारणाने बालविवाह होण्यास प्रतिबंध घालता येईल. 1978 च्या कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावरच विवाह करण्यात यावा. या कायद्यानुसारच समाजातील प्रत्येकाने याचे जाणीवपूर्वक पालन करून आपल्या मुला मुलीचे विवाह कायद्याच्या चौकटीतच राहून विवाह करून द्यावे तरच बालविवाह बंद होतील, रोखता येईल. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता .हदगाव जि. नांदेड
*प्राथमिक शिक्षणाचे महत्व* मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे शिक्षण होय. शिक्षण ही एक पवित्र गंगा आहे. या पवित्र गंगेतून शिक्षणाचे पवित्र आपण राखले पाहिजे, जपले पाहिजे. मानवी जीवनात प्राथमिक शिक्षण ही माणसाची प्राथमिक गरज आहे. प्राथमिक शिक्षण यशस्वीपणे घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाचे उद्दिष्ट गाठू शकते. कारण प्राथमिक शिक्षणाची पहिली पायरी सफलतापूर्वक पार केल्यामुळे व्यक्तीस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते. खरं तर शिक्षण हे जीवन विकासाचे साधन आहे. माणसाला माणूस बनवण्याचं शिक्षण एक माध्यम आहे. “आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.” असे डाॕ.जॉन या विचारवंताचे मत आहे. कोणत्याही व्यक्तीचा प्राथमिक शिक्षणाशी जेवढा घनिष्ठ संबंध असतो तितका फारसा संबंध माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाशी येत नाही. प्राथमिक शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान अनंतकाल टिकून राहते. सदा स्मरणात राहते. प्राथमिक शिक्षणातूनच व्यक्तीची जडणघडण होते. व्यक्तीचा जीवनस्तर उंचावयाचा असेल तर प्राथमिक शिक्षणातून योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. शिक्षणामुळे चांगल्या वाईटाची कल्पना येते, भावनिक परिपक्वता येते. प्राथमिक शिक्षणाचा माध्यमातून बालकाचा भावनिक समतोल , सवयी आणि वृत्ती, बालकाचे शारीरिक, मानसिक आरोग्य, तसेच त्याच्यामध्ये असलेली सुयोग्य अभिरूची हे जाणून घेऊन त्यांच्या या विकासावर अधिक भर दिला जावा. प्राथमिक शिक्षणात लेखन-वाचन या ज्ञाना सोबतच वरील बाबींचा विचार अधिक प्रमाणात करण्यात यावा. तरच प्राथमिक शिक्षण यशस्वी होईल. विनोबा भावे यांनी म्हटले आहे 'यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.' कोणत्याही व्यक्तीचा यशाचा पाया म्हणजेच प्राथमिक शिक्षण होय. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा चौफेर विकास घडून येतो. सारा समाज ज्ञानी, स्वावलंबी झाला तरच समाजात शांतता, सुव्यवस्था व बंधुभावाचे वातावरण असेल, दिसेल. म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित होणे आवश्यक आहे. सामान्य माणसास शिक्षणापासून वंचित ठेवणे योग्य नाही.प्रत्येक व्यक्तीस शिक्षण मिळायलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. कारण शिक्षणामुळे व्यक्तीला समाजात विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त होतो. शिक्षणामुळे मानवी जीवन सुरक्षित व संस्कारशिल बनते. योग्य संस्कार आणि योग्य शिक्षण यांची सांगड घालून समाजबांधणीसाठी चारित्र्यसंपन्न नवीन पिढी निर्माण करता येणे हेच खरे शिक्षणाचे काम आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका ©️श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.
*पाण्याची बचत, जलसंवर्धन* हवा पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे विविध रूपात मिळणारी प्रवाही संपत्ती आहे.पाणी हेच जीवन आहे. पाणी जीवनाश्यक असल्यामुळे पाण्याची टंचाईची समस्या सोडवण्यासाठी अग्रक्रम द्यावा लागतो. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसाठी भरपूर पाणी लागते.भारतात खूप मोठा भाग पाण्यासाठी पावसावर अवलंबून आहे. पावसाचे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात मिळत नाही. पावसाळी ऋतूतही अंतर्गत चढउतार आहेतच. विविध रुपात मिळणारी पाण्याची ही प्रवाह संपत्ती या जलचक्रामुळे दैनंदिन जीवनात सजीवांना पिण्यासाठी ,वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होते. तरी आपल्या या भारत देशात बऱ्याच भागात पाण्याची टंचाई भरपूर प्रमाणात आहे. बऱ्याच भागात पाण्याचे दुर्भिक्ष आपल्याला दिसते. पाण्याची गरज वाढण्याचे अनेक कारणे आहेत. भारतातील लोकसंख्या वाढ ही भरपूर प्रमाणात असल्यामुळे पाणी अधिकाधिक लागते. शेतीसाठी भरपूर पाणी लागतं.तसेच उद्योगधंद्यात कारखान्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते. आज पाण्याची गरज ओळखून मानवी जीवनाला पाण्याची बचत करणे फार आवश्यक आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमकी गरज ओळखून पाण्याचा दुरुपयोग उधळपट्टी कमी करावी लागेल. जसे की आवश्यक असेल तरच नळ चालू करावा. विनाकारण नळाचे पाणी वाया जाऊ देऊ नये. दात घासताना आंघोळ करताना आवश्यक तेवढेच पाण्याचा वापर करावा. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. अंघोळीसाठी शावर चा वापर न करता बादलीत पाणी घेऊन वापर करावा. मोरयातील सांडपाण्याचा वापर बागेतील झाडांसाठी करावा. छपरावरून पडणारे पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर करावा. किंवा घराच्या छपरावरील पावसाचे पाणी टाक्यात साठवुन पाणी रिचार्ज पीट च्या साह्याने पाणीसाठ्यात भरावे. सांगायचे तात्पर्य म्हणजे एवढेच की आपल्या दैनंदिन व्यवहारात सांडपाण्यावर जे पाणी लागते त्या सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया करून त्या पाण्याचा अन्य कामासाठी वापर करणे आवश्यक आहे. पाणीबचत आपल्याला कोणत्या मार्गाने मिळते हे सर्व उपाययोजना आपण करणे आवश्यक आहे. ' पाणी आडवा, पाणी जिरवा' लक्षात घेऊन आपल्याला पाणी अडवता येईल.जसे की अरुंद नाल्यावर छोटे बंधारे बांधून, पाणी अडवून हे पाणी जमिनीत जिरवता येईल. मातीचे बंधारे बांधून पाणी अडवता येईल व मातीत जिरवता येईल. पाण्याची बचत करण्यासाठी उद्योग-धंद्यात पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. तसेच शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते यामध्ये कशी बचत करता येईल ते पाहावे व शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. शेतातील केर कचऱ्याचे आच्छादन करावे. म्हणजेच केरकचरा जमिनीवर पसरवावा त्यामुळे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने होईल आणि पाण्याचा अपव्यय आपल्याला टाळता येईल. शेतजमिनीत पाणी साठवण्यासाठी खड्डे खोदले तर पाणी बचत करता येईल. बांधकाम करताना कोणत्या ऋतूत बांधकाम करावे हे ध्यानात ठेवून ज्यावेळी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल त्यावेळेस बांधकामाला सुरुवात करावी. उन्हाळ्यात पाणीटंचाई भीषण असते अशावेळी जर बांधकाम केले तर पाणी उपलब्ध होणे अवघड होते. अशा वेगळ्या उपाय योजना जर केले तर पाण्याचा अपव्यय टाळता येऊन पाण्याची बचत करता येते. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आपल्याला झाडे लावणे व जगविणे हे काम करणे फार आवश्यक आहे. जर आपण झाडे लावली तर पावसाचे पाणी भरपूर प्रमाणात पडेल. व हे पावसाचे वाहून जाणारे पाणी आपण विविध पद्धतींनी जमिनीत साठवून ठेवू शकतो. आभाळातून पडलेल्या पाण्याला आपण प्रयत्नपूर्वक जमिनीत जिरवले पाहिजे. आणि जलसंधारण वाढविले पाहिजे. यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे ,विहिरी ,नद्या ,यांचे पाणी आटणार नाही. अशाप्रकारे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल. म्हणून आपण सर्वांनी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आणि पाण्याचा अपव्यय न करता पाण्याची बचत केली पाहिजे. तरच आपल्या पुढील भविष्यकाळातील पिढी सुखी समृद्ध व आनंदाचे आयुष्य जगेल. त्यासाठी आपल्याला पाणी बचतीच्या वेगवेगळ्या उपाययोजना आता करणे फार आवश्यक आहे. एक म्हण आहे माणसाने आपल्या जीवनात *'पाणी, नाणी, आणि वाणी याचा जपून वापर करावा.'* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका) ता.हदगाव जि.नांदेड. 〰️〰️〰️〰️〰️〰️
( 5) *'मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.'* *स्त्रीशिक्षण - काळाची गरज* *“विद्येविना गेले, वाया गेले पशू,* *स्वस्त नका बसू ,विद्या घेणे.”* या ओळीतून सावित्रीबाईने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले. मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा फुले दांपत्य होय. अज्ञानरूपी अंधकाराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे शास्त्र नाही. शिक्षणाने मनुष्याला सत्य व असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे. त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृती होते. त्यातल्या त्यात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण असे महात्मा ज्योतिराव यांचे मत होते. म्हणून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले. १ जानेवारी १८४८ या दिवशी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. तत्कालीन ब्रिटिश भारतातील या देशातील तेही महाराष्ट्रातील व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.भारतातील ही पहिलीच मुलींची शाळा आहे. *सावित्रीबाई या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका!* जानेवारी महिन्यात या शाळेत सहा मुली होत्या. नंतर वर्षाखेरीस शाळेतील मुलींची संख्या ४५ होती. *“मानवाचे कर्तुत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने , दीर्घदर्शी प्रयत्नाने आणि तीव्र बुद्धिमत्तेने केलेल्या सुधारणेचे फलित होय."* प्रयत्नवाद आणि कर्तुत्वावरची अढळ निष्ठा व्यक्त सावित्रीबाईनी केली.असे पराकोटीचे परखड विचार सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी मांडले. स्त्री जीवनात विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला शिक्षणाचा मार्ग. हा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, आगरकर ,कर्वे आणि इतर अनेकांच्या प्रयत्नातून स्त्रियांना विद्यालयाची कवाडे उघडी झाली. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कसोटीत स्त्री अग्रेसर आहे.ते केवळ शिक्षणानेच. पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे नाही. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येते. पण काही ग्रामीण आदिवासी भागातील स्त्री अजूनही अशिक्षित आहे. शिक्षित करणे आवश्यक आहे. ती जर सुशिक्षित, सज्ञानी झाली तिचा फायदा कुटुंबास होतो. एक चांगली माता सांस्कृतिक शिक्षकापेक्षाही श्रेष्ठ असू शकते, हे स्त्री शिक्षणातून दिसते. म्हणून प्रत्येक स्त्री शिक्षित होणे महत्त्वाचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू मनत असतं, “मुलांचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे शिक्षण आहे, परंतु मुलींचे शिक्षण हे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आहे”. म्हणून स्त्रियांना शिक्षण देणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत मुलांचे संगोपन आणि संवर्धन असे दुहेरी कार्य आजच्या मातेकडून अपेक्षित असल्यामुळे तिला सर्व सुसूत्रता राखून कार्य करावयाचे असते. यावरून स्त्रीच्या शिक्षणाची महती लक्षात येते. म्हणून स्त्रियांना त्यांच्या जीवनातील कार्याची पूर्ती करण्यासाठी शिक्षण आवश्यक असते. *'स्त्री म्हणजे सृजनशील सामर्थ्य आणि करुणाजन्य शक्ती होय'.* स्त्रीही सृजनशील ,सामर्थ्यवान, करुणा जन्य असते. *'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धारी '.* या जगाचा उद्धार करायचा असेल तर स्ञियांना शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे. जर राष्ट्राचा विकास घडवायचा असेल तर मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घ्यायला हवा. स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने ज्ञानज्योत पेटवून आपले जीवन उजळावे, प्रज्वलित करावे. कारण स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण ही काळाची गरज ओळखून स्त्रीने विद्या घ्यावी, सुशिक्षित बनावं, आपला नेभळट पणा सोडून धीट बनावं. एक आदर्श स्त्री, एक आदर्श पत्नी, आणि एक आदर्श माता म्हणून जगावं. त्यासाठी स्त्रीशिक्षण हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच स्त्री ही समाज परिवर्तनाची देवता ठरेल. हे परिवर्तन आज हळूहळू बदलू पाहत आहे. आजची स्त्री अबला नाही ,तर सबला आहे. सक्षम बनली आहे.ती कर्तुत्ववान नारी झालेली आहे. आजच्या बदलत्या स्त्रीजीवनाच्या या काळानुसार स्त्री बदलू पाहत आहे. आजच्या युगातील स्त्री ही विचारी आहे. गेल्या शतकातील स्त्री आणि आजची स्त्री यात महदंतर आहे. आजच्या स्त्रीचा मार्ग विकासाकडे, प्रगतीकडे आणि वैभवाकडे जात आहे. स्त्री शिक्षणाची महती व्यक्त करताना माझ्या मते....... *"अंधारमय जीवनात ज्ञानदीप माझा उजळला, फुले सावित्रीबाई मुळे प्रकाश जीवनात झळकला.”* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ©️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
इयत्ता पाचवी ते दहावीसाठी सुट्टीतील उपक्रम *प्रश्नमंजुषा इतिहास विशेष* दिनांक 20 मे 2020 बुधवार आजची इतिहास विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे ---------------------------------- https://testmoz.com/q/3457022 ---------------------------------- *संकलन :- श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* सहशिक्षिका ता. हदगाव जि. नांदेड 9403046894 ********************* *निर्मिती :- नासा येवतीकर* 9423625769 ---------------------------------- ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
( 5) सहल सहल या शब्दातच आनंद दडलेला आहे. सह म्हणजे सोबत सर्वांच्या सोबत काढलेली ती म्हणजे सहल. खरं म्हणजे सहल काढण्याचा उद्देश असा असतो की एकमेकांच्या सोबत राहून दिलखुलासपणे गप्पा गोष्टी गाणी याचा मनमुराद आनंद लुटणे तसेच आपण ज्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देणार आहोत त्या स्थळाची माहिती जाणून घेणे. आपल्या ज्ञानाची वृद्धिगत कक्षा वाढविणे. अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा निर्माण होणे. ही ज्ञान प्राप्तीची लालसा आपल्याला सहलीतून प्राप्त होते. सहलीमुळे आपल्याला वेगळा आनंद मिळतो. मित्र मैत्रिणी सोबत खाण्याची मेजवानी करता येते. आपण जिथे जाऊ सहलीला तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. सहल म्हणजे नुसता आनंद नव्हे तर विविध माहिती जाणून घेण्याची बुद्धीला लागलेली भूक आहे. ही बुद्धीची भूक आपण मिटविण्यासाठी आपल्यामध्ये जिज्ञासा, चिकाटी वृत्ती, ज्ञानलालसा हे गुण असणे आवश्यक आहे. *संस्मरणीय सहल* आज पर्यंत मी अनेकदा सहलीला गेले आहे.दरवर्षी आमची शालेय सहल निघत असते. मात्र एवढ्या सहलीपैकी मला माझ्या कुटुंबा सोबत केलेली चांदण्या रात्रीची सहल मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. ह्या चांदण्या रात्रीचा सहलीचा विचार आम्ही बहीण भावाने मिळून मांडला होता. आणि हि आमची सहल एक आनंददायी , विलक्षण होती. आमच्या गावा जवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले होते. घरातील आणि सर्व मंडळी मिळून निघालो. पौर्णिमेची रात्र होती. पौर्णिमेच्या रात्रीला सारे आसमंत तुडुंब चांदण्यांनी भरलेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते आभाळ निरभ्र होते. आजूबाजूला शेती होती. गावाबाहेर शांतता होती. लखलखीत चांदण्यांचा प्रकाश झळकत होता. सुखद असा हवेतला थंडगार गारवा जाणवतं होता . आजूबाजूला झाडे आणि आकाशातील चांदण्या असा सुंदरमय देखावा मनाला प्रसन्न करणारा होता. असा हा चांदण्या रात्रीच्या सहलीचा प्रवास अगदी आगळावेगळा होता. आम्ही यापूर्वी अनेक सहली काढल्या पुढेही काढू पण चांदण्या रात्रीचा तो सहलीचा प्रवास मनाला भावलेला होता.एक संस्मरणीय सहल म्हणून हा प्रवास जिवनात एक अविस्मरणीय, आनंददायी मनाला हर्ष करणारा होता. “आसमंतात दाटला चांदण्यांचा पसारा नभात दिसे चंद्र हा शुभ्र लख्ख पांढरा मधुमालतीचा पसरे हा गंध सारा पुनवेच्या सहलीचा आनंदच न्यारा.” 〰️〰️〰️〰️〰️〰️ ©️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड
(5) लेख.... *प्रदूषण एक भीषण समस्या* परिसरातील अहितकारक बदलांना 'प्रदूषण 'असे म्हणतात. हे प्रदूषणाचे अहितकारक बदल आजच्या बुद्धिमान माणसाने स्वतः च्या समोर स्वतः हे प्रदूषणाचे संकट निर्माण केले आहे. प्रदूषणाचे हे संकट काही प्रमाणात कमी करता येईल. मर्यादा ठेवता येईल पण त्यासाठी पृथ्वीवरील प्रत्येक मानव जागरूक झाला पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम फक्त मोहीमच न राहता ते प्रत्यक्षात उतरून झाडे लावली पाहिजे आणि जगवलीच पाहिजे. पर्यावरणातील झाडे न कापता अधिकाधिक लावून जगवणे हे ध्येय ठेवले तरच प्रदूषणाची ही भीषण समस्या कमी करता येईल. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' झाडे हे आपल्याला सावली, फुले ,फळे देतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे व जगविणे आवश्यकच आहेत. हे जग निर्माण करताना परमेश्वराने माणूस व पर्यावरण यात सुंदर समतोल साधला आहे. निसर्ग व मानव एकमेकांना पूरक होते. परंतु औद्योगिक क्रांती झाली आणि हा सर्व समतोल बिघडला. प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. त्यात प्रामुख्याने ध्वनिप्रदूषण वायुप्रदूषण , जलप्रदूषण हे जास्त प्रमाणावर निर्माण झालेली भीषण समस्या आहे. प्रदूषणाचा परिणाम होत असल्यामुळे वातावरण दूषित झालेले आहे. (वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम) माणसाची गती वाढली हवेचे प्रदूषण निर्माण झाले. हवेच्या प्रदूषणामुळे माणसाला श्वासोच्छवासला त्रास होतो. विविध आजार होतात. आकाशातील दूषित हवेचे ढग, पावसाळी ढगांवरही मात करतात. माणसाने गिरण्या कारखाने सुरू केले. आणि मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण , जल प्रदूषण निर्माण झाले. (जल प्रदूषण) कारखान्यामुळे दूषित पाणी नदीत सोडण्यात आले. नद्यांचे सारे पाणी दूषित झाले. या जलप्रदूषणामुळे माणसाला नाना प्रकारच्या आजाराला , रोगराईला आणि साथीच्या आजाराला बळी पडावे लागले. पाण्याची अवस्था किंवा त्यामधील घटक द्रव्य यांच्यामधील माणसाने अहितकारक बदल घडून आणून जलप्रदूषण निर्माण केले आहे. (ध्वनी प्रदूषण) वातावरणातील अनावश्यक, असुविधाजनक ,अप्रिय, प्रतिकूल यांच्या हानिकारक परिणाम होऊन ध्वनी प्रदूषण निर्माण झाले. माणसाने लावलेले विविध शोध स्वतःसाठी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी ध्वनिक्षेपक, दूरचित्रवाणी अशा कितीतरी गोष्टी ध्वनिप्रदूषण निर्माण करीत आहेत. सतत मोठे मोठे आवाज कानावर पडल्याने कर्णबधिरता येण्याची मोठी शक्यता आहे. या ध्वनिप्रदूषणामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन मानसिक ताण निर्माण होतो, रक्तदाबावर ही विपरीत परिणाम होतो.पोट भरण्यासाठी पोटाच्या मागे लागलेला ग्रामीण समाज शहराकडे धावू लागला . त्यामुळे शहरातील झोपडपट्टी वाढली आणि प्रदूषणही वाढले. यांत्रिकीकरणाचा दुष्परिणामांच्या अनेक संकटापैकी वातावरणातील ओझोन वायू नष्ट होण्याचे संकट आता वसुधेवर कोसळले आहे.म्हणजे प्रदूषणाचा भस्मासुर माणसानेच निर्माण केला आहे. आणि आज तो माणसाच्या जीवावर उठला आहे. या सर्वच्या सर्व प्रदूषणामुळे वातावरणाचा तोल ढासळला असून तो समतोल ठेवण्याकरिता प्रदूषणावर नियंत्रण ठेवावयास तसेच प्रदूषण होणाऱ्या गोष्टींची दक्षता पाळावयास पाहिजे. त्यामुळे प्रदूषणास सहाय्य होते अशा व्यवस्थेवर प्रतिबंध घातले पाहिजे. कारण माणसासाठी प्रदूषण ही भीषण समस्या होऊन बसलेली आहे. ही समस्या नष्ट करायची असेल तर पर्यावरण विषयाच्या दृष्टिकोन लहानपणापासूनच मानवी मनावर बिंबवायला सुरुवात केली पाहिजे. कारण उद्याचा नागरिक हा पर्यावरण जागरूक नागरिक हवा, तरच मानवजातीची धडगत आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ लेखिका ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( सहशिक्षिका) ता. हदगाव जि. नांदेड.
इयत्ता पाचवी ते दहावीसाठी सुट्टीतील उपक्रम *प्रश्नमंजुषा विज्ञान विशेष* दिनांक 17 मे 2020 रविवार आजची विज्ञान विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे ---------------------------------- https://testmoz.com/q/3392728 ---------------------------------- *संकलन :- श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* सहशिक्षिका ता. हदगाव जि. नांदेड 9403046894 ********************* *निर्मिती :- नासा येवतीकर* 9423625769 ---------------------------------- ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
1) मानवी शरीराचे तापमान साधारणता किती सेंटीग्रेड असते? 1) 37 अंश ✅ 2) 36 अंश 3) 35 अंश 4) 38 अंश 2) मानवी शरीरात लहान आतड्याची लांबी किती मीटर असते? 1) 5 ते 7 2) 6 ते 8✅ 3) 7 ते 9 4) 8 ते10 3) शरीराचे संतुलन मेंदूच्या कोणत्या भागामुळे होते? 1) प्रमस्तिष्क 2) मस्तिष्कस्तंभ 3) पश्चमस्तिष्क 4) अनुमस्तिष्क✅ 4) कांदे कापताना कोणता वायू बाहेर पडतो? 1) अमोनिया✅ 2) पोटॕशिअम 3) फाॕस्फरस 4) सल्फरडायऑक्साईड 5) कोणत्या इंद्रियात पित्ताची निर्मिती होते? 1) स्वादुपिंड 2) यकृत✅ 3)जठर 4)लहान आतडे 6) कोणत्या जीवनसत्वा अभावी रातांधळेपणा येतो? 1) ड 2) क 3) अ ✅ 4) ब 7) गव्हात कोणते प्रथिन असते? 1) लॕक्टोज 2) ग्लुकोटेनिन ✅ 3) लायसिन 4) हिस्टीडीन 8) खालीलपैकी कोणत्या पदार्थात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते? 1) मासे 2) फळ व भाज्या 3) दूध 4) अंडी✅ 9) सकाळच्या सूर्यकिरणांमुळे त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? 1) अ 2) ई 3) क 4) ड ✅ 10) मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे आहेत? 1) 46 ✅ 2 ) 23 3) 33 4) 12 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका)
*📚Work from home📚* *शब्द वाचा.व वहीत लिहा.* *विषयः इंग्रजी* Rhyming Words.(रायमिंग वर्ड्स) (यमक जुळणारे शब्द) 🔸 But Cut Gut Hut बट कट गट हट परंतु ,कापणे, आतडे, झोपडी 🔸Seat Beat Heat Neat सीट बीट हिट नीट आसन , मारणे , तापवणे, छान 🔹Lea Sea Tea Pea लि सी टी पी कुरण ,समुद्र ,चहा ,वटाणा 🔸Last Past Fast Cast लास्ट पास्ट फास्ट कास्ट शेवटचा ,भूत ,जोराने ,जात 🔸Car Jar Far War कार जार फार वार गाडी ,भरणी, दूर ,युद्ध 🔹Fall Walll Call Tall *फाॕल वॉल कॉल टाॕल* *पडणे ,भिंत ,बोलावणे, उंच* 🔹Hay Bay Way Day *हे बे वे डे* *वाळलेले गवत, उपसागर , मार्ग ,दिवस* 🔸 *Bear Dear Mare Fear* *बिअर डियर मेअर फियर* *अस्वल , प्रिय , घोडी, भीती* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका) ता.हदगाव जि.नांदेड. 〰️〰️〰️〰️〰️〰️ *घरीच रहा, सुरक्षित रहा.*
( 5) लेख समजदार नागरिक , सुजान नागरिक माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात वावरताना माणसाने थोरामोठ्यांचा आदर करणे , सर्वांशी मानसन्मानाने वागणे, लहानास न दुखावणे, सर्वांशी प्रमाणिकपणे वागणे या समजदारी च्या गोष्टी माणसांमध्ये असणे आवश्यक आहे. व्यक्ती आणि समाज जेव्हा विविध चांगल्या गुणांनी युक्त होतात तेव्हा समाजाचा विकास साधतो. याउलट सद्गुण लोप पावून दुर्गुण शिरले की समाजाचे पतन होते व प्रगती खुंटते. सुजान नागरिक म्हणजे ज्या गुणांमुळे, तत्त्वामुळे व्यक्ती समाज आणि विश्व यामध्ये परस्पर सुसंवाद साधून मानवाचा विकास होतो. असे सुजनात्व ज्या नागरिकामध्ये आहे तो नागरिक म्हणजे समजदार नागरिक होय. आपण जीवनात कसं वागावं? तर सर्वांशी चांगलं वागावं. हे समजणे म्हणजे समजदार नागरिकाचे लक्षण होय. नम्रता ,सौजन्य , सभ्यता, शिष्टाचार आणि आर्जवता ही जीवनमूल्ये ज्याच्या अंगी असते ती व्यक्ती समजदार व्यक्ती होय. सभ्यता आणि सौजन्य हे समजदारीचे दोन चक्षू आहेत. आपल्या जीवनात सर्वांशी मर्यादशील वागणं हे शिष्टाचार होय. ह्या शिष्टाचाराचे सुवर्णसूत्र ज्याच्यामध्ये आहे ती व्यक्ती सुजान नागरिक होय.सुजाणता म्हणजे सदाचाराचे वळण.ज्या परिसरात आपण वाढतो व वावरतो त्या परिसरातील सामाजिक एकसंघता बाळगणे व टिकून ठेवणे तसेच निसर्ग प्राणी पक्षी यांचे संरक्षण व जोपासना करण्यासाठी प्रेरित होणे व साऱ्याबद्दल प्रेम,आपुलकी निर्माण होणे म्हणजे सुजान नागरिक होय. आपला आत्मसन्मान जागृत ठेवून आत्मोद्धारासाठी प्रयत्नशील राहून आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनाची जबाबदारी चांगल्याप्रकारे पेलणे म्हणजे समजदार नागरिक होय. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.
लेख (5) *वाचन* *'वाचन हे मनाचे अन्न आहे.'* माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची गरज भासते तशीच गरज आपल्या मेंदूला सुद्धा असते. आणि ती गरज वाचनाने समृद्ध होते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि हे ज्ञान वाढविण्यासाठी म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत होण्यासाठी वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने मनुष्य सुसंस्कारित होतो. वाचनाने माणसाच्या विचार करण्याची क्षमता प्रगल्भ होते. वाचनाने'मनुष्याची बुद्धी वृद्धिगत होते. वाचनाने विकास होतो. आपली जीवन समृद्धता, मेंदूची विचार करण्याची क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला अधिकाधिक वाचन करणे आवश्यक आहे. वाचण्याची अधिकाधिक सवय लावून घेणे आवश्यक आहे. असं म्हणतात 'वाचनाचा लावा छंद ,त्यातच आहे खरा आनंद.'माणसाला खरोखर चा आनंद मिळवायचा असेल तर पुस्तक वाचणे फार आवश्यक आहे. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आपण 'वाचन प्रेरणा'दिवस म्हणून साजरा करतो. सर्वांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस साजरा करतात. ज्ञानवंत ,गुणवंत व्हायचे असेल तर वाचनाचा छंद लावून घेणे आवश्यक आहे. माणसाने नेहमी श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानवंत होणे व गुणवंत होण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने किमान एक तास तरी वाचन करावे. आपण जे वाचन करत असतो ते वाचन आपण मन व मेंदू यांची स्थिरता कायम ठेवून वाचावे. असे वाचन केलेले कायम स्वरूपी स्मरणात राहते. नाहीतर भराभर वाचून साठत जाणारे ज्ञान हे फलहीन वृक्षाप्रमाणे असते. मानवी जीवनाचे सार ज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर वाचन करावेच लागेल. म्हणूनच मानवाच्या जीवनात पुस्तकांना , ग्रंथांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. मानवाला आपल्या ज्ञानाचे अमृत पाजून चिरंजीवी करण्याचे हे कार्य ग्रंथच करत असतात. वाचनामुळे आपले जीवन जगण्याचे सामर्थ्य वाढते व आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. वाचनामुळे आपल्या मनाची उदासीनता दूर होते. वाचनामुळे आपल्या भावभावनांना प्रतिसाद मिळतो. आणि आपल्या मनाचे उदात्तीकरण होते. मनात उद्भवणार्या शंकांचे निरसन वाचनामुळे होते. मनुष्य जीवन जगत असताना एकाकी राहू शकत नाही. त्याला कोणाचा तरी सहवास हवासा वाटतो. अशा एकाकी' सहवासात त्या व्यक्तीने पुस्तक वाचनाचा छंद जोपासला तर त्याच्या उर्वरित आयुष्याचा काळ चांगल्यारितीने व्यतीत होतो. पुस्तक वाचण्याच्या छंदामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. अधिकाधिक व्यापक गोष्टींची माहिती मिळते. मानवाच्या जीवनात वाचनास फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र व निवारा याची जशी गरज असते.तसेच ज्ञान वृद्धींगत होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे फार महत्त्वाचे आहे. आपले परिपूर्ण जीवन जगायला शिकवणारी व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन फार आवश्यक आहे. वाचन केल्याने ज्ञान प्राप्त होते. आणि ह्या ज्ञान प्राप्तीमुळे मनुष्य या विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. ज्यांचे वाचन अधिकाधिक त्यांचे ज्ञान अधिक. माणसाला जगण्यासाठी अन्न जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्व मन ,मेंदूसाठी वाचनाचे आहे . म्हणूनच म्हणते *'वाचाल तर वाचाल'.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.
