यमु आजीचं वयाच्या १६व्या वर्षी लग्न झालं. घर मध्यमवर्गी पांढरपेशी. घरात छोटी छोटे दीर नणंदा. वहिनी वहिनी करून भोवती रुंजी घालणा-या. पण घरात सास-यांची कडक शिस्त. आणि त्या काळाचे आता विचित्र वाटणारे दंडक. त्या काळी बाई माणसाने दुकानात जाऊन " shopping करायची पध्दत नव्हती. वर्षाकाठी दोन लुगडी . एक दांडीवर आणि दुसरं .........वर. तीही दुकानदार चार पाच लुगडी घरी पाठवायचा आणि त्यातलं निवडावं लागायचं. त्याप्रमाणे लुगडी घरी आली. षोडश वर्षीय यमुनानं आपल्या भावभावनांना अनुसरून गुलाबी आणि अबोली रंग निवडले. संध्याकाळी सास-यांनी घरी आल्यावर लुगडी पाहिली आणि त्यांनी गर्जना केली, " हे कसले रंग निवडलेत? धुवायला साबण किती लागेल कल्पना आहे का ? उद्या ही लुगडी दुकानी पाठवून द्या आणि मळखाऊ रंगाची लुगडी मागवा. " अल्लड सुनेचा उतरलेला चेहरा सासुबाईच्या नजरेतून सुटला नाही. माजघरातून त्यांनी सगळ ऐकलेलेच होतं . रात्री त्यांनी दोनही लुगडी पाण्यात भिजवली. कारण पूर्वी नवकोर वस्त्र भिजवल्याखेरीज नेसण्याची पध्दत नव्हती. दुस-या दिवशी सास-यांनी बाहेर पडताना सासुबाईंना लुगडी द्यायला सांगितल्यावर चेहरा शक्य तेवढा कावराबावरा करून खाल मानेनं त्या पुटपुटल्या ," अग बाई, परत का करायची होती लुगडी ? मी ती रात्रीच भिजवली. मला बापडीला काय कल्पना. चुकलंच बरीक माझं. '' आपल्या सासूचा हा समंजसपणा सांगताना आज ८९व्या वर्षीही यमु आजींचा चेहरा तरुण यमुसारखाच कृतज्ञ होतो. हे जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं नाही का? म्हणजे आजींच्या शब्दात सांगायचं झालं तर " सासुबाईनी माझंही मन जाणलं पण त्याचवेळी मामंजींनाही दुखवलं नाही. आणखीही एक प्रसंग सांगताना यमु आजी खुसूखुसू हसतात. त्यांच दंतविहीन बोळकं लहान मुलासारखच निरागस वाटतं. यमु कुठेशी बाहेर गेली होती. परतायला थोडासा वेळ झाला. उंबरठ्याशी येताच मामंजींनी फर्मान सोडलं, " आत पाऊल टाकायचं नाही. बाहेरच रहा. " पुढे बोलायची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे यमु वाड्याच्या अंगणात मुकाट्याने उभी राहिली. नेहमी कामात असलेली वहिनी बाहेर कशी म्हणून मुलं विचारायला लागली, " वहिनी तुम्ही बाहेर का उभ्या ? घशाशी येणारा आवंढा गिळत यमु म्हणाली, " अरे, तुमचा खेळ बघतेय. " बराच वेळ गेला तसा सास-यांचा राग शांत झाला. तशा सासूबाई तडक यमुकडे येऊन मोठ्याने म्हणाल्या, " काय ग करतेस अंगणात इतक्या वेळ ? पानं नाही का घ्यायची ? " तोवर सास-यांचाही राग शांत झाला होता आणि कोणाला काहीही पत्ता न लागता यमु परत घरात नेहमीसारखी वावरायला लागली. हे जे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढायचं शहाणपण आज आपल्यापैकी किती जणात आहे? आम्ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो., पण त्याचवेळी दुस-याच्या मनाचा कितीसा विचार करतो? आपण आपला मुद्दा पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. आपले आवाजही कधी कधी गगनाला भिडतात. पण ही नि:शब्द जपवणूक खूप काही शिकवून जाते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment