वेदना बळीराजाचा 'जय जवान जय किसान' ही घोषणा फक्त शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी घोषणाच राहिली आहे. भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जातच वाढतो आणि मृत्यूनंतरही आपल्या मुलाबाळांवर कर्जाचा बोझा ठेवून जातो. अशा या माझ्या शेतकरी राजाच्या वेदना किती दुःखदायक आहे. ग्रामीण भागातील जीवनात तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेती ही सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असल्यामुळे कधी बरे कधी वाईट दिवस पहावे लागतात. निसर्गावरच जीवन अवलंबून आहे. "घणाचे घाव घालावे, गळावा घाम अंगाचा, यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पांचा" या दोन ओळीतच श्रमाचे महत्त्व दडलेले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माझा शेतकरी राजा मेहनत करतो आहे. मुलं चांगली शिकावी, मोठी व्हावी, मुलांनी मोठी शेती घ्यावी आधुनिक उपकरणाचा वापर करावा त्यांना चांगली नोकरी लागावी असे स्वप्न उराशी बाळगतो आहे.आणि त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहते!!! ?? त्याच्या जीवनात अनेक अनेक अडचणी येतात हलाखीची परिस्थिती निर्माण होते. वेळेवर पाऊस पडत नाही पावसाची वाट बघावी लागते. एखाद्या वेळी पाऊस जास्त आला तर सारे वाहून जाते पाऊस नाही आला तर दुष्काळ पडतो. अशा अनेक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत माझा शेतकरी राजा कष्ट करून सर्वांचे पोट भरतो. धन्य धन्य ह्या उभ्या जगाचा पोशिंद्यास.... 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

लेख...... स्त्री शिक्षण संत तुकडोजी महाराज म्हणतात - “ प्रल्हादाची कयाधु आई l छत्रपतीची जिजाबाई कौशल्या, देवकी आदीसर्वाही l वंदिल्या ग्रंथी" अशाप्रकारे माँसाहेबजिजाऊ मुळे शिवछत्रपती घडले. यशोदे मुळे श्रीकृष्ण घडले, या सर्व माता प्रमाणेच कार्य करण्यासाठी स्त्री शिक्षण महत्त्वाचे आहे. कुटुंबामध्ये स्त्री प्रथम मुलगी, नंतर पत्नी आणि नंतर माता अशा तीन महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असते. या सर्व भूमिका व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, मुलांच्या संगोपनासोबतच संवर्धनाचे आणि कुटुंबाच्या विकासाचे कार्य पार पाडण्यासाठी स्त्रियांना शिक्षण मिळणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. भारतीय संस्कृतीत मुलांचे संगोपन आणि संवर्धन असे दुहेरी कार्य आजच्या मातेकडून अपेक्षित असल्यामुळे तिला सर्व सुसूत्रता राखून कार्य करावयाचे असते. असे म्हणतात, ' जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी' या जगाचा उद्धार करायवयाचा असेल तर तर प्रत्येक स्त्री शिक्षित होणे महत्त्वाचे आहे. कारण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत असत, ' मुलांचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे शिक्षण आहे. परंतु मुलींचे शिक्षण हे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आहे. म्हणून तिला शिक्षण घेणे आवश्यक आहे. स्त्री ह्या कोणतीही जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात म्हणूनच स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. ग्रामीण स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत स्वतःच्या कुटुंबापासून तर राष्ट्रव्यापी व संघटनेपर्यंत कृषी कार्यापासून ते संशोधन कार्य पर्यंत अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषा बरोबरीने कार्य करत आहे.असे प्रत्ययास येते. म्हणूनच मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण असते. स्त्री म्हणजे सृजनशील सामर्थ्य आणि करुणाजन्य शक्ती होय'. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