*📚Work from home📚* *विषय गणित* *१ शेकडा = १००* *पाव शेकडा = २५* *अर्धा शेकडा = ५०* *पाऊण शेकडा = ७५* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१ हजार =१०००* *पाव हजार =२५०* *अर्धा हजार = ५००* *पाऊण हजार = ७५०* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१ लक्ष = १,००,०००* *पाव लक्ष = २५,०००* *अर्धा लक्ष =५०,०००* *पाऊण लक्ष = ७५,०००* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *उदा. संख्याचे व्यावहारिक वाचन* *सव्वाचारशे = ४२५* *साडेचारशे = ४५०* *पावणेपाचशे = ४७५* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड. 🌻🌻🌻🌻🌻🌻 *घरीच रहा, सुरक्षित रहा.*
*📚वाचा व वहीत लिहा.✍* *उपक्रम* *🍃 समानार्थी शब्द🍃* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *घर= गृह, गेह, भवन ,आलय, सदन ,धाम निकेतन* *वंदन = नमस्कार, प्रणाम,नमन* *गाय =गो ,धेनु ,गोमाता ,नंदिनी* *वर्षा = पाऊस,पावसाळा* *पक्षी = खग ,विहंग ,विहंगम, अंडज्* *वचक = धाक, दरारा* *पृथ्वी =अवनी ,वसुंधरा ,धरणीमाता ,अवनी धरा ,मही ,धरणी* *वत्स = वासरू,बालक* *धनुष्य =चाप, कोंदड, तिरकमठा* *वारा = वायू, वात, अनिल, तरूण,पवन* 📚📚📚📚📚📚 ➖➖➖➖➖➖ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* *जि प प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *घरीच रहा, सुरक्षित रहा.*
लेख (5) निर्माण झालेली कुटुंब अवस्था आपल्या भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून एकत्र कुटुंब पद्धती नांदत आहे. परंतु ही एकत्र कुटुंब पद्धती बहुतांशी लोप पावत आहे. प्रत्येक मनुष्याला आपल्या कल्पनाविश्वात एक सुंदर कुटुंब असाव असं वाटतं. ज्यावेळी कल्पनाविश्व सत्यात उतरते त्यावेळी त्याची कुटुंबाची अवस्था हि त्याने पाहिलेल्या कल्पना विश्वातील कुटुंबासारखी कदाचित असेलही नसेलही. आजची परिस्थिती पाहता आपल्याला बहुतांशी विभक्त कुटुंब पद्धती दिसत आहे. संयुक्त कुटुंब हे फार मोजक्याच ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते. प्रत्येकाची विचारसरणी, त्यांच्या अडीअडचणी व उद्भवणार्या बऱ्या-वाईट परिस्थितीचा विचार केला असता आजकाल विभक्त कुटुंब पद्धती जास्त अवलंबिली आहे. परंतु पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत होती. या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात आनंदी आनंद वाटायचा. या एकत्र कुटुंब पद्धतीत लहान मुलं ,मोठी माणसे ,आजी आजोबा, बहिण ,भाऊ , काका काकू, आई बाबा हे सर्वजण एकत्र राहत असल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण तसेच सुखदुःखात आपली माणसे दिसत होती. प्रेम ,आपुलकी ,आणि जिव्हाळा या त्रिवेणी संगमावर कुटुंब आनंदाने वास करतो. अशावेळी आपलं कुटुंब आपलं घर आपल्याला मंदिरासारखंच वाटतं. या कुटुंब मंदिरातील माणसं देवासारखे वाटतात. मुलं फुलासारखी वाटतात. अशा या आनंददायी कुटुंबातून शांतता,समाधान आणि सुखाचा सुगंध येत असतो. म्हणूनच आम्हाला आमचं कुटुंब सुंदर असाव असं वाटतं. ज्या कुटुंबात आनंद वाटेल ते कुटुंब घराला घरपण देतात. याउलट आजची विपरीत परिस्थिती म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत 'हम दो हमारे दो' हेच पाहायला मिळते. घरात जास्त माणसांची वर्दळ या कुटुंब पद्धतीत नको वाटायला लागते. आपला छोटासा परिवार व आपण असे एवढ्यापुरतेच मर्यादित राहायला आवडते. त्यात नको आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना ना त्यांचा कुरवाळीत असलेला हात. या सर्व सुखापासून लहान मुलं फार पारखी होऊन जातात. आपल्या कुटुंबात आजी आजोबा काका काकू असावेत आपले लाड त्यांनी पुरवावेत असं लहान मुलांना फार वाटतं. परंतु हे सर्व एकत्र जमण्याचा प्रसंग या विभक्त कुटुंबात फार कमी अनुभवाला येतं. एखादा सण, उत्सव, लग्न प्रसंग अशा विविध प्रसंगी पाहायला मिळते. कुटुंबाच्या ह्या निर्माण झालेल्या दुरावस्था बदलत्या काळाप्रमाणे जरी बदल्या तरी कुठेतरी कुटुंब व कुटुंबातील नात्यांची जपणूक व्हायला हवी. आपापसात प्रेम ,जिव्हाळा, आपुलकी व नात्यातील एकोपा राहायला हवा, दिसायला हवा,असायला हवा. कारण आपली भारतीय संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीची आहे. ही आपली संस्कृती जपत जपत माणसाने जगावे आणि जगत जगत आपली संस्कृती जपावी. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.
भीमा थोर तुझे उपकार शिक्षणाने केले तू सज्ञान कर्तुत्व आहे तुझे महान असे जगलास तू जीवन सदैव जगात राहील तुझीच शान उच्च शिक्षण घेऊन तू बुद्धिमत्तेची दिशा दाखवूनी घोर अंधारातून काढलेस तू भीमा थोर केले उपकार तू पंचशीलेचा निळा झेंडा घेतलास हातात तू जनसागराला देऊनी वेढा नसानसात भीमशक्ती जागवलीस तू इतिहास नवा घडविलास भारताचे संविधान लिहूनी जातीभेदाच्या आणि विषमतेच्या मोडल्यास शृंखला सार्या समानतेचा,संघटितपणाचा पसरविलास तू वारा क्रांती केली भीमा तू थेंबभर रक्त न वाहता वाहिल्या विचारधारा समतेच्या आणि न्यायाच्या आदर्श भीमा तुझा हा साऱ्या जगापुढे आहे कितीही लिहिले तरी शब्दही अधुरे आहे भीमा तू शिल्पकार घटनेचा संविधानाने हक्क दिला जगण्याचा अन् शिक्षणाचा उध्दारकर्ता झालास तू दलितांचा समतेने पुढारला तुझा अस्पृश्य समाज भीमा तुझ्यामुळेच आहे आज माझ्या लेखनीस मान भीमा थोर तुझे उपकार भीमा थोर तुझे उपकार भीमा थोर तुझे उपकार 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प. प्रा.शाळा गोजेगाव ता. हदगाव जि. नांदेड
लेख... मोबाईल सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल ही आजच्या काळाची गरज बनली आहे. संगणक, लॅपटॉप, मोबाईल हे माहिती तंत्रज्ञानाचे संप्रेषणाचे साधन आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण मोबाईल, संगणकाद्वारेे आपणअनेक नवीन नवीन माहिती मिळू शकतो. संगणक ,मोबाईल, लॅपटॉप म्हणजे यंत्रयुगाने मानवाला दिलेला कल्पवृक्ष आहे. इंटरनेट प्रत्यक्षातील कल्पवृक्ष आहे. आजच्या जगात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मोबाईल हे वस्तू आवश्यक झालेली आहे. आपल्या मनात कोणत्या चिंता दुःख, सुख आनंदाच्या व इतर घडलेल्या घटना आपल्याला आपल्या नातेवाईकांना क्षणार्धात पोहोचण्यासाठी मोबाइल हे उत्तम साधन आहे. मोबाईल द्वारे आपण सर्व आवश्यक कामे करू शकतो तेही घर बसून. खरं तर मोबाईल ही फार आवश्यक गोष्ट आहे आणि महत्त्वाची सुद्धा आहे. जीवनाचे प्रत्येक तसेच व्यापाराचे प्रत्येक क्षेत्र मोबाईलशिवाय, संगणकाशिवाय अपूर्ण आहे. असे वाटते की आज मोबाईलचे अधिराज्य आले आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंतचा यांना मोबाईल ने वेडे लावलेले आहे. खरंतर मोबाईलचा योग्य आणि चांगलाच वापर केला पाहिजे. परंतु कोणी मोबाईलचा योग्य वापर करत नाही. मोबाईल वर असलेल्या विविध ॲप्स चा वापर प्रत्येक जण आपापल्या विचारसरणी नुसार करत असतो. मोबाईल द्वारे आपण अत्यावश्यक कामे एका क्षणात पार पाडू शकतो. व्हिडिओ कॉल करून आपण प्रत्यक्ष एकमेकांना बोलू शकतो. म्हणजे बघा मोबाईल हे किती महत्त्वाचे साधन आहे.मोबाईल या वस्तूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य एक व्यक्ती जगातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क प्रस्थापित करू शकते. ती व्यक्ती कुठेही असो . या मोबाईल मुळे आपण क्षणार्धात सहस्त्रावधी किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याशी गप्पाही करू शकतो. आपले अनुभव आपली मते इतरांना कळवू शकतो किंवा आपल्या प्रश्नांची सोडवणूक सुद्धा करून घेऊ शकतो. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोबाईलचा किती मोठा वाटा आहे. काही तोटे विचारात घेतले तर फायद्याचे पारडे जडच आहे. म्हणून तंत्रज्ञानाने मोबाईलच्या माध्यमातून मानवाने जी प्रगती घडवून आणली ती मानवी जीवनाला खरोखरच लाभदायक आहे असं मला तरी वाटतं. कारण मोबाईल ही आजच्या काळाची गरज बनली आहे. मोबाईल ही अत्यावश्यक सेवा बनलेली आहे. आज प्रत्येकाजवळ मोबाईल आपल्याला दिसतो. मोबाईलचा वापर जवळजवळ शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंतची लोक करीत आहेत. माणसाला अन्न ,वस्त्र व निवारा या गरजा बरोबरच मोबाईलची ही गरज आजच्या युगात आहे. अगदी पाळण्यातल्या बाळापासून ते वयस्क असलेल्या व्यक्तीजवळ मोबाईल आपल्याला पाहायला मिळतो. काहीजण तर पाळण्यातल्या बाळाला मोबाईल वर गाणे लावून देतात , त्याच्या हातात मोबाईल देतात व त्यानंतर तो बाळ छान झोपतो. परंतु इतक्या लहान वयात लहान बालकास मोबाईल हातात दिला तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ही विघातक सवय त्या बाळासाठी लहान वयापासून योग्य नाही. योग्य कामासाठी, चांगल्या व उपयुक्त माहितीसाठी , समज पूर्वक मोबाईलचा वापर करावा. मोबाईल ही आवश्यक सेवेसाठी वेळोवेळी चांगल्या कामासाठी वापरली जाणारी वस्तू आहे. आणि ह्या मोबाईलचा सर्वांनी उपयोग घ्यावा. चला तर मग “ विज्ञान-तंत्रज्ञानाची धरूया कासं, संगणक,मोबाईलचा वापर करूया खास.” 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जिल्हा नांदेड.