लेख........ "वाचाल तर वाचाल" जसे प्रकाशाच्या सहाय्यशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि हे ज्ञान प्राप्त व्हायचे असेल तर आपल्याला पुस्तक वाचणे आवश्यक आहे. माणसाला जसे जगण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच बुद्धीच्या कक्षा वाढविण्यासाठी,ज्ञानप्राप्तीसाठी वाचण्याची गरज असते कारण वाचन हे आपल्या मनाचे अन्न आहे. असं म्हणतात 'वाचाल तर वाचाल' ज्ञानाची, विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनु आहे. जर ही संपत्ती आपल्याला गोळा करायची असेल तर आपल्याला पुस्तक, ग्रंथ वाचन करावेच लागेल. मानवी जीवन हे जरी क्षणभंगुर असले तरी त्यातले काही क्षण आपल्या ज्ञानाचे अमृत पाजून चिरंजीव करण्याचे कार्य ग्रंथच, पुस्तकेच करत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुची महती विषद केली आहे.' गुरु बिना ज्ञान नही' असे एका हिंदी संत कवीने म्हटले आहे. गुरु नंतर ग्रंथ हेच आपले गुरु आहे. ग्रंथाद्वारे आपल्याला ज्ञानप्राप्ती करता येते. कारण ज्ञान काट्यांना देखील फुल बनवून घेते, अज्ञान फुलांना देखील काटे बनवून घेते. दृष्टी बदलली तर सारे बदलून जाते. आणि ही दृष्टी बदलवायची असेल समदृष्टी करायची असेल ज्ञानी व्हायचे असेल तर वाचावेच लागेल आणि म्हणूनच मानवाच्या जीवनात ग्रंथांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आणि त्यामुळेच पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्याची समदृष्टी झाली तो ज्ञानी झाला. पुस्तक वाचनामुळे माणसाला बहुश्रुतता प्राप्त होते. मनात उद्भवणार्‍या शंका निरसन ग्रंथच करत असतात. पुस्तक वाचनामुळे आपल्याला कसे जगावे याचे भान राहते. जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. व आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. ग्रंथांचे पुस्तकांचे वाचन केल्यामुळे माणसाच्या भावनांना प्रतिसाद प्राप्त होतो. आपल्या मनाचे उदात्तीकरण होते. त्यामुळेच मानवाच्या जीवनात ग्रंथांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. माणसाला वर्तमानातील परिस्थितीशी संघर्ष कसा करावा व भविष्यातील स्वप्ने कशी रंगवावी हे ग्रंथ शिकवतात. ग्रंथ वाचनामुळे माणसाला त्याच्या भूत भविष्य आणि वर्तमान जीवनात उत्तम प्रकारे लाभ घेता येतो. ग्रंथ हे आपले केवळ मित्र नाहीतर मार्गदर्शकही आहेत तसेच गुरु सुद्धा आहेत. पुस्तक वाचनामुळे माणसाचं मस्तक सुधारते आणि हे सुधारलेल मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही आणि कोणाचेही हस्तक होत नाही असे डाॕ. बाबासाहेब यांनी म्हटले आहे. पुस्तक वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो.हा सुसंस्कृतपणाच त्याच्या यशाचा मार्ग असतो. ग्रंथ हा माणसाचा सर्वात मोठा आधार आहे. ग्रंथामुळे ज्ञान प्राप्त होते. आणि हे ज्ञान प्राप्त झाले की माणूस विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. मानवाला सुखरूपी आकाशात सहज उडायचे असेल तर ग्रंथ, ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख असावे लागते. यामुळेच माणूस सुखात आनंदात राहू शकतो. आणि ज्ञानाच्या कक्षा वृंद्धिगत करायचा असेल तर 'ग्रंथ हेच गुरु' आहेत. म्हणून पुन्हा एकदा सांगावसं वाटतं ' वाचाल तर वाचाल'. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*निसर्गाशी मैत्री* *माझी वसुंधरा* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *“ वाहील वारा हसेल आभाळ* *झाडा-फुलांचा करू सांभाळ* *ढग देतील पाणीच पाणी* *पक्षी गातील सुरेल गाणी "* निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान आहे. निसर्गाचे व मानवाचे अतूट नाते आहे. निसर्ग हा मानव व इतर सजीव सृष्टी करता आणि सजीव सृष्टी निसर्ग करिता, दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. माणूस हा निसर्गाचे लेकरू ना! निसर्गाच्या रम्य वातावरणात माणूस आश्रयस्थान घेतो. निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे. निसर्ग मानवाची भूक भागवतो तहान शमवितो, मंद मधुर वायू लहरींनी श्रमाचा परिहार करतो, सुगंधी फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो. पण सध्या या यंत्रयुगाच्या आणि विज्ञान युगाच्या जाळ्यात माणूस इतका अडकला आहे की, निसर्गाकडे तो दुर्लक्ष करत आहे. माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या तात्पुरत्या सुखासाठी निसर्गाचा गैरवापर करत आहे. पर्यावरणाला काळीमा फासण्याचे कार्य बुद्धिमान समजला जाणारा सृष्टीवरील मानव करत आहे. प्रदूषण निर्मिती करून आज जिकड पहावेे तिकडे प्रदूषण फोफावत चाललेले आहे. या प्रदूषणाचा पर्यावरणावर म्हणजेच निसर्गावर परिणाम होऊन या निसर्गाचा, पर्यावरणाचा तोल ढासळला जाऊ लागला आहे. पर्यायाने संतुलन बिघडलेले आहे. ही प्रदूषणाची गंभीर समस्या होऊन बसलेली आहे. तरीदेखील मानवाला आपली वनश्री आपले वैभव आहे हे त्याला समजून नाही राहिले. या सर्वाचा विपरीत परिणाम मानव प्राण्यावर होत आहे. हिरवेगार डोंगर लुटण्याचा लोभ माणसाला आवरेना, डोंगर उघडा बोडका करून माणूस आता अश्रू ढाळू लागला. पण या उघड्या डोंगराचा माथा झाकण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे हवीत. जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि भरपूर पाऊस पडावा यासाठी झाडांची आवश्यकता आहे. निसर्ग म्हणतो, ' अरे मित्रा मी तुझ्याच साठी जगत होतो ना! तुझ्यासाठी मरत होतो ना! निसर्ग माणसाला पावलोपावली शिकवत असतो आणि माणूस चुकला तर त्याला सजाही देतो. पण ही सजा तात्पुरती असते. माणसाला गर्व झाला की निसर्ग त्याला धडा शिकवतो. माणसाचे डोळे उघडताच पुन्हा तो आपल्या निसर्ग मिञाची सोबत घेऊन त्याचा पुन्हा जीवनसाथी बनतो. असे हे निसर्गाचे मानवाशी अतूट नाते आहे. निसर्ग हा माणसाचा महान गुरू, सखासोबती आहे. या प्रेरणेचे निसर्ग स्थान असलेल्या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे. आपली सृष्टी हिरवीगार शाल पांघरून सजलेली, नटलेली असावी, दिसावी यासाठी आपण आपल्या निसर्गाला जपले पाहिजे. तेव्हा सर्वत्र झाडे न कापता ते अधिक प्रमाणात लावून जगवले पाहिजे.पाण्याची स्वच्छता राखली पाहिजे.वृक्ष वेलींवर पुञवत प्रेम केले पाहिजे.तेव्हा पर्यावरणाचा समतोल राखता येईल. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हे उगाच नाही म्हटले संत तुकाराम महाराजांनी. 'आपली वनश्री आपण जपूया, वैभव तिचे राखूया' हाच मंत्र आपण जपला पाहिजे आणि कृतीत उतरवला पाहिजे. " लावू रोपटे होईल झाड पक्षी गातील पानाआड l येतील फळे बहरतील फुले झाडाखाली मग खेळतील मुले ताजी शुद्ध मिळेल हवा सुगंध फुलांचा घेऊन नवा. चला तर मग वसुंधरेच्या पोटी रुजवण बियांची करूया, निसर्गाशी घट्ट नाते आपले जुळवू या.... ☘☘☘☘☘☘ 👏👏👏👏👏👏👏 म्हणूनच म्हणावस वाटत 'इथे कर माझे जुळती, जिथे निसर्ग आहे माझा सोबती'.🙏🙏🙏🙏 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड.