लेख... स्वच्छता हीच ईश्वर सेवा माणसाने जीवन जगत असताना जीवनाची सार्थकता जाणली पाहिजे. स्वच्छता ही आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे जाणून माणसाने वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेची जपणूक केली पाहिजे. स्वच्छता हा आरोग्यसंपन्न जीवनाचा महामंत्र आहे. माणसाने स्वतः पासून स्वच्छता सुरू करावी व मग सामाजिक स्वच्छतेकडे वळावं. दीर्घायुष्य लाभण्यासाठी स्वच्छतेचा वसा घेणे फार आवश्यक आहे. स्वच्छता म्हणजे प्रसन्नता ,स्वच्छता म्हणजे आनंद, पवित्रता ,निर्मळता, सुंदरता. 'स्वच्छता म्हणजे परमेश्वर होय. ' गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे म्हणत असलेले संत गाडगे बाबा एक महान संत होऊन गेले. स्वच्छतेचा वसा उचलून जन माणसातील अंधकार दूर करण्यासाठी संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. संत गाडगेबाबांनी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा बुरसटलेले विचार दारिद्र हे सर्व दूर करण्यासाठी प्रभावी माध्यम वापरून ते दूर करण्याचा अतोनात प्रयत्न केला आणि दिवसा गावातील रस्ते झाडून स्वच्छतेचा जणू वसा हाती घेतला. कारण आपलं जीवन अनमोल आहे. या अनमोल जीवनात आनंदाचे तरंग निर्माण करण्यातच खरा मर्म आहे. जीवनात स्वच्छता आचार विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. संत गाडगेबाबा यांनी अखंड पन्नास वर्षे लोकांच्या पायाखालील रस्ते स्वच्छ करण्यासाठी घालवली. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनातील द्वेषभाव दूर करण्यासाठी लोकांच्या मध्ये असलेलीअंधश्रद्धा दारिद्र्यता दूर करण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम वापरले. स्वातंत्र्य ,स्वालंबन, स्वाध्याय आणि स्वाभिमान ही तर स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत. आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यायची असते. निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आयुष्यात आपण आयुष्यभर स्वच्छतेचा विचार करायला हवा. आपला जीव ओतून आयुष्यभर जिवाची पर्वा न करता संत गाडगेबाबांनी जपलेला , आचारलेला स्वच्छतेचा जीवनमंञ आपल्यालाही आज आचारता येईल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनी स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झाले तर आपल्या सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य उजळायला वेळ लागणार नाही असं म्हणायला हरकत नाही. स्वच्छतेच्या ध्येयापर्यंत जायचे असेल तर घर, शाळा हे स्वच्छतेच्या संस्काराचे, सर्वात मोठे केंद्रबिंदू आहेत. त्यातून परिसरांत गावाच्या स्वच्छतेचा कृतिशील विचार रुजावा. कारण स्वच्छता ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता हा संस्कार आहे. स्वच्छतेचे बीज मुळापासून रुजायला हवे. प्रत्येकात भिनायला हवे. मोठ्यापासून ते लहानापर्यंत साऱ्यांनीच स्वच्छतेचे महत्व आंतरिकदृष्टीने समजावे. कारण, स्वच्छता ही जबरदस्ती नाही. एक जगण्याचे सूत्र आहे. म्हणूनच स्वच्छता ही ईश्वराचे दुसरे नाव आहे. या सजीव सृष्टीचे सौंदर्य खूलवायचे असेल तर स्वच्छतेचे महत्त्व समजावे. अन् अवघ्या समाजाचे पाऊल स्वच्छ क्षितिजाकडे वळावे. आणि ही सृष्टी मंगलमय, हिरवीगार, प्रदूषणमुक्त बनावी हेच आपले ध्येय.' ज्यांच्या अंगणात उमटेल स्वच्छतेचे पाऊल., नाही लागणार त्यांच्या घरी रोगराईची चाहूल' म्हणूनच सांगून गेले संत गाडगेबाबा ,'स्वच्छतेचा घेऊ वसा हाच निर्धार ठेवू जीवनाचा' ' स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे' गाडगेबाबांचा एकच मंत्र जाणूया आपण स्वच्छतेचे तंत्र. स्वच्छतेचे तंत्र जाणून आपण स्वतः आपल्या घरापासून, गावापासून, शहरापासून ते देशापर्यंत स्वच्छतेचा मंत्र ठेवून कार्य आपण करूया व, स्वच्छ निर्मळ, सुंदर भारत करुया. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता .हदगाव जी. नांदेड.
लेख..... अन्न हे पूर्णब्रह्म माणसाच्या जीवनात अन्न, वस्त्र व निवारा हे जगण्यासाठी चे मुख्य घटक आहेत. सजीवाला जिवंत राहण्यासाठी , पोट भरण्यासाठी अन्न खावे लागते. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी माणूस काम करत असतो. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी तो अनेक उद्योगधंदे करत असतो. या उद्योग धंद्यातून भरपूर पैसा कमवतो. व श्रीमंत होतो. धनसंचय केल्याने त्याच्याकडे भरपूर धनधान्य, अन्न असते. या धनधान्याच्या उपयोग तो भरपूर प्रमाणात करतो. समाजात तीन घटक आहेत श्रीमंत, मध्यम आणि गरीब. त्यापैकी श्रीमंत या पहिल्या घटकातील अवलोकन केले असता श्रीमंत माणसाचा जवळ असलेले पैसे तो अनेकदा वाजवी खर्चात उडवितो. हे पैसे उडवत असताना तो गरिबांचा विचारही करत नाही. लग्नप्रसंगी अवास्तव खर्च करतो. लग्न प्रसंगात किंवा अनेक कार्यक्रमात अन्नपदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अन्नपदार्थ पोटाला लागण्यापेक्षा नासाडीच जास्त करतो. अर्थातच काही मोजके अपवादात्मक श्रीमंत लोक याचा विचारही करत असतील .अन्नाची नासाडी होऊ नये अन्नाचा वापर व्यवस्थित व्हावा. व त्यानुसार त्यांचे योग्य नियोजन सुद्धा असू शकते.असते. समाजातील दुसरा घटक मध्यम स्वरूपाचा या मध्यम घटकातील लोकं आपले पोट भरण्यासाठी काही छोटे मोठे उद्योग धंदे करतात व छोटी-मोठी नोकरी सुद्धा करतात व आपला उदरनिर्वाह भागवतात. अन्नाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी या घटकातील लोक आवर्जून घेतात. पोटाला लागेल तेवढेच अन्न खावे, पात्रात उष्टे अन्न टाकणार नाही , पडणार नाही हे सुद्धा काळजी घेतात. लग्न प्रसंगात व इतरही कार्यक्रमात आवाका पाहूनच खर्च करतात. अन्नपदार्थाची नासाडी होऊ नये तसेच सर्वांना पोटभर जेवण मिळेल याची काळजी घेतात. अतिशय भयानक परिस्थिती असलेला गरीब वर्ग.आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वन वन भटकतो. मोलमजुरी करून एक वेळच अन्न तरी मिळेल की नाही ही शाश्वती त्यांना नसते. हातावरचे पोट असणाऱ्यांची व्यथा फार भयानक असते. पुरेसे अन्न जेवायला मिळेल की नाही आपल्या मुलाबाळांना पोटभर अन्न देऊ शकतील की नाही ही अवघड बाब त्यांच्यासाठी असते. अन्न पोटाला पोटभर नाही मिळाले तर जगायचं कसं? हा प्रश्नही त्यांच्यासमोर असतो आणि भुकेने व्याकूळ होऊन मरण्याची वेळ त्यांच्यावर येते. दिवसभर काबाडकष्ट करून मिळवलेल्या पैशात आपली रोजीरोटी, उदरनिर्वाह ते चालवतात. पोटाला अन्न मिळावे म्हणून उन्हातानात, थंडीवाऱ्यात, पावसात आपल्या जिवाची पर्वा न करता काम करतात. भाकरीच्या चंद्राचा शोध घेतात, जेवणाची सोय करतात. आपल्या पोटाची खळगी अन्नाने भरतात आणि आपले जीवन कसेबसे जगतात. अशाप्रकारे अन्न हे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजते. अन्नापेक्षा मोठं कोणीच नाही.म्हणून कोणी किती जरी मोठा असेल आणि कितीही लहान असेल तरीही त्याला आपली पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न खावेच लागते. म्हणून माणसाने अन्नाचा दुरुपयोग करू नये. अन्नाची नासाडी करू नये. जेवढे लागेल तेवढेच अन्न आपल्या पात्रात घ्यावे व आपले पोट भरावे. परमेश्वराने नेिसर्गात सूर्य,चंद्र वारा व चोवीस तासाची वेळ ही सर्वांना सारखीच दिली आहे. या निसर्गनियमाप्रमाणे माणसाने आपले जीवन जगावे. वेळोवेळी इतरांना मदत करावी. कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. व ज्यांना जसे जमेल तसे इतरांना मदतीचा हात द्यावा. अन्नदान करावे. व जे उपाशीपोटी आहे त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घासातला घास देण्याचा प्रयत्न करावा. याच अर्थ आपल्याजवळ जेवढे आहे त्यापैकी थोडेफार देऊन इतरांची पोट भरावे. आज निर्माण झालेल्या कोरोना या आजाराच्या वैश्विक संकटाचा विचार केला असता आजची परिस्थिती गरिबांसाठी हलाखीची निर्माण झालेली आहे. आजच्या निर्माण झालेल्या या संकटकाळात आपण सर्वांनी मिळून गरजूंपर्यंत गरज कशी पोहोचेल हा प्रयत्न करूया, भुकेल्यांना अन्न कसे मिळेल हा प्रयत्न केलेला अतिउत्तम राहील. हे उद्भवलेले कोरोना संकट मोठे आहे. परंतु या संकटाचापेक्षाही माणूस मोठा आहे. आणि या माणसाला वाचवण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे सर्वतोपरी मदत करायला हवी. कारण माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची फार गरज असते. म्हणूनच म्हटले आहे ' अन्न हे पूर्णपरब्रम्ह आहे.' 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.
लेख..... गुरुची महती, गुरु महिमा मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. आज आपण अन्न, वस्त्र, निवारा यावर जगत असलो तरी, शिक्षण आपल्या जीवनाचा प्राणवायू आहे. ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ म्हणजे शिक्षण होय. हे मानवी जीवन सुरक्षित व संस्कारशील बनवण्याचे काम गुरु करतात. गुरु म्हणजे माणसाच्या रूपात एक परमात्माच आहे. हा गुरुरूपी परमात्मा शिक्षणातून संस्कार घडविण्याची कार्य करतो. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, जिथे ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे, आणि जिथे आत्मदर्शन आहे तिथेे सुख, समाधान आणि शांती नक्कीच आहे. जो आपल्याला ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो आणि ज्ञानाशी एकरूप करून टाकतो त्यास आपण गुरु म्हणतो. जो सर्व भूतकाळ दाखवतो वर्तमान काळाची ओळख करून देतो भविष्यकाळाची दिशा सांगतो तो म्हणजे गुरु. गुरु म्हणजे ज्ञानाचा आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढे मोठे असेल त्या मानाने आपल्याला गुरूकडून ज्ञान घेता येते. गुरुहा बुद्धीने पाहिले तर माणसासारखा दिसते आणि हृदयाने पाहिले तर आपल्याला परमात्मा सारखा अनुभवते. शिक्षणातून संस्काराची गंगा आसेतु हिमालयापर्यंत पोहोचवायचे कार्य गुरु करतो. या जगात मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी मानला जातो. काही माणसे चांगले असतात तर काही वाईट असतात. चांगला आणि वाईट ठरवण्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज असते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे , आणि या शिक्षणाच्या माध्यमातून चांगला संस्कार आणि शिक्षण यांची सांगड घालून देतो ते गुरु. माणसाच्या जीवनात प्रत्येकाला गुरु असणे आवश्यक असते. खरा गुरू स्वतः च सारं ज्ञान शिष्याला देत असतो. शिष्यापासून गुरु काही लपवून ठेवत नाही. गुरु तोच असतो जे आपल्या पुढे जाणाऱ्या शिष्याचे सदाही कौतुकच करत असतो. गुरूचा आनंद आपल्या शिष्याकडून पराजय होण्यातच असतो. खरा गुरू तोच जो आपल्या शिष्याच्या विजयातच आपला विजय मानत असतो. गुरु आणि शिष्य यांचे अतूट नाते असते. गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ असते. तर शिष्य म्हणजे ते ज्ञान ग्रहण करण्याचा उपासक असते. खरे बोलावे, नीतीने वागावे, राष्ट्रावर प्रेम करावे, आपापसात माया, ममता करावी हे सर्व गुरू आपल्याला शिकवते. आपली पहिली गुरु आपली आईच असते. त्यानंतर आपण शाळेत गेल्यावर शिक्षक म्हणजेच गुरु यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतो. ज्यांच्या ज्यांच्या कडून आपणास काहीतरी शिकावयास मिळते ते सर्व आपले गुरु आहेत. शाळेतून घेतले जाणारे शिक्षण आपल्याला गुरूकडून प्राप्त होते. शिक्षणाचे ध्येय शिक्षणाचा उदात्त हेतू चांगला माणूस निर्माण करणे हेच असते. मानवी मनावर संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे विद्येचे दळण नव्हे, तर मनाला लावायचे ते एक वळण आहे. आणि हे वळण लावण्याचे काम गुरु करतात. माणसाला माणूसपण प्राप्त होण्यासाठी, योग्य गती , योग्य मती आणि त्यातून प्रगती साधण्यासाठी शिक्षणातून सुसंस्कार करण्याचे कार्य गुरु करतात. चांगला माणूस ज्ञानाने सुधारतो. आणि ही ज्ञानप्राप्ती करून समाजात चांगली . समाजबांधणी निर्माण करतो. गुरूचा महिमा अपार आहे. हा गुरु महिमा माझ्या स्वकाव्य निर्मितीतून मी खालील ओळीतून मांडलेला आहे. " चिखल मातीच्या गोळ्यास आकार तू देतोस ज्ञानदीपाची ज्योत पेटवून अंधकार दूर सारतोस शतशः नमन मी करिते गुरुवंदन करुनी आशीर्वाद मी घेते आयुष्यभर ऋणी राहूनी वंदन मी नित्यनेमाने करिते. गुरुवर्य आहे ज्ञानाचा भांडार अज्ञानाचा नाश करून होतील संहार घडवतील मनुष्यजीवना अपूर्ण जीवन आपले.... कर्तव्याचे बीजांकुरण करुनी पेटतील समाजमनाच्या उदरी ज्ञानार्जनाची शिदोरी वाटुनी वसतील शिष्यांच्या मनमंदिरी" गुरुमहिमा हा अपार असतो. गुरुहा आपल्याला सत्यसृष्टीत घेऊन जातो. आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो. आपल्या जगण्याच्या दाही दिशा उजळून टाकतो. आपले जीवन सुंदर करतो. जीवनात कसं वागावं कसं राहावं कसं बोलावं कसं चालावं हे सर्व ज्ञान गुरूकडून मिळतं. अशा या अनंत ज्ञानाच्या तळमळीस मी वंदन करून शतशः नमन करते. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड.
लेख..... जन्म आणि मृत्यू आत्मा आणि शरीराच्या संयुगाचे नाव 'जन्म'असून त्याच्या वियोगाला 'मृत्यू' असे म्हणतात.खरंतर माणूस जन्माला आला तेव्हाच मृत्यूही घेऊन येतो. माणसाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत तो कसा वागतो, जगतो त्यावरून त्याला मोक्ष प्राप्ती होते. परंतु मनुष्य कसा मरतो हे महत्त्वाचे नाही; पण तो आपले जीवन कसे जगतो हे महत्वाचे आहे. मनुष्याच्या स्वतःच्या सत्कर्म पुण्यधिक्याच्या बळावर त्याला मुक्ती प्राप्त होते. आपला जन्म म्हणजे कर्तव्याने भरलेला घडा आहे. माणूस स्वतःच्या जीवनात आपली कर्तव्य जितकी प्रामाणिक व योग्य प्रकारे पार पाडतो तितका तो आपल्या जन्माचे सार्थक करतो. कारण माणसाचं आयुष्य हे चैन नसून एक कर्तव्य आहे. व हे कर्तव्य तो जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे पार पाडतो. माणूस जीवन जगत असताना त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात. ही जीवनात येणारी संकटे म्हणजे ते शाप नव्हेत तर त्याच्या जीवनात प्रथमता उद्भवणारी अडथळे होय. ही जीवनात उद्भवणारी संकटे म्हणजे त्याच्या उज्ज्वल भवितव्याची निदर्शक आहेत. माणसाचा जन्म,जीवन म्हणजे संग्राम आहे , यज्ञ आहे , सागर आहे.जखमांशिवाय संग्राम असत नाही.ज्वाळांशिवाय यज्ञ होत नाही . लाटांशिवाय सागर असत नाही. हे सर्वकाही हसतमुखानेच स्वीकारायला हवे.कारण जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. माणूस जन्माला येतो व या जन्माला आलेल्या माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल. ' आला आणि गेला .' काही माणसं मरत - मरत जगत असतात तर काही माणसं जगत - जगत मरत असतात.जन्मकाळाप्रमाणे मरणकाळ हा देखील एक आनंदसोहळा आहे. कारण शरीर पिंजऱ्यातून आत्म्याचा पक्षी मुक्त होऊन अनंतात विलीन होतो. हे सार जग नियतीच्या अंगा - खांद्यावर खेळत असतं. नियती कधी हसते , कधी रडते. माणसाचं जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय.माणसाचं मरण म्हणजे नियतीचं रुदन होय. ' जीवन सरे मरण उरे ' हे सूत्र जगताना ध्यानात ठेवावं लागतं. 〰〰〰〰〰〰〰〰 लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव, जि. नांदेड.
लेख...... कर्माची पुण्याई, पापाचे फलित माणसाने दुसऱ्या बद्दल चांगला विचार करणे हे पुण्याचे काम आहे. व दुसऱ्या बद्दल वाईट विचार करणे म्हणजेच पापाचे भागीदार होय. इतरांच्या कल्याणात पुण्यकर्म असतं, व इतरांना दुःख देण्यात पापकर्म ठरतं. आपण स्वतः ठरवायचे आपण कसे वागायचे ते आणि आपल्या पदरात पुण्य पाडायचे का पाप पाडायचे ? हे ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न आहे. माणसाने सर्वांशी चांगले वागावे व आपल्या प्रमाणे योग्य प्रकारे वागावे. इतरांचे सुखदुःख हानि लाभ हे आपलेच आहे असे समजून वागणे श्रेष्ठ प्रकारचे असून पुण्य मिळवणे होय, याउलटचे वागणे जे आहे हे वर्तन वाईट आहे असे समजून पापकर्म होय. ज्या कर्मात आपण हृदय ओततो ते कर्म श्रेष्ठ होय. दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेले कर्म हे पुण्यकर्म समजाव. अशी कर्मफुल घेऊनच आपण समाजाच्या सेवेसाठी कार्यरत असाव. आणि ही सेवामय कर्मफुलांची उधळण जिवंत आहे तो पर्यंत करत राहावी. आणि पुण्याचे वाटेकरी व्हावे. ' कर्मे करावी चांगु' हा संत ज्ञानोबांचा विचार आपले जीवन जगत असताना सदैव ध्यानीमनी असावा. आपल्या हातून घडणारी कामेच चांगली आहे की वाईट आहेत हे पाहूनच विचार करून वर्तन करावे. ज्या चांगल्या कर्माने जगावर चांगले पडसाद उमटतात ते कर्म करणे म्हणजे पुण्य होय. आणि हानिकारक कर्म करणे म्हणजे पाप होय. जे कर्म केल्याने आपला आत्मा प्रसन्न राहतो म्हणजेच आपल्यामध्ये भीती, शंका ,लज्जा निर्माण होत नाही अशी कर्म म्हणजे पुण्य होय. जे आपल्या हृदयात सतत सलत राहते आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते शंका निर्माण होतात लाज वाटते अशा गोष्टी म्हणजे पाप करणे होय. हे पाप जरी प्रथमतः प्रातःकाला सारखे लखलखणारे चमकत असले तरी त्याचा शेवट मात्र रजनीसारखा काळोखरुपी असतो. पाप हे असे विघ्न आहे की ज्याने आपले साहस, धैर्य आपला मान ,सन्मान अगदी क्षणार्धातच नष्ट करते. आपल्या वाईट कर्माचा परिणाम वाईटच असतो. आणि चांगल्या कर्माचा परिणाम चांगलाच असतो. इतरांना सहकार्य करणे म्हणजे चांगले कर्म, व इतरांना मदत न करणे म्हणजे वाईट कर्म. एखादी म्हातारी व्यक्ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली तर त्या व्यक्तीला हाताला धरून उठवून त्या व्यक्तीचीे मदत करणे म्हणजे पुण्यकर्म होय, उलट पडलेल्यांना तुडवत जाणे म्हणजे पाप कर्म होय. सत्याच्या बाजूने उभे राहून न्यायाची भूमिका मांडणे म्हणजे पुण्य होय, आणि अन्यायाशी तडजोड करणे म्हणजे पाप होय. 'पापाचा घडा भरला की तो फुटल्याशिवाय राहत नाही' असं म्हणतात म्हणूनच आपणच आपल्या पाप-पुण्याचे भागीदार असतो. आणि या आपल्या हातून घडून येणाऱ्या चांगल्या पुण्यरुपी कर्माला सेवेची किनार लाभली असेल तर पुणे कर्म चिरंजीव ठरतात. आणि अशा कर्मातच माणसाला अमरत्व प्राप्त होते. अशा या पुण्य कर्माच्या घड्याने आपले जीवन सार्थक होते. आणि पाप रुपी कर्माने आपले जीवन निरर्थक ठरते. आणि हे निरर्थक जीवनात आलेले पाप आपल्याला शांत राहू देत नाही समाधानी आयुष्य जगू देत नाही.आपल्याला सदैव दुःख वाटते. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचे मूळ कापले तर ते वृक्ष नष्ट होते, त्याचप्रमाणे पापाचा त्याग केल्याने दुःख नष्ट होते. आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक जीव कर्म करण्यात स्वतंत्र आहे. जेव्हा तो पाप करतो तेव्हा तो ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये पराधीन असल्यामुळे आपल्या पापाची फळे भोगतो. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचे पाप अथवा पुण्याचे फळ भोगावे लागते. आपल्या जीवनातील दुःख नष्ट करायचे असेल तर आपल्याला पुण्यकर्म घडून येईल असेच वर्तन करावे लागेल. आपले हे जीवन सार्थकी लावायचे असेल तर आपल्या हातून पुण्यकर्म घडायला हवे. या जगण्यावर ज्यांना अभिमान वाटतो या जगण्यावर ज्यांच प्रेम असेल त्यांनी आपल्या हातांच्या या कर्माच्या सामर्थ्यावर ही पुण्य कर्माची फुलं भरभरून वहावीत. व आपले जीवन चांगल्या पुण्य कर्माने अमरत्व ठेवावे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका..... श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हादगाव जिल्हा नांदेड.
लेख...... आनंद ,प्रसन्नता ,सुख माणसाने आनंदी वृत्ती ठेवून जगणे अतिशय महत्वाचे आहे. आनंदी वृत्ती ,समाधान ,सुख, शांती, प्रसन्नता ही फार मोठी आपली सौंदर्यवर्धक साधने आहेत. आपली आनंदी वृत्ती असणे म्हणजे आपल्यातील उत्साह व्दिगूणीत करणे होय. ही 'आनंदी वृत्ती आपल्या आरोग्याचा आधार आहे, तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे' असे हेली बर्टन या विचारवंताने म्हटले आहे.आपल्या जीवनात उदासिनता ठेवायची नसेल तर आपण आनंदी, प्रसन्न राहायला हवे. आपल्या सुखाचे माहेरघर म्हणजे आनंदी वृत्ती होय. प्रसन्नता हे परमेश्वराने आपल्याला दिलेले औषध आहे आणि हे औषध आपण जर घेतले तर आपले जीवन सुखी समाधानी होईल. निसर्गात, सृष्टीत जिथे आपली नजर टाकू तिथे आपल्याला प्रसन्नता दिसेल. परंतु यासाठी आपल्याला स्वतःला प्रथमता प्रसन्न राहावे लागेल आणि इतरांना प्रसन्न ठेवावे लागेल. कारण खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. आपल जीवन यशस्वी करायचं असेल तर आपल्याला आपले मन प्रसन्न, आनंदी असले पाहिजे. माणसाच्या मुखावर झळकणार निर्मळ हास्य माणसाचं मन जिंकून जातं, आणि ह्या अशा आनंदी व्यक्तीच्या आठवणी माणसाच्या मनात रेंगाळतात. स्वकष्टातून खरा आनंद निर्माण होतो. आणि मनुष्याचं जीवन सुखी करतो. मनुष्याने सदैव कामात व्यस्त राहिले पाहिजे. मनन ,चिंतन करीत राहिले पाहिजे.कारण जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते. प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत. म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '. 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.