सुट्टीउपक्रम - स्वंयअध्ययन उपक्रम - ४ आता मी लिहिणार साहित्य - आवश्यकता नाही. कृती - एखाद्या सोपा विषय घ्यावा व त्यावर आधारित चार-पाच वाक्यात माहिती लिहावी. नमुना विषय - १) माझा वाढदिवस. काल माझा वाढदिवस होता. बाबांनी मला नवे कपडे आणले. मी नवे कपडे घातले. आईने मला ओवाळले. वाढदिवसाला माझे मित्र आले होते. मी त्यांना खाऊ दिला. -------------------------------------------- विषय सूची- १) माझी आई २) माझी शाळा ३) माझा आवडता खेळ ४) माझे आवडते फुल. ५) माझे घर ६) दिवाळी ७) पावसाळा ८) सहल ९) माझी मैत्रीण १०) रक्षाबंधन टीपः दिलेल्या विषय सूचीतील विषय घेऊन विद्यार्थ्यांनी चार ते पाच वाक्यात माहिती लिहावी.सांगावी. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिला सेनकुडे

सुट्टीउपक्रम - स्वंयअध्ययन उपक्रम ३ - शब्दांची बाग साहित्य - पाठ्यपुस्तकातील पाठांमध्ये आलेल्या अक्षरांवर आधारित शब्दांची बाग व प्रश्न कार्ड ( प्रत्येक प्रश्न कार्डावर किमान पाच प्रश्न असावेत.) कृती - शब्दांच्या बागेतील शब्द विद्यार्थ्याने वाचावे. वाचावयास सांगावे. शब्द वाचून झाल्यावर पण प्रत्येक विद्यार्थ्याने प्रश्न कार्ड द्यावे. प्रश्न कार्डावरील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्याने त्यांची बाग पाहून लिहावीत. कार्ड बदलून सराव करावा. *शब्दांची बाग* -- ------------------------------------------------- आई पपई रस रपरप नळ नऊ घर फणस सण घसरगुंडी धन ऊस आण सई घणघण मान लहान आपण फसफस आला अननस आज दार माऊ बाजार जाऊ पसर हास अजय अहाहा अबब अमिता कसरत बस नमन बडबड झाकण तलवार तबला रमत-गमत हात काम उचल नाक चमचम सरबत घसर बगळा परकर गळा ------------------------------------------------ प्रश्न - १) ' ऊ ' ने शेवट होणारे शब्द लिहा. २) ' ण ' ने शेवट होणारे शब्द लिहा. ३) शरीराच्या अवयवांची नावे लिहा. ४) मुला मुलींची नावे लिहा. ५) फळांची नावे लिहा. ------------------------------------------- टीपः पाठ्यपुस्तकातील पाठातील शब्द घेऊन ' शब्दाची बाग' तयार करावी व सराव करावा. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिला सेनकुडे

सुट्टीउपक्रम - स्वंयअध्ययन उपक्रम २ - शब्द वाचूया, क्रमाने लावूया. साहित्य - वर्णमालेच्या गटानुसार शब्द असलेले शब्द कार्ड. कृती - विद्यार्थ्याने एक कार्ड घ्यावे. त्यावरील शब्द वाचावेत आणि लिहावेत. लिहिलेले शब्दवर्णमालेच्या क्रमाने पुन्हा लिहावेत. जसे - शब्द कार्ड १. खटारा ,घरटे ,गवत ,कमळ शब्द वर्णमालाक्रमाणे कमळ ,खटारा, गवत ,घरटे कार्ड बदलून सराव द्यावा. *नमुना कार्डे* १) चरखा जहाज झगा छत्री २) टपालपेटी ढग डब्बा ठसा ३) तबक दरवाजा धनुष्य थवा नळ ४) परात भटजी मगर फणस बदक 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिला सेनकुडे

सुट्टी उपक्रम - स्वयंअध्ययन उपक्रम १ - क्रम जुळवूया , क्रम लावूया. साहित्य - वर्णमालेतील गटानुसार अक्षर कार्ड किंवा वर्णमाला असलेले साहित्य कृती - विद्यार्थ्याने अक्षरकार्ड वर्णमालेतील अक्षरे वाचावीत. ती अक्षरे ती अक्षरे लिहावीत. लिहिलेली अक्षरे वर्णमालिका क्रमाने पुन्हा लिहावीत. जसे -- कार्ड- क ग घ ख क्रमाने जुळवून लिहिलेले क ख ग घ असा सराव करणे बदलून द्यावा. अक्षर कार्डाचे संच - अक्षर कार्डे १) अ आ इ ई - - ई आ इ अ २) उ ऊ ए ॲ - - ऊ ए ॲ उ ३) ऐ ओ आॕ औ अं अः आॕ ऐ ओ अः अं ४) क ख ग घ - घ क ख ग ५) च छ ज झ - ज छ झ च ६) ट ठ ड ढ ण - ण ड ठ ढ ट ७) त थ द ध न - न ध द थ त ८) प ब भ म - ब म भ प फ ९) य र ल व - व ल र य १०) श ष स ह - श ह ष स ११) ळ क्ष ज्ञ - ळ ज्ञ क्ष 〰️〰️〰️श्रीमती प्रमिला सेनकुडे