लेख..... वेळ, काळ ,समय परमेश्वर एकावेळी एक क्षण देतो तर दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो. म्हणजेच वेळ ही कधी कुणासाठी थांबत नसते. वेळ ही आपले कार्य निमुटपणे पार पाडत असते. 'वेळ कुठलीच शुभ नसते किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो असे दादा धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.' आणि खरच ते योग्य पण आहे. म्हणून माणसाने वेळीच जागे होऊन आपल्याला सोपवलेले काम योग्य करणे होय. कारण वेळ गमावणे म्हणजे शक्ती गमावणे होय. म्हणून वेळेचा सदुपयोग करून घेऊन आलेल्या संधीचे सोने करणे. कारण जेव्हा एखादी संधी आपल्याला येते ही वेळ पुन्हा येईलच असं काही नाही. कारण वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. आपल्या हातून होणारे योग्य काम, कर्म हे आपण वेळेवरच पार पाडायला हवे. या साऱ्या जगाला व्यापून राहिलेला काळ हा कधी संपतच नाही. अनेकदा असं वाटतं की आज उद्यासाठी जगावं! पण काळाचा दगड डोक्यावर कोसळला की उद्याचा दिवस पाहायला मिळत नाही! कारण हा कठोर काळ म्हणजे साक्षात मृत्यू होय. आपण आपल्या जीवनाचं सुरेल गाणं गात असतो तेव्हा काळ आपल्या जीवन सतारीच्या तारा केव्हा तोडतो ते समजत नाही. कालच्या आठवणी मनात ठेवून उद्याच स्वागत करावं पण काळ उद्याच दर्शन घडू देईल की नाही सांगता येत नाही. " बळें लागला काळ हा पाठीलागी जीवा कर्मयोगें जनी जन्म माझा झाला परी शेवटी काळ मुखी निमाला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे घडीने घडी काळ आयुष्य नेतो" ----- समर्थ माणसाचा जन्म झाला तेव्हा त्याचा मृत्यू अटळ झालेला असतो. जन्म आणि मृत्यू या दोन मधल्या अंतरातील वेळ म्हणजे आपल्या हातून घडून येणारी कर्म. आपण केलेले कर्मच आपल्याला मृत्यूनंतरही अनंत काळ जिवंत ठेवत असतात. या जगात किती आले किती गेले तरी आयुष्यातील वेळ कधी कुणासाठी थांबली नाही आणि थांबणारही नाही. म्हणून वेळीच जागे होऊन वेळेचा सदउपयोग घेणे योग्य होय.कारण क्षणक्षणाने आयुष्य संपत आहे......!!! 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( दि.05-05-2020) लेख..... मैत्री , मित्रता 'मैत्री म्हणजे ईश्वराने मनुष्याला दिलेले बक्षीस आहे'. ईश्वराने आपल्याला मैत्री स्वरूपात जे बक्षीस दिले त्याची जोपासना आपण निस्वार्थपणे करायला पाहिजे. कारण मैत्री जेव्हा निर्हेतुक असते तेव्हा ती दीर्घकाळ टिकते. मैत्रीत जर का स्वार्थ आला तर ती मैत्री संपण्याच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणून आपली मैत्री ही दीर्घकाळ टिकवायचे असेल तर आपल्यामध्ये निस्वार्थी भावना असणे आवश्यक आहे. असं म्हणतात ' या जगी सन्मित्ञाहून श्रेष्ठ संपत्ती नाही'. आपल्या मनामधील सर्वकाही सांगण्याची एकच जागा आहे ती म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्या सुखदुःखात आणि आपल्या डोक्यावर कोसळलेल्या संकटातून मुक्त होण्यासाठी आपण घेतलेला आधार म्हणजे आपला मित्र ,मैत्रीण होय.' मैत्री म्हणजे सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार होय' असे स्पॅनिश या विचारवंताचे मत आहे. जेव्हा काही आपल्याजवळ सांगण्यासारख असतं तेव्हा आपण ते मित्रास, मैत्रीणीस सांगतो कारण दुःख वाटून घेतले की हलकं होतं आणि सुख वाटून घेतलं तर ते वाढत. आपल्या या जीवनात मैत्रीसारखी आनंद व उत्साह देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आपल्या हृदयात अपार सेवा असली म्हणजे आपल्याला सर्वत्र मित्रच दिसतात. मैत्रीच्या या रोपट्याला नेहमी मायेचे,प्रेमरूपी पाण्याचे सिंचन देणे आवश्यक असते. आपला खरा मित्र ,मैत्रीण तोच किंवा तीचअसतो जे तोंडावर कटू बोलले तरी परंतु माघारी आपली स्तुती करतात,आपल्याबद्दल चांगले विचार प्रकट करतात. माणसाने मैत्रीवर नेहमी विश्वास दाखवावा, कारण विश्वास नसलेली मैत्री कधीही खुंटते. आपल्यामध्ये असलेली जी मैत्री आहे या मैत्रीला शञूरूप प्राप्त होणार नाही याची काळजी सदैव घ्यायला हवी. तेव्हा पेटलेल्या हृदयात शत्रुत्व निर्माण होता कामा नये. कारण अरण्य जाळणाऱ्या वणव्याचा वायु मित्र होतो, परंतु तोच वारा दिवा विझवून टाकतो म्हणजेच दिव्याचा शत्रू होतो. यासाठी आपला मित्र शत्रू होणार नाही याची सतत खबरदारी घेतली पाहिजे. कारण शञूत्व हा मैत्रीचा अंत असतो. मोराला पंख पसरून आनंदाने मोर पिसारा फुलवून नाचण्यासाठी जशी पावसाची गरज असते तशीच आपलं जीवन आनंदाने घालवण्यासाठी आपल्याला मित्राची मैत्रीणीची गरज असते. जेव्हा आपल्या बेचैन, ञस्त, अस्वस्थ , अशांत मनात विचारांचे काहूर निर्माण झालेले असते तेव्हा आपल्याला शांती, स्वास्थ्य देण्याचे काम आपले मित्रच, मैत्रीणच करत असतात. आपल्या जीवनात आनंदाची उधळण करीत असतात. म्हणून मैत्रीचा टिपून ठेवणारा हा टिपकागद आपण सदैव टिकवून ठेवला पाहिजे. ईश्वराने मनुष्याला दिलेल्या मैत्रीच्या या बक्षीस ला आपण सर्वांनी सदैव जपले पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे लेख...... राग , क्रोधाग्नी असं म्हणतात 'क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे.' माणसाला दुर्बल करण्यासाठी राग ही एकमेव गोष्ट कारणीभूत आहे.या क्रोधाचा अग्नी प्रज्वलित झाला की माणूस दुर्बल होतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा या रागामुळे होणारे दुषपरिणाम काय होतील याचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. कारण आपल्यामध्ये निर्माण झालेली क्रोधाग्नी ही आपण आपल्या न पटणाऱ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा शत्रूच्या साठी प्रज्वलित करतो. आणि हे निर्माण झालेली क्रोधाग्नी ही ज्याच्यासाठी निर्माण केली त्याच्यापेक्षा जास्त आपल्यालाच जाळून भस्म करते. म्हणून आपल्याला स्वतः राग आला तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. या पृथ्वीतलावर, निसर्गामध्ये राग ही अशी एकमेव गोष्ट आहे जे माणसाला पशू बनवते, विकृत करते. म्हणून आपण क्रोध निर्माण झाला तर त्याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही कारणाने आपल्यामधील क्रोध उत्पन्न झाला तर त्याचा परिणाम अतिशय दुःखदायक, वेदनादायक व कठीण असतो. क्रोध हा एक प्रकारचा ज्वाला आहे. तो निर्माण झाला की आपल्यातील चांगले गुण किंवा आपल्यामध्ये असलेला विवेक नष्ट व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा आपल्यामधील क्रोध निर्माण होतो तेव्हा आपली बुद्धी चालत नाही. आपण काय करत आहोत याचे भान आपल्याला स्वतःला राहत नाही. म्हणून आपण आपल्या रागाला कितपत आवर घालायचं हे आपल्याच आटोक्यातील बाब आहे. या क्रोधाचा अग्नी आपल्यामध्ये जेव्हा संचारतो तेव्हा आपण स्वतःवर अतिशय संयम ठेवायला हवा. शांत राहायला हवं. संयम आणि शांतता ठेवली तर आपल्या रागावर आळा बसेल. नियंत्रण राहील. नाहीतर म्हणतात ना 'अती राग आणि भिक माग, हे ही खरेच आहे. म्हणून शांतता आणि संयम ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. या गुरुकिल्ली ने आपल्या अविवेकी पणावर कुलूप बसेल. मानवी जीवनात सुख आणि समृद्धी निर्माण करायची असेल तर संयमाची आणि शांततेची नितांत आवश्यकता असते. कारण आपल्याला सुखी संपन्न आयुष्य जगायचं असेल तर संयम बाळगणे आवश्यक असते. नाहीतर आपल्यामधील क्रोध निर्माण झाला तर त्याचा दुष्परिणाम अतिशय वाईट होईल. आणि मग माणसाला पश्चाताप होते. हा पश्चाताप होऊ द्यायचा नसेल तर आपल्या मूर्खतेतेतून निर्माण झालेल्या या क्रोधाला संयमाचा आणि शांततेचा लगाम घालायला हवा. तेव्हाच आपल्याला सुखी आणि संपन्न जीवनाकडे जाता येतं. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे लेख..... आईची महती आई ! आई हा शब्द ऐकला की प्रत्येकाला आठवते ती आपली जन्मदात्री आई ! काळजाला भिडणारा शब्द म्हणजे आई! आईची महती एवढी मोठी असते की कितीही सांगा ती अधुरीच! " आईची ही माया, शब्दात होणे नाही आईची ही ममता, शाईही पुरणार नाही आईची ही महती,काव्याला पेलणार नाही आईचा हा जिव्हाळा, लेखणीला झेपणार नाही" आई हा शब्द फक्त दोन अक्षरांचा नाही. या दोन अक्षरात ईश्वराच्या आत्मा सामावलेला आहे. ,आ, म्हणजे 'आत्मा' आणि ' ई' म्हणजे 'ईश्वर' ईश्वर प्रत्येकाच्या घरात आईचा रुपाने वास करत असतो. सर्वजण आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. देवसुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. कारण आईच्या कुशीत माया, ममता ,लळा ,जिव्हाळा आणि प्रेम यांचा खजिना असतो, म्हणूनच आईला वात्सल्याचा महासागर म्हटले जाते.आईचं बाळ कितीही मोठ झाल तरी तिला तो लहानच असतं. म्हणून दूर कामासाठी , नोकरीसाठी गेलेला मुलगा घरी परत आला की आई त्याच्या तोंडावरुन हात फिरवते.त्याला कुरवाळते. आणि आईच्या पाया पडण्यासाठी मुलाने माथा टेकला की आईचा ऊर भरून येते. व ती भरभरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. 'सदा सुखी राहा !'बाळ असं म्हणते. केवढी ती माया केवढे ते अफाट प्रेम. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र टाळी, आणी वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई म्हणजे त्याग मुर्ती स्वतः उपाशी राहून आपल्या पिलास घास भरवते ती आई. खरंच ज्यांना आई असते ते किती नशिबवान असतात. एका कवीने म्हटले आहे ' स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' म्हणूनच जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जीवनात रस आहे. कारण आईशिवाय मुलं म्हणजे उदास, भकास,भयानक आणि कुरूप जीवन. आईचा विरहाच वर्णन करताना कवी गोसावी म्हणतात "आई तु गेली अन् घरी रिकाम झालं गावातल्या एखाद्या उद्ध्वस्त वाड्या सारखं, आई तू होतीस तेव्हा घर भरून वाहत होतं खळखळणाऱ्या नदीसारख! " आयुष्यभर आपली काळजी घेणारी आपली आई ही एक त्यागाची मूर्ती आहे. तिचं वर्णन कितीही केलं तरी थोडंच आहे.लेखणीत सामावणार नाही. आई खरंच महान आहे. माझासाठी वंदनीय, पुजनीय आहे. आईची महती सांगताना मला घेले या कवीचा कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा म्हणावयास वाटते. "काय सांगू आई, तुला तुझी ग महती, तुझ्यासारखी नाही , कुणीच या जगती रामकृष्ण आले गेले , मीही पामर जाईल तुझ्या महतीचा डंका , सार्या जगात गाईल." पुन्हा एकदा मी माझ्या आईला भावपूर्ण वंदन अभिवादन करते व तिचा असाच आशीर्वाद मिळावा हीच इच्छा बाळगते. शेवटी एकच सांगाव असं वाटते की आपली काळजी घेणाऱ्या आईची आपण म्हातारपणी तिला जपल पाहिजे तिची काळजी घ्यावी. आपण सर्वांनी आप आपल्या आई-वडिलांची सेवा करावी. कारण ज्या मुलाच्या मागे आई-वडिलांचा आशीर्वाद असतो त्यांची संकटे आपोआप दूर होतात. म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी आईवडिलांची सेवा करावी. हीच ईश्वर सेवा आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे लेख..... सत्य, सत्यनिष्ठता सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण नेहमी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणान वागाव. आपण स्वतः प्रामाणिक आणि खरेपणाने वागलो तर या भूतलावरील एक अप्रामाणिक आणि खोटारडा माणूस कमी झाला असं म्हणावं. परंतु काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी खरे लपविण्यासाठी 'माझं तेच खरं' असं म्हणतात. पण ' खरं तेच माझं' अस म्हणणारी माणसं या जगी अल्पच आहेत. एका विचारवंताने म्हटले आहे 'कोण खरे ती गोष्ट महत्वाची नाही; परंतु खरे काय आहे ते महत्त्वाचे आहे.' 'कोण खरं बोलत कोण खोटं बोलतंय' हे महत्वाचं नाही. परंतु खरे काय हे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाची खरी गुणसंपदा ही आपल्या खरेपणात, प्रामाणिकपणात, वास्तविकतेत दडलेली आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सत्याचा वापर करून आपले दैनंदिन जीवन तेजोमय, प्रसन्न, टवटवीत, हर्षउल्हासित करू इतके आपण सुखी होऊ. यशस्वी होऊ.आपण जितके सत्यवादी असू वास्तविक असू प्रामाणिक असू तितके समाजप्रिय असू. कारण समाज हा सत्याचा आदर करतो, प्रामाणिकपणाची कदर करतो. हे शाश्वत खरे आहे. म्हणून आपल्याला आपल्या गुणांची जाणीव जरी नसली तरी दोष मात्र आपले आपल्याला माहित असावेत. कारण माणसाला सत्य शिकवावे लागत नाही, मानवजातीला सत्य शिकवण्याची आवश्यकता नाही; त्याच्या खरेपणाची अनुभूती त्याला स्वतःला होत असते. म्हणून त्याने आपला स्वार्थ पणा सोडून निस्वार्थीपणे जीवन जगावं व आपला आदर्श प्रत्यक्षात कृतीद्वारा, आपल्या हातून घडणाऱ्या कर्मातून ,वाणीतुन इतरांना दाखवावा. सत्य हे आपल्या यशाचे मूळ आहे. सत्यनिष्ठेसाठी आपल्याला निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच आपले अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". माणसाच्या अंगी नम्रता असेल तर तो सर्वांच्या ह्दयात राहतो. अशा नम्र व्यक्तीसच सत्य सापडते कारण अस म्हणतात 'पूर्ण नम्रता अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.' जीवनात खरे यश मिळवण्यासाठी सत्य आणि प्रामाणिकपणा अंगी असणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. 〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड लेख.... श्रमाचे महत्व “ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे " कोणतीही गोष्ट आपण स्वतः आधी केली पाहिजे आपल्या अनेक प्रयत्नात आपला देव असतो आपले यश असते.हेच भाव आपण आपल्या अंतर्मनात ठेवावा अंतरीचा देव तेथेच जाणावा. ' प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे' आपण मनापासून प्रयत्न केले असता सर्व साध्य आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला श्रम करणे गरजेचे आहे. प्रयत्नाने आपल्या श्रमाचे सार्थक होते. कोणतीही गोष्ट करण्यासाठी श्रम हे करावेच लागते. 'दे गा हरी पलंगावरी असे कधीच घडत नाही'. आपण करीत असलेल्या श्रमात तल्लीनता असावी, त्यामध्ये एकरूप होता येईल अशी एकाग्रता असावी. श्रमाच्या पाठीमागे असलेल्या प्रेममय विचार केला असता जिथे प्रेममय श्रमान जीवन नटलेल असतं तिथं आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण होत असतात. आपलं जीवन हे जगण्यासाठी असतं. प्रेममय असतं. सुखमय असतं. श्रमाच्या माध्यमातून जीवनावर प्रेम करणं म्हणजेच जगण्याच्या गूढ अर्थाचा परिचय करून घेणे होय. आपण जेव्हा प्रेमान श्रम करतो तेव्हा आपल्या स्वतःशी आपण बांधील असतो. परंतु ' श्रमिक जीवन हे आरोग्यपूर्ण जीवन आहे'. ही कल्पना आज आपण हळूहळू विसरत चाललो आहे.' मानवाने शारीरिक श्रम हे करायलाच पाहिजे. श्रमातून सुख समृद्धी व समाधान लाभते. मानसिक श्रमातून क्रांती घडून येते. श्रमाने मानवाच्या जीवनात आनंदाची निर्मिती होते. श्रमाने मिळवलेल्या भाकरीची चव ही अमृतापेक्षा ही मधुर असते. कष्टाच्या भाकरीची गोडी न्यारीच असते. म्हणून श्रमाचे महात्म्य अतिशय पूजनीय आहे. ही सारी सृष्टी श्रमाच्या चैतन्याने भारावलेली आहे. प्रेमाचा मूर्त स्वरूप म्हणजे श्रम होय. प्रेमानं श्रम करणे म्हणजे जीव ओतून काहीतरी नवनिर्मितीचे काम करण होय. आणि हे नवनिर्मितीचे काम करायचे असेल तर आपल्याला श्रमाची सतार ही वाजवीच लागेल. सतारीच्या या स्वरातून श्रमाच्या माध्यमातून सारा आसमंत फुलवावा लागेल. श्रमाच्या या माध्यमातूनच आपण आपल्या जीवनाचा गुढ असा परिचय करून घेतला असाच अर्थ सार्थ होईल.
नशीब मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे असं म्हणतात. आपल्या नशिबाला योग्य आकार देणे हे कार्य मानवाच्या शक्ती बाहेरचे नाही. जर मनुष्याने ठरवले तर तो करू शकतो. जर नाही ठरवले तर तो निष्क्रिय राहू शकतो, अथवा काहीच करू शकत नाही. मानवाला स्वतःचे भाग्य स्वतः उज्वल करायचे असेल तर त्याने आपल्या चारित्र्याचा, वर्तनाचा आपल्या हातून घडून येत असलेल्या कार्याचा आधार घ्यावा, नशिबाचा नवे. असं म्हणतात माणसाच्या मनगटातील ताकद संपली की तो नशिबाला दोष देत बसतो. परंतु हे योग्य नाही. मनुष्य हा स्वतःच्या भाग्याचा स्वतः शिल्पकार आहे. मग नशिबाला दोष का बर द्यावे? एखादा मनुष्य अडचणीत असला किंवा संकटात असला तर त्या मनुष्याला साथ देण्याचे धाडस अपवादात्मक सोडून इतर कोणी करत नाही. अंधारात त्याची पडछाया सुद्धा त्याची साथ सोडून देते, त्याचप्रमाणे एखादा माणूस दूर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या मनुष्याचे पण त्याचे आप्तेष्टपण साथ सोडून देतात. आपले दैव हे समुद्राप्रमाणे खोल आणि विस्तृत आहे, पण आपल्या कर्तबगारीची भांडीच लहान आहेत. माणसाची कर्तबगारी अपुरी असली तर तर त्याचा उपयोग होत नाही. आपलं नशीब आपल्या सोबत हवं असेल तर आपली कर्तबगारी मोठी असायला हवी. कारण आपलं नशीब कर्तबगारीने वाढत असते, महानता प्राप्त होते. नशीब रज:कणाचा पर्वत बिंदूचा सिंधू बनवू शकतो. असे महान कन्फ्युशिअसने म्हटले आहे. याचा अर्थ असा की एखादा रज: कण सुद्धा पर्वताच्या छोट्याशा बिंदूच्या सिंधूत रूपांतर करू शकतो. कारण मनुष्य ठरवेल तर सर्व काही होत असते. आपणच आपल्या स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार व्हायचे असेल तर आपल्या कर्मातील दोष जाणुन घेणे आवश्यक आहे. संकटात , अडचणीत सापडलेला मनुष्य आपल्या दैवाला दोष देतो; परंतु स्वतःच्या कर्माचे दोष तो जाणून घेत नाही. आपले दोष आपल्यातील उणीवा आपणच शोधून काढल्या पाहिजे व ते दूर केले पाहिजे. तरच आपण आपल्या भाग्याचे शिल्पकार होऊ. आपल्याला स्वतःला जिंकायचे असेल तर या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे तरच आपण स्वतःला जिंकू शकतो. मग आपल्या सारखा दुसरा नशीबवान कोणी नाही असं समजायला हरकत नाही. माणसाच्या अंगी भेकडपणा असू नये. माणूस हा दैवावर विश्वास ठेवून राहतो. म्हणजे हा केवळ भेकडपणा आहे.माणसाच्या अंगी धाडशी प्रवृत्ती असणे आवश्यक आहे. कारण धाडसी लोकांना नशीब साथ देत असते. असे म्हणायला वावगे होणार नाही. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
Subscribe to:
Posts (Atom